बुधवारी विकीपिडीया बंद
‘इंटरनेट पायरसीविरोधी विधेयका’ला विरोध करण्यासाठी विकिपीडियासह काही संकेतस्थळ बुधवारी 24 तासांसाठी आपली सेवा बंद करणार आहेत.
न्यूयॉर्क- अमेरिका सरकारच्या विचाराधीन असलेल्या ‘इंटरनेट पायरसीविरोधी विधेयका’ला विरोध करण्यासाठी विकिपीडियासह गुगल, फेसबुक, याहू, ट्विटर, ईबे हे संकेतस्थळ बुधवारी 24 तासांसाठी आपली सेवा बंद करणार आहेत. हे विधेयक संमत झाल्यास अनेक संकेतस्थळांच्या स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते. त्यामुळे अन्य काही संकेतस्थळही आपली सेवा खंडित करणार असल्याचे समजते.‘ऑनलाईन चोरी रोखण्यासाठी म्हणजेच इंटरनेट पायरसीला आळा घालणारा स्टॉप ऑनलाइन पायरसी अॅक्ट (सोपा) आणि प्रोटेक्ट आयपी अॅक्ट(पीपा) नावाचा कायदा अमेरिकेच्या सिनेटसमोर चर्चेला येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून या विधेयकावरून बरीच चर्चा रंगली असून वादही निर्माण झाले आहेत. अनेक संघटनांनी या विधेयकाला समर्थन दिले असले तरी विकिपीडियासह अनेक महत्त्वाच्या संकेतस्थळांनी या विधेयकाला विरोध केला आहे. ‘या विधेयकामुळे खुल्या व स्वतंत्र इंटरनेट सेवेचे नुकसान होईल,’ असे मत विकिपीडियाचे संस्थापक जिम्मी वेल्स यांनी व्यक्त केले आहे. ‘बुधवारी विकिपीडिया बंद राहणार असल्याने मुलांनी त्यांचा गृहपाठ पूर्ण करावा,’ असे मिश्किलीने वेल्स म्हणाले.
अमेरिकी प्रशासनाच्या या विधेयकाला गुगल, फेसबुक, याहू, ट्विटर, ईबे, या संकेतस्थळांनीही कडाडून विरोध केला आहे. या विधेयकामुळे इंटरनेट उद्योगाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे गुगलने म्हटले आहे. अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या प्रतिनिधींनी या विधेयकावर फेरविचार करावा, अशी मागणी या संकेतस्थळांनी केली आहे.
- पायरेटेड वस्तूंच्या विक्रीला बंदी
अनेक संकेतस्थळांवर पायरेटेड अमेरिकी चित्रपट, संगीत किंवा अन्य वस्तूंची ऑनलाइन विक्री केली जाते. त्यामुळे अमेरिकी कॉपिराइट कायद्याचा भंग होतो. मात्र या विधेयकामुळे संकेतस्थळांना पायरेटेड वस्तूंची विक्री करण्यास बंदी येणार आहे. पायरेटेड कंटेन्ट असलेल्या संकेतस्थळांवर बंदी लादण्याची तरतूद या विधेयकात आहे.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा