पाकिस्तानात लष्कर विरुद्ध सरकार
मेमो प्रकरणावरून पाकिस्तानमध्ये सरकार, लष्कर आणि न्यायव्यवस्था यांच्यात बेबनाव निर्माण झाल्यामुळे परिस्थिती चिघळली आहे.
इस्लामाबाद- मेमो प्रकरणावरून पाकिस्तानमध्ये सरकार, लष्कर आणि न्यायव्यवस्था यांच्यात बेबनाव निर्माण झाल्यामुळे परिस्थिती चिघळली आहे. कोणत्याही क्षणी लष्करप्रमुख कयानी बंड करून सत्ता आपल्या हाती घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी गुरुवारी दुबई गाठल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. दुबईत एका लग्नसमारंभासाठी झरदारी गेले असावे किंवा हृदयविकाराच्या उपचारांसाठी गेले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या आधीही उपचारासाठी झरदारी अचानकपणे दुबईत गेले होते. दरम्यान, लष्करी बंड देशाला परवडणारे नाही, असे ठामपणे सांगत सरकार, नागरिक आणि प्रसारमाध्यमांनी बंडाला संपूर्ण विरोध दर्शवला आहे. दरम्यान, लष्करप्रमुख कयानी व ‘आयएसआय’प्रमुख पाशा यांना सरकारने हटवू नये, यासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. वकील मौल्लवी इक्बाल हैदर यांनी ही याचिका केली आहे.राजीनाम्याची मागणी
सत्तारुढ पाकिस्तान पीपल्स पक्षाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर अमलबजावणी केली नाही आणि न्याय संस्थांविरोधात भूमिका घेतली तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्या विरोधात तेहरिक-ए-इन्साफ हा पक्ष रस्त्यावर उतरेल. सत्तारुढ पक्षाने भ्रष्टाचाराबाबत कोणतीही कारवाई केलेली नसल्यामुळे झरदारी आणि गिलानी यांनी राजीनामे द्यावे, अशी मागणी तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाचे नेते इम्रान खान यांनी केली आहे.
भारताचे लक्ष
पाकिस्तानातील राजकीय घडामोडींवर भारताचे बारीक लक्ष असून, तेथील वातावरण चिंताजनक नसल्याचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले आहे.
‘बंड झाल्यास भारतीय उपखंडात अस्थिरता’
लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून टाकून तेथे लष्करी राजवट आली तर त्यामुळे भारतीय उपखंडात अस्थिरता निर्माण होईल, अशी भीती न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राने वर्तवली आहे. लष्कर न्यायव्यवस्थेला हाताशी धरून सरकार कमकुवत करण्याचे, त्याहीपेक्षा सरकार उलथवून टाक ण्याचे काम मार्चमध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी करत असल्याचा संशय पाकिस्तानी अधिका-यांच्या हवाल्याने टाइम्सने दिला आहे. मार्चमध्ये होणा-या निवडणुकीत झरदारी यांचा पक्ष पुन्हा सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा कट रचला जात असल्याची शक्यता टाइम्सने व्यक्त केली आहे.
झरदारींसाठी 16 जानेवारी ‘कयामत का दिन’
राष्ट्रपती झरदारी यांच्याविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय 16 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे आधीच मेमो प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या झरदारींसाठी हा ‘कयामत का दिन’ ठरणार आहे.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा