PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: हेर्टा म्युलर आणि हुकूमशाही सरकार हेर्टा म्युलर आणि हुकूमशाही सरकार ================================================================================ शांताराम मंजुरे on 08 February, 2010 09:20:00 AM गेल्या वर्षीचा नोबेल साहित्य पुरस्कार मिळालेल्या हेर्टा म्युलर यांनी तो पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणातील काही भागाचा अजित वायकर यांनी केलेला अनुवाद ‘बुकमार्क’ या पानावर १४ डिसेंबर, २००९ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. ८ ऑक्टोबर, २००९ रोजी जेव्हा हेर्टा म्युलर यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया ‘माझा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाही,’ अशीच होती. पाश्चिमात्य साहित्य जगतातसुद्धा त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं, कारण ज्यांना हा पुरस्कार मिळण्याची शक्यता होती त्यात एमोस ओज (इस्रईल) आणि फिलिप रोथ (अमेरिका) यांची नावं प्रमुख होती. इंग्रजी साहित्य जगतात हेर्टा म्युलर हे नाव फारसं परिचित नव्हतं. कारण त्यांच्या आतापर्यंत प्रकाशित झालेल्या १५ कांदब-यांपैकी फक्त दोन कांदब-यांचेच इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या सर्व कांदरब-यामध्ये रोमानियाच्या हुकूमशाही सरकारच्या अत्याचारांचं कोणत्या ना कोणत्या प्रकारे चित्रण करण्यात आले आहे. त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याच्या घोषणेनंतर तिस-याच दिवशी लंडनच्या ‘द गार्डियन’ या वर्तमानपत्रात त्यांच्या आत्मवृत्ताचा संक्षिप्त भाग प्रकाशित करण्यात आला होता. ज्यात त्यांच्या रोमानियातील यातनामय जीवनाचं चित्रण आलं आहे. हेर्टा म्युलर यांनी रोमानियाच्या कम्युनिस्ट सरकारची गुप्तहेर म्हणून काम करण्यास नकार दिला म्हणून त्यांचा नाना प्रकारे छळ करण्यात आला. त्यांना कोठेही नीट नोकरी करू देण्यात येत नव्हतं, त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी समस्या निर्माण केल्या जात होत्या. त्या जर्मनीच्या गुप्तहेर आहेत. त्या वेश्यावृत्तीमध्ये गुंतल्या आहेत. ब्लॅक मार्केटिंग करतात वगैरे प्रवाद त्यांच्याबद्दल पसरवले जात होते. एकदा त्या हेअर ड्रेसरकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अडवलं आणि अज्ञातस्थळी नेलं. तिथे अगोदरच साध्या कपड्यातील तीन पोलिस बसले होते. त्यातील प्रमुख पोलिसाने त्यांचा उल्लेख वेश्या असा केला आणि त्यांचं ओळखपत्र पाहावयास मागितलं. त्यांना सतत शिवीगाळ करत तो त्यांचं ओळखपत्र जमिनीवर फेकत होता. त्या ओळखपत्र घेण्यास खाली वाकल्या की, त्यांच्या पार्श्वभागावर लाथ मारली जायची. हा प्रकार जवळजवळ ४० वेळा झाला. शेवटी एक दणकट लाथ मारून त्यांना बाहेर फेकण्यात आलं. हेर्टा म्युलर यांच्या ‘नादिर्स’ या कादंबरीमुळे रोमानियन सरकार त्यांच्यावर प्रचंड नाराज होतं. ही कांदबरी त्यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूमुळे आलेल्या दुख:वेगातून बाहेर पडण्यासाठी स्वत:च्या आयुष्यात आलेल्या अनुभवांना शब्दरूप देत लिहिली होती. त्यातील सच्चेपणामुळे ती वाचकांना खूपच भावली. तिला नाना प्रकारचे साहित्यिक पुरस्कार मिळाले. त्यामुळे म्युलर यांच्यावरच रोमानियन सरकारचा जोश आणखी वाढला. कादंबरी प्रसिद्ध झाल्यानंतर जर्मनीतील एक प्रतिष्ठित वर्तमानपत्र ‘दि त्साइत’चे एक पत्रकार रोल्फ माइकेलिस हेर्टा म्युलर यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांना भेटावयाला येणार होते. त्यांनी तशी तार त्यांना केली होती. परंतु सदर तार सरकारने दाबून टाकली. दुर्दैवाने त्याच वेळी म्युलर नव-यासह आपल्या सासू-सास-यांना भेटायला त्यांच्या गावी गेल्या होत्या. रोल्फ माइकेलिस ठरल्याप्रमाणे त्यांच्या घरी गेला, पण भेट झाली नाही. दुस-या दिवशीही भेट झाली नाही. तिस-या दिवशी तो जेव्हा पुन्हा भेटण्यास आला तेव्हा लपून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडलं आणि बेदम मारहाण केली. त्यांच्या दोन्ही पायांचे अंगठे तोडले आणि हाकलून दिलं. थोडक्यात रोमानियन सरकार हेर्टाम्युलर आणि त्यांच्या नातेवाइकांना सतत त्रास देत होतं. शेवटी नाइलाजाने त्यांना जर्मनीत आश्रय घ्यावा लागला.