पहिले पान | मध्यंतर | बुकमार्क | पवित्रे घेतो मी निरागसतेचे

पवित्रे घेतो मी निरागसतेचे

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

जे ‘फोनी’ नाही म्हणजे भंपक नाही त्याचा आजन्म शोध जे. डी. सॅलिंजरने, ज्याला मराठीत ‘वेचक’ म्हणतात, अशा साहित्यातून घेतला. सुमारे पंधरा-सोळा कथा आणि एक, फक्त ‘द कॅचर इन द राय’ ही एकच कादंबरी. बस् इतक्याच साहित्यिक आऊटपूटवर सॅलिंजर विसाव्या शतकातला ‘थोर’ लेखक ठरला.

द कॅचर इन द रायया १९५१ साली प्रकाशित झालेल्या लहानखु-या कादंबरीने वयात येणा-या प्रत्येक तरुणाला विद्रोहाची दिक्षा देणारा जेरॉम डेव्हिड सॅलिंजर २७ जानेवारीला गेला. कॅचर..ही विसाव्या शतकातली एक बाजिंदी कलाकृती. ग्रेट लेखक कधीच जातबीत नसतात. ते कायम आपल्या हातात असतात, पुस्तकरुपे.

तर सांगायचं म्हणजे, हा महान अमेरिकन लेखक ग्लोबल वॉर्मिगने तप्त झालेल्या या भंपक, सॅलिंजरच्याच शब्दात, ‘फोनीजगाला सोडून दूर क्षितिजापलीकडे उडून गेला. वैश्विक साहित्यात त्यामुळे पोकळीबिकळी होण्याची दाट शक्यता आहे. हे पोकळीबिकळीसॅलिंजरला आवडलं असतं. त्याचं सगळंच न्यारं. सॅलिंजरने प्रौढ, व्यवहारी, धूर्त जगाला कायम फोनीम्हटलं.

 फोनीअसणं किंवा भंपक असणं खूप मराठी वाचकांना परिचित आहे. याचं कारण नेमाडय़ांची कोसलाही कादंबरी. घोडा जसा मागचा पाय हवेत उडवून लाथ झाडतो तशी लाथ प्रौढांच्या भंपक जगावर पांडुरंग सांगवीकरनेही मारली होती. म्हणून कोसला वाचतांना हसता-हसता व्याकुळही वाटतं. हे एकदम सॅलिजरस्क. सॅलिंजर आणि नेमाडे दोघांनी भंपकांशी पंगाघेतला. जे फोनीनाही म्हणजे भंपक नाही त्याचा आजन्म शोध जे. डी. सॅलिंजरने, ज्याला मराठीत वेचकम्हणतात, अशा साहित्यातून घेतला. सुमारे पंधरा-सोळा कथा आणि एक, फक्त एकच कादंबरी. बस् इतक्याच साहित्यिक आऊटपूटवर सॅलिंजर विसाव्या शतकातला थोरलेखक ठरला. मार्क ट्वेन, हेंमिंग्वे आणि सॅलिंजर ही आधुनिक अमेरिकन साहित्याची त्रिमुर्ती. दत्तगुरूच जणुकाही.

सॅलिंजरच्या एकूण छापील लिखाणाची पृष्ठसंख्या सातशे-आठशेच भरेल. म्हणजे फार नाही, तरीही या सडपातळ साहित्यिक संचितावर जागतिक वायात कौतुकाची त्सुनामी लाट आली. हे केवळ अभूतपूर्व आहे. सॅलिंजरने नेमकं काय लिहिलं? सॅलिंजर नावाचा यक्ष भूतलावरून स्वर्गात व्हेकेशनवर गेल्यानंतर पृथ्वी सामसूम होऊ नये म्हणून याच एका प्रश्नाशी आपण थोडं खेळू या. जे जे फोनीम्हणजे भंपक, खोटं, फसवं, बेरकं, संधीसाधू, गढूळ, व्यवहारी, सशरीर आणि खडबडीत ते ते सॅलिंजरने स्वत:च्या सूक्ष्मदर्शक भिंगातून पारखलं आणि नाकारलं. सॅलिंजरच्या पॅथॉलॉजिकल लेबॉरेटरीत त्याने माणसातलं जडत्व, काठीण्य, तमस आयसोलेट केलं. सॅलिंजरच्या पेट्रीडीश किंवा प्रयोगबशीमध्ये शेवटी काय उरलं? हे सगळं माणसातून वजा केल्यानंतर माणूस असा काही उरतो का? उरतो.

तो शुद्ध होतो. प्रामाणिक होतो. स्वयंप्रकाशाने तळपतो. हलकाफुलका होतो. कमालीची बुद्धीमत्ता असूनही तिचं मढं स्वत:च्या खांद्यावर वाहून नेत नाही. थोडक्यात असा लेखक यक्ष होतो, किन्नर होतो, देवदूतबिवदूतसुद्धा असावा हा जेरॉम डेव्हिड सॅलिंजर. या देखण्या यक्षाला मिडियाची प्रसिद्धी प्रचंड भीती वाटायची. बालकवींची फुलराणी कशी बागेत बागडते तसा सॅलिंजर अमेरिकेत, न्यू हॅपशायरमध्ये कॉर्निश गावातल्या स्वत:च्या विस्तीर्ण इस्टेटीमध्ये वावरला. वृक्षलतासोबत निळ्या आकाशाखाली परतत्त्वाशी एकांत केला त्याने. त्याच्या दंतकथा झाल्यात.

सॅलिंजरसाठी प्रौढ माणूस म्हणजे अ‍ॅनाकोंडा नावाचा महासर्प किंवा विषारी किंगकोब्रा. म्हणून त्याने बहुतेक सगळय़ाच सर्पानाम्हणजे माणसांना टाळलं. जी. ए. च्या भाषेत सांगायचं म्हणजे सॅलिंजरला आपले साप ठाऊक होते. त्यांच्यापासून तो सुरक्षित अंतर राखून राहिला. सॅलिंजरला ग्रेटा गाब्रेसारखं प्रसिद्धीपराखतेचं भारी वेड. ते वेड गोंजारता गोंजरता सॅलिंजर विसाव्या शतकातला सर्वाधिक सुप्रसिद्ध लेखक ठरला. हा एक गंमतीदार विरोधाभास. उंच संरक्षक भिंत असलेल्या आपल्या शंभर एकर अभयारण्यातसॅलिंजरने सुमारे अर्धा शतक एकांताची साधना केली. एकांताचा जल्लोशच होता तो. मी स्वत:च्या आनंदासाठी लिहितो. प्रकाशन, प्रसिद्धी ही टेरिबलगोष्ट आहे, असं सॅलिंजरने न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकाराला सांगितलं होतं. आत्मशुद्धीचा आणि आत्मज्ञानाचा अट्टाहास धरून सॅलिंजरने जन्मभर एकांत साजरा केला.

दोन हातांच्या टाळीचा आवाज तुम्ही ऐकलाय, पण एका हाताने वाजवलेल्या टाळीचा आवाज कोणी ऐकला?’ असं झेनबुद्धीझमचं एक अतक्र्य वचन सॅलिंजरच्या नाइन स्टोरीजया कथासंग्रहाच्या सुरुवातीला भेटतं. सॅलिंजर एका हाताच्या टाळीच्या आवाजाचा वेध घेत, लोकांना टाळत, स्वत:ला शोधत, साहित्य संत होऊन जगला. मार्क ट्वेनची हकलबेरी फिन’, हेंमिग्वेची द ओल्ड मॅन अ‍ॅँड द सीआणि सॅलिंजरची द कॅचर इन द रायया माणसांच्या कथा मानवतेच्या गाथा झाल्या. कारण या तिघांमधलं कालातील सत्य. हसतखेळत, गुदगुदल्या करत, स्वत:शी आणि परतत्त्वाशी लढत, माणसाच्या आतलं काहीतरी सांगितलं या त्रिमूर्तीने.

त्यात कॅचरकेवळ लाजवाब. इतकी खेळकर, मिश्चिवस, तेजस्वी तरीही सडसडीत अंगयष्टीची ही कादंबरी साठ वर्षापूर्वी अमेरिकेत प्रकाशित झाली आणि अवघ्या अ‍ॅडोलेसंटम्हणजे कुमार वयातल्या अमेरिकेला एँग्स्टम्हणजे तळमळ काय असते याचा प्रत्यय आला. वैश्विक तरुणाईला आत्मप्रत्यय देणा-या सॅलिंजरचे टीकाकार मात्र कॅचरमुळे कौमार्यअवस्थेच्या नव्या मानसशास्त्राचा, युवाबाजीचा घाऊक व्यापार सुरू झाला, असं म्हणतात. सुस्थित कुटुंबातल्या होल्डन कॉलफिल्डला बेशिस्त वर्तनासाठी श्रीमंतांच्या पब्लिक स्कूलमधून हाकलून लावलं आहे. या बेशिस्त, बिघडलेल्या होल्डनचा आत्मसंभ्रम, परात्ममभाव आणि आत्मशोध म्हणजे द कॅचर इन द राय’. ‘कॅचरहोल्डनच्या गंमतीदार पण भेदक प्रथमपुरुषी एकवचनी स्मार्ट बडबडीतूनसाकारते. कॅचरमध्ये अमेरिकन स्लॅँग किंवा बोलीतले खूप शब्द होल्डनच्या तोंडी येतात. हे शब्द अश्लील आहेत, ‘कॅचरमध्ये शिव्या आहेत त्यामुळे युवा पिढी बिघडेल म्हणून कॅचरवर अमेरिकेतल्या काही शाळांनी बंदी घातलेली होती.

सध्या अमेरिकेतल्या हजारो शाळांमध्ये कॅचरशीघ्रवाचनासाठी लावली आहे. दरवर्षी कॅचरच्या किमान अडीच लाख प्रति विकल्या जातात. कॅचरची प्रेरणा घेऊन जगभरातले तरुण आपल्या पालकांना, शिक्षकांना, समाजाला प्रतिदिन भंपक म्हणून हिणवतात. विरेचन पावतात. हा न-नायक होल्डन कॉलफिल्ड जात्याच बुद्धीवान, पण बंडखोर आणि विनोदी आणि तिरकस आणि अतिसंवेदनशील आणि शुद्धनैतिकतेचा ध्यास असलेला आणि सानेगुरुजी टाईप निरागसतेचा पाठलाग करणाराबिरणारा आहे. आजही वाचणा-याला होल्डन सोनेरी केसांच्या राजपुत्रासारखा शूर, पण विकल, वस्तुनिष्ठ पण भावुक आणि संभ्रमित पण कुठेतरी शहाणा भासतो. या विलक्षण रसवंतीला एक्सपायरी डेटनाही.

 कॅचरएक कल्टबुक आहे, कम्युनिस्ट मॅनिफेस्टोसारखं. एकतर होल्डन कॉलफिल्डशी सहमत व्हा, किंवा त्याला पोरकट म्हणून नाकारा. कॅचरवाचून तोंडात मिठाची गुळणी नाही धरता येत. नियमित अभ्यास, शिस्त, ज्येष्ठांना मान, उच्च ध्येयाचा पाठलाग इत्यादी जीवनमूल्यांची खिल्ली उडवणा-या आपल्या या वेडय़ा भावाला नेमकं कोण व्हायचं आहे? हे फोबीला, होल्डनच्या बहिणीला कळत नाही. तेव्हा रायच्या शेतात, दरीकाठी उभं राहून भान हरपून खेळणा-या भोवतालच्या लहान मुलांवर बारीक नजर ठेवायला आणि एखादं मुल दरीत पडत असेल तर त्याला धरायला मला आवडेल, असं होल्डन बहिणीला सांगतो.  रायच्या शेताच्या टोकाला हात बाजूला पसरून उभा असलेला कॅचरही प्रेमाची अमीट प्रतिमा आहे. तो कॅचरनिरागस मुलांचा, निरागसतेचा मासिहा आहे. स्लॅँगमध्ये बोलणारा आधुनिक येशू.

सॅलिंजरने दुस-या महायुद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेला. जीवन-मरणाचे सगळे मनोविभ्रम अनुभवले. युद्धानंतर सॅलिंजरला नव्‍‌र्हस ब्रेकडाऊन झाला. मग तो सावरला आणि अ परफेक्ट डे फॉर द बनानाफिशही निरागसतेच्या आत्महत्येची अप्रतिम लघुकथा लिहिली. सॅलिंजरच्या कथांचा घाट निराळाच. जगण्यातला कुठलाही नगण्य, बारका तुकडा त्याला लेखक म्हणून गुंगवतो. सुरुवात, मध्य आणि शेवट असं काही नसतं त्याच्या कथांमध्ये. झाकण नसलेल्या या मुक्तकथा आहेत, असं जॉन अपडाईकचं म्हणणं हे पटतं. सेमर, फ्रॅनी, झोई, बूबू, बडी, ही ग्लासकुटुंबातली भावंडं यांच्या आपसातल्या नात्यांची घट्ट वीण, त्यांचं खाजगी अस्तित्वभान, त्यांची वरवरची कौटुंबिकता, पण खोलखोलची वैश्विक मानसिकता आणि तात्त्विकता चितारणा-या सॅलिंजरच्या दीर्घ कथा वाचणं म्हणजे पंडित भिमसेन जोशी, किशोरी आमोणकर किंवा पंडित जसराजांची मस्त जमलेली मैफल ऐकणं.

देखण्या सॅलिंजरचे कान लांब असल्याचं सांगतात, पण ते कान कमालीचे तिखटही होते. भोवताली माणसं जे बोलतात त्यातले सूक्ष्म शब्दविभ्रम सॅलिंजर कॅचकरायचा. म्हणून युवा अमेरिकेचा तो मानचिन्ह झाला. उमेदवारी करणा-या लेखकासाठी सॅलिंजर वाचून त्याच्यासारखं न लिहिणं मोठंच दीव्य.  सॅलिंजर हा कुठल्याही आधुनिक वायीन पर्यावरणात साथीचा रोगासारखा फैलणारा सृजनजंतू आहे. साहित्यिक बंडखोरीचा तो आद्य नमुना आहे. अवघ्या सामाजिक, संस्कृतिक आणि पांरपारिक बापाला नकार देणारा हा शिंग फुटलेला चिरतरुण बंडखोर फार लोभस आहे.  पवित्रे घेतो मी पापांचेहे म्हणणारे दिलीप पुरुषोत्तम चित्रे आणि पवित्र घेतो मी शुद्ध निरागसतेचेम्हणणारा सॅलिंजर किंवा नेमाडे वाचकांच्या मनात अनुकूल कंपंनं निर्माण करतात, कारण ते वाचकांचं काहीतरी हरवलेलं शोधून देतात. इनोसन्स लॉस्ट अ‍ॅँड फाऊंड.

निरागसता, प्रामाणिकता, सचोटी, विशुद्ध प्रेम, परस्पर संपर्क, उमेदपण हे गुण हरवत चाललेल्या चालू काळाची ठणकणारी नस सॅलिंजरने पकडली. युद्धोत्तर म्हणजे पोस्टवॉर अमेरिकेत फोफावलेला परात्मभाव, मूल्यसंभ्रम, हरवलेपण, सॅलिंजरने नेमक्या सिच्युएशनमध्ये, चपखल शब्दांत पकडलं.

जे. डी. सॅलिंजरने जे केलं त्याला केवळ लेखन म्हणणं पुरेसं नाही. त्याच्यासाठी लेखन आत्मज्ञानाची प्रॅक्टिस होती. सॅलिंजरने जन्मभर होमिओपॅथी, नेचरक्युअर, योग, झेनबुद्धीझम, वेदांत आणि बरेच आध्यात्मिक उपद्व्यापकेले. पौर्वात्य साधूसंतांवर त्याची भिस्त होती. लाहिरी महासया हे स्वामी योगानंदांच्या वडिलांचे गुरू सॅलिंजरचं श्रद्धास्थान. छिन्नमनस्क केकाटणारं तात्कालीन अमेरिकन जीवनवास्तव आपल्या कथांमधून प्रभावीपणे चितारणा-या सॅलिंजरला अंतिम ज्ञानाची आस होती. आधुनिक जीवनाचा आकंठ उपभोग घेणारा हा कॅचर त्याच्या आध्यात्मिकतेमुळे गूढ आणि व्यामिश्र झाला. सॅलिंजरने एकाहून अधिक लग्न केलीत, स्वत:चं लेखक म्हणून पावित्र्य जपण्यासाठी आपल्याच चरित्र लेखकाला आणि कॅचरचा उत्तरार्ध लिहिणा-या दुस-या लेखकाला कोर्टात खेचलं. अमेरिकन आयकॉनला मिळणारी घृणास्पद प्रसिद्धी टाळण्यात सॅलिंजरने खूपच ऊर्जा घालवली.

भक्तांना घरांच्या भिंतीबाहेर तिष्ठत ठेवलं, फॅनमेलला उत्तरं दिली नाहीत. तरीही आज सॅलिंजर वाचकांच्या हृदयाच्या डाव्या कप्प्यात धपधपत असतो. तो गेला तरी तो गेल्यासारखं वाटत नाही. सुंदर लिखाणाची आणि ते लिहिणा-याची हीच गंमत असते. एका हाताने वाजवलेल्या टाळीचा आवाज कोणी ऐकलाय?

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0