गोष्टीवेल्हाळ
ल’मोरचे कथानायक मुख्यत्वे कोऊबॉय असायचे. घोडेस्वार, गनफायटर, गुरांचे कळप, विस्तीर्ण गवताळ प्रदेश, द-याखो-या, जंगल अशा प्रदेशातून तो वाचकांना कथेच्या ओघात फिरवायचा, खिळवून ठेवायचा.
गप्पीष्ट, गोष्टीवेल्हाळ माणूस आवडणार नाही असा एखादाच निघेल. शेकोटीसमोर फर्मास गोष्टही रंगवणारी माणसं आठवा. लुई ल’मोर अगदी तसाच होता. फरक इतकाच की तो गोष्टही सांगायचा त्या अगदी जुन्या अमेरिकेच्या, वेस्टर्न फ्रंटीयरच्या. काऊबॉयच्या. गोष्टही रंगवण्याची विलक्षण हातोटी त्याला साध्य झाली होती. सहजसोप्या भाषेत, अॅक्शनपॅक कथा लिहिणं, वाचकाला त्यात गुंगवून ठेवणं ही त्याची खासीयतच होती. वेस्टर्न म्हणजे क्लींट इस्टवूडने अजरामर केलेल्या कोऊबॉयच्या व्यक्तीरेखा. ल’मोरचे कथानायक प्रामुख्याने हेच कोऊबॉय असायचे. घोडेस्वार, गनफायटर, गुरांचे कळप, विस्तिर्ण पसरलेला गवताळ प्रदेश, द-याखो-या, जंगल, वाळवंट अशा प्रदेशातून तो वाचकांना कथेच्या ओघात फिरवायचा, पुस्तकात खिळवून ठेवायचा. ‘अनपुटडाऊनेबल’ अशी त्याची पुस्तकं आणि शैली होती. १९८८ मध्ये तो वारला पण, तोपर्यंत वाचकांनी त्याला डोक्यावर घेतलं होतं. जवळपास ९० कादंब-या, २६ कथासंग्रह, दोन आत्मकथनपर पुस्तकं आणि एक क वितासंग्रह इतकं साहित्य त्याने लिहून ठेवलं आहे.
समीक्षकांनी मात्र बहुतेकवेळा त्याच्या लिखाणाला नाकं मुरडली, हेटाळणी केली. अर्थात मुठभर समीक्षकांचे म्हणणे जिवाला लावून न घेता तो लिहित गेला हे बरचं झालं. समीक्षकांनी नाकारल्याचे शल्य त्याला खुपायचं. पण आपल्या लेखनशैलीवर, हातोटीवर त्याचा विश्वास होता. ओल्ड वेस्टचे इतिहासकालीन, स्थळकाळाचे अचूक संदर्भ, तपशील देणारे आपले लिखाण फुकट जाणार नाही, तो एक दस्ताऐवज ठरेल, याची त्याला जाणीव होती. त्यामुळेच समीक्षकांची टीका फारशी मनावर न घेता तो लिहित होता.मला गोष्ट सांगायला आवडते. पण मी कधीही कथेची रुपरेषा ठरवून लिहिलं नाही. एखादी व्यक्तीरेखा, प्रसंग घेऊन मी सुरुवात करतो. त्यामुळे पुढच्या पानावर काय घडतंय याची मलाही वाचकांइतकीच उत्कंठा असते.., असं सांगणा-या लुईने त्याच्या बहुतांशी लिखाणातून अमेरिकन कोऊबॉयचं रंजक चित्र वाचकांसमोर उभं केलं. अन्यायाची चीड आणि सत्याची चाड असलेले त्याचे कथानायक गनफायटर असायचे, कुठल्याही कठीण प्रसंगावर मात करण्याची उमेद घेऊन त्यांचा प्रवास सुरू असायचा. अराजक संपवून सुराज्य आणणारे, कोयद्याचे राज्य स्थापन करणारे, दुष्टांना शासन करणारे असे त्याचे कथानायक होते. लुईच्या अगोदरही अनेकांनी वेस्टर्न लिहिल्या. पण या पूर्वसूरींपेक्षा लुईचे कथानायक वेगळे होते. त्याच्या कथांमध्ये सेक्स, अश्लीलता, शिव्याशाप अजिबात नसायचे. वाचकांना जाणवायचे, आकर्षित करायचे ते या कथानायकांचे रांगडे मर्दानीपण. कुठल्याही प्रसंगातून निभावून जायची वृत्ती, प्रचंड आत्मविश्वास आणि पराकोटीची जिद्द. उधळलेल्या घोड्याला सहजी कोबूत आणणारा, खलनायकाला नामोहरम करणारा, परिस्थितीशी झुंज घेणारा कथानायक म्हणजे आपणच अशी अनुभुती वाचकांना देण्याची हातोटी लुईला साध्य होती. आजही त्याच्या प्रत्येक पुस्तकाची आवृत्ती पुन्हा-पुन्हा निघत असते आणि तडाखेबंद खपते त्याचे रहस्य हेच आहे. एका अंदाजानुसार आजवर त्याच्या पुस्तकांच्या ३० कोटींपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. शिवाय, इ-बुक, ध्वनीफीती इ. वेगळेच..
लॉस एंजल्समधील भल्या मोठ्या घरातील त्याच्या खोलीत बसून तो इलेक्ट्रॉनिक टाइपरायटरवर भराभर मजकूर हातावेगळा करायचा. मला लिहायला संपूर्ण शांतता लागते, अजिबात आवाज चालत नाही, नाहीतर लिंक तुटते.. असा कोणताही भावखाऊपणा न करता तो लिहीत असे, आठवडय़ाचे सातही दिवस सकाळी सात वाजता लुइ टाइपरायटरसमोर असायचाच. पल्प फिक्शन मासिकं, पेपरबॅक ते चित्रपट असा प्रवास करणा-या त्याच्या पुस्तकांनी त्याला इतकी लोकप्रियता मिळवून दिली की त्याला पुढे वेगळ्या प्रसिद्धीची गरजच उरली नाही. लोक खुशाल, ‘लुइ ल’मोर, लेखक, लॉस एंजल्स’ एवढाच पत्ता लिहून त्याला पत्रं पाठवायचे आणि त्याला ती मिळायचीही. त्याचं संपूर्ण घर पुस्तकांनी भरलं होतं. ही पुस्तकं होती सुमारे दहा हजार. त्याच्या संदर्भबहुल, वास्तवपूर्ण लिखाणासाठी आवश्यक अशी ही बहुतेक पुस्तकं होती.आठवड्याचे सातही दिवस त्याचा हात लिहिता असे. एक पुस्तक संपलं की लगेच त्याच दिवशी तो दुस-या कादंबरीची, कथेची सुरुवात करत असे. मला खूप लिहायचं आहे, सांगायचं आहे, असं सांगणा-या लुइचं बहुतेक लिखाण हे अनुभवसिद्ध असं होतं. नॉर्थ डकोटा प्रांतातील जेम्सटाऊनमध्ये लहानाचा मोठा होताना त्याची खऱ्याखु-या कोऊबॉय मंडळींशी गाठ पडत होती. त्यांचे अनुभव तो मनात साठवून ठेवत होता. पंधराव्या वर्षी जगाचा अनुभव घेण्यासाठी लुइ बाहेर पडला. खलाशी, मुष्टीयोद्धा, कोऊबॉय, सर्कसमधील हत्तींचा माहूत अशी अनेक कोमे त्याने प्रत्यक्ष केली. दुस-या महायुद्धातही तो आघाडीवर लढला होता. चीन, भारत, सिंगापूर, युरोप, इजिप्त, दक्षिण आफ्रिका अशा देशोदेशींच्या भटकंतीत अनेक विलक्षण अनुभवांचा खजिनाच त्याच्याकडे जमा होत होता. हे सारे पुढे त्याने लिखाणात कामी आणलं. या कोळातही तो सतत वाचत असे, नोंदी करत असे. याच भटकंतीदरम्यान त्याने मुष्टीयोद्धा म्हणून अनेक लढती जिंकल्या. सहा फूट उंची, सडसडीत, चपळ शरीरयष्टी लाभलेल्या लुईने त्याच्या या भटकंतीत, जगातील सर्वात खतरनाक, गुंडागर्दीचे रस्ते म्हणून मुंबईतील ग्रँड रोडचा (ग्रँट रोड?) उल्लेख केला आहे. या सगळ्यांतून तावून-सुलाखून बाहेर पडलेल्या लुइच्या कथांमध्येही चिवटपणे तगून राहण्याचे एक सूत्र नेहमी आढळते ते बहुधा याच स्वानुभवांमुळे.
या भटकंतीतही आपल्याला लेखक व्हायचेय याचा त्याला क्षणभरही विसर पडला नव्हता. प्रारंभी कोहीतरी बारीकसारीक लिहिणा-या लुईचं पहिलं पुस्तक होतं ते एक कवितासंग्रह. १९३० च्या सुमारास हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि युद्धाला तोंड फुटलं. आघाडीवर लढून परतलेल्या लुईनं मग वेस्टर्न्स लिहायला सुरुवात केली. पहिल्याच पानावर, पहिल्याच ओळीत किंवा परिच्छेदात अॅक्शनला सुरुवात व्हायला हवी तरच वाचक खिळून राहू शकतो, हे त्याचे अनुभवसिद्ध बोल होते. बँटम बुक्स ही त्याची पुस्तकं प्रसिद्ध करणारी कंपनी. त्यांच्याकडेही त्याने प्रारंभी, मी एक लोकप्रिय लेखक होणार आहे. मला करारबद्ध केलंत तर तुमचाच फायदा आहे, अशी आत्मविश्वासपूर्ण भलामण केली. बँटमने त्याच्याशी करार केला आणि ‘होंडो’ प्रसिद्ध झाली. एका गोष्टीवेल्हाळ माणसाला ख-या अर्थानं सूर सापडला..मुंबईत आजही जुन्या पुस्तकांच्या दुकानात, पदपथांवर त्याची पुस्तकं साठ-सत्तर रुपयांच्या खाली मिळत नाहीत. ‘लास्ट ऑफ द ब्रीड’ कादंबरीसाठी मला माटुंग्याच्या एका पुस्तकवाल्याने १०० रुपये मोजायला लावले होते. तरीही माझ्यासारख्याच अनेकांची पावलं पदपथावर मांडलेल्या पुस्तकांमध्ये, ल’मोरचं पुस्तक दिसल्यावर थबकतातच.
टीकाकारांनी कितीही नाकं मुरडली तरी आपल्यानंतरही ही पुस्तकंच आपलं नाव टिकवून ठेवतील याची त्याला खात्री होती. ‘कोण कोय म्हणतं याची मी आता अजिबात पर्वा करत नाही. कुत्रे भुंकत राहिले तरी हत्ती आपल्या चालीने चालतच असतो या उक्तीसारखं झालं आहे आता.. माझं लिखाण हे उत्कृष्ट साहित्य आहे आणि माझ्यानंतर शंभर वर्षांनीही माझी पुस्तकं वाचली जातील एवढं नक्की.’, लुइचं हे म्हणणं त्याच्या चाहत्या वाचकांनी शंभर टक्के खरं ठरवलं आहे.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा