न्याय म्हणजे काय?
अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते अमर्त्य सेन यांनी संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात 2008मध्ये प्रा. हिरेन मुखर्जी यांच्या स्मरणार्थ व्याख्यान देताना ‘न्याय’ या तत्त्वाचा ऊहापोह केला होता. यांचं हे भाषण ‘द आयडिया ऑफ जस्टिस’ या नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाचा हा आढावा..
‘देशात होत असलेल्या अन्यायांचे निराकरण करणे गरजेचे आहे. उपासमार आणि कुपोषणामुळे जाणारे बालकांचे बळी आरोग्यसेवेतील उणिवा, शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणातील अपयश आणि भयावह दारिद्र्य.. या अन्यायांचे निवारण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. लोकशाही म्हणजे फक्त निवडणुका नव्हेत; खुले मानवी व्यवहार हाच लोकशाहीचा गाभा असतो.’ हे विवेचन केले होते अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते डॉ. अमर्त्य सेन यांनी. संसदभवनातील मध्यवर्ती सभागृहात 10 ऑगस्ट 2008 रोजी प्रा. हिरेन मुखर्जी यांच्या स्मरणार्थ संसदीय व्याख्यान देताना त्यांनी ‘न्याय’ या तत्त्वाचा ऊहापोह करत देशातील जळजळीत वास्तवाकडे कायदेमंडळाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर वर्षभराने त्याचे ‘द आयडिया ऑफ जस्टिस’ (न्यायाचा विचार) हे पुस्तक प्रकाशित झाले.अमर्त्य सेन यांना असलेली अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड हाच या तत्त्वचर्चात्मक कृतीचा आधार आहे. जगात भेदभाव आहेत, विषमता आहे, पिळवणूक आहे, दडपणूक आहे. या प्रकारच्या अनेक अन्यायांवर उपाययोजना करणे शक्य आहे; त्यांचे निराकरण आपण केलेच पाहिजे, अशी मांडणी ते करतात. मानवी सद्वर्तनाच्या क्षमतेवर त्यांचा अढळ विश्वास आहे. याच पायावर व्यापक, विवेकपूर्ण लोकसंवादाच्या प्रक्रियेद्वारे याच समाजात अनेक अन्यायांचे निवारण करता येईल, अशी त्यांना खात्री वाटते. विविध नियमनकारी संस्था आणि कायदे-नियमांच्या अमलातूनच ‘न्याय’ मिळतो, हा सिद्धान्त त्यांना पूर्णत: अमान्य आहे.
सामाजिक व्यवहारांचे नियमन करण्यासाठी विविध संस्था आणि आचारसंहिता-कायदे अनिवार्य असतात. अशा ‘पारलौकिक संस्था’ अस्तित्वात नसल्यास अराजक माजेल. हे अराजक टाळण्यासाठी जनसमूहांनी एकत्र येऊन ‘सामाजिक करार’ करणे अटळ ठरते. या विचारव्यूहातूनच ‘पारलौकिक संस्थावाद’ (ट्रान्सेंडेंटल इन्स्टिटय़ूशनलिझम) हे तत्त्व पुढे आले. थॉमस हॉब्ज, जॉन लॉक, ज्यां-ज्याक रुसो, इम्मानुएल कांट यांनी प्रतिपादित केलेला हा विचार जॉन रॉल्स या तत्त्वचिंतकाने आणखी विकसित केला. मात्र हे प्रतिमान दोषपूर्ण आणि अंतिमत: प्रतिगामी सिद्ध होणारेच आहे, अशी भूमिका मांडत डॉ. सेन यांनी पर्यायी सिद्धान्ताचे मंडन केले आहे. समाजातील अन्याय दूर करण्यासाठी नियमनकारी संस्थांच्या चौकटीतील आदर्श समाजव्यवस्था अस्तित्वात येण्याची प्रतीक्षा करणे चुकीचे आहे. त्यापेक्षा अन्यायांचे निराकरण करण्यासाठी, त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी कार्यप्रवण झाले पाहिजे, असे ते ठामपणे सांगतात. अॅडॅम स्मिथ, माक्र्विस द काँदोर्से, जेरेमी बेंथॅम, मेरी वोल्स्टनक्राफ्ट, कार्ल मार्क्स, जॉन स्टुअर्ट मिल आदी तत्त्वचिंतकांचा मार्ग अनुसरतात.
सामाजिक न्याय हा विशिष्ट समुदायापुरताच संकुचित नसावा, सर्वसमावेशक आणि मूलभूत मानवी स्वातंत्र्ये तसेच अधिकारांची निश्चिती करणारी असावा. व्यापक, माहितीपूर्ण, बुद्धिप्रामाण्यवादी सामाजिक संवाद आणि विवेकयुक्त विचारविनिमयाची क्षमता समाजाला न्यायाभिमुख करण्यात कळीची भूमिका बजावतात, असे डॉ. सेन यांचे म्हणणे आहे.
रॉल्स व त्याच्या पूर्वसुरींनी मांडलेला ‘पारलौकिक संस्थावाद’ म्हणजे अंधाऱ्या खोलीत काळ्या मांजरीचा (ती अस्तित्वात नसताना) शोध घेण्यासारखेच आहे, अशी टिप्पणी त्यांनी एका व्याख्यानात केली होती. आदर्श संस्था अस्तित्वात आल्यानंतरच अन्यायांचे निराकरण होईल, असे गृहीत धरून आपण स्वस्थ बसलो तर काहीच होणार नाही. त्यापेक्षा अन्यायमूलक स्थिती बदलण्यासाठी कार्यशील होणे आवश्यक असते. याच मार्गाने अनेक सामाजिक सुधारणा घडल्या आहेत, असे ते निदर्शनाला आणून देतात. म्हणूनच व्यक्ती व जनसमूह कोणत्या प्रकारचे जीवन जगू शकतात, त्या क्षमता ओळखणारा विचार अंगीकारणे-व्यवहारात आणणे आवश्यक ठरते. बहुविध विचारांच्या समावेशाला मुभा देणाऱ्या या सिद्धान्ताला ते ‘मूर्तता-आधारित तुलनात्मकता’ (रिअलायझेशन-बेस्ड कंपॅरिझन) असे संबोधन देतात.
मानवी स्वातंत्र्ये आणि अधिकारांच्या परिप्रेक्ष्यात ‘न्याय’ या तत्त्वाची चर्चा करताना डॉ. सेन यांनी केवळ पाश्चिमात्य तत्त्ववेत्ते आणि तत्त्वज्ञानाचीच सामग्री वापरलेली नाही तर पौर्वात्य-भारतीय तत्त्वविचार आणि सामाजिक व्यवहाराच्या समृद्ध वारशाचा भक्कम आधार घेतला आहे, चपखल दाखले दिले आहेत. गौतम बुद्धाची करुणा, अशोकाची न्यायवृत्ती, अकाराची सहिष्णुता आणि गांधीजींची अहिंसा ही चतु:सूत्री त्यांच्या वैचारिक भूमिकेचे आवश्यक आधारस्तंभ असल्याचे ठळकपणे दिसते.
‘द आयडिया ऑफ जस्टिस’ हे प्रबंधात्मक लेखन म्हणजे डॉ. अमर्त्य सेन यांच्या आजवरच्या विचार-व्यवहाराची सारभूत परिणती आहे. गरिबी, उपासमार, विषमता, शिक्षण, आरोग्य हे त्यांच्या चिंतनाचे मुख्य विषय या ग्रंथातील तत्त्वचर्चेत केंद्रस्थानी असणार, हे ओघाने आलेच. आपल्या प्रबंधाचे मंडन आणि विरोधी तत्त्वप्रणालीचे खंडन करताना डॉ. सेन यांनी केलेली संयत चर्चा त्यांच्या आग्रही पण अनाक्रमक व्यक्तिमत्त्वाची साक्ष देते. वादविवाद करतानाही प्रतिपक्षाचा आदर करण्याच्या, विरोधकाचेही वैचारिक ऋण मान्य करत मित्रभाव जपण्याच्या (हे पुस्तक त्यांनी रॉल्स यांना अर्पण केले आहे.) त्यांच्या प्रगल्भतेकडून खूप काही शिकता येईल.
न्याय ही संकल्पना केवळ न्यायालयासारख्या संस्था-प्रणालीशीच निगडित नाही तर लोकसंवासाचा-सार्वजनिक चर्चेचा विषय आहे. समाजव्यवस्थेत न्यायीपणा रुजवण्यासाठी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, तो दूर करण्यासाठी शक्य असलेल्या सर्व उपाययोजना करणे गरजेचे असते. सामाजिक खुलेपणा, निर्बंधमुक्त मानवी व्यवहार आणि तर्कसंगत लोकसंवादातूनच ‘न्यायपूर्ण’ समाजाकडील वाटचालीला बळ मिळते, असे विवेचन डॉ. सेन करतात.
भारताच्या वेगवान आर्थिक प्रगतीचे ढोल-ताशे बडवले जात असताना, उद्याची महाशक्ती असल्याचा पुकारा केला जात असताना देशातील 100 कोटींपैकी 80 कोटी जनतेला दरडोई 20 रुपयांपेक्षा कमी उत्पन्नात दररोजचा दिवस ढकलावा लागतो आहे. हे दु:सह्य जिणे शहरी गर्भश्रीमंत, नवश्रीमंत आणि ग्रामीण धनदांडग्यांच्या खिजगणतीतही नसते. त्यांच्या ‘इंडियन’ नंदनवनाशी या ‘भारतीय’ नरकपुरीचा कसलाही संबंध नसतो. ‘भारत हा जगातील सर्वात भुकेकंगाल आणि कुपोषित लोकांचा देश आहे. काही आफ्रिकी देशांपेक्षाही भारताची स्थिती दयनीय आहे,’ अशी स्पष्टोक्ती अमर्त्य सेन यांनीच दोन वर्षापूर्वी केली होती. हे जळजळीत वास्तव सदोदित ध्यानात ठेवूनच ‘द आयडिया ऑफ जस्टिस’ हाती घ्यावे.
न्यायाच्या मागण्या, तत्त्वचर्चेचे आकार, न्यायाची सामग्री, लोकशाही आणि सार्वजनिक विचारविनिमय अशा चार भागांचा समावेश असलेल्या, 400पेक्षा जास्त पानांचा हा ग्रंथ वाचायला हवा, हे खरेच. पण हा प्रबंध ‘ईझी रीड’ नाही, असा इशारा नक्कीच द्यावासा वाटतो. बदलापूर किंवा कसारा किंवा पनवेल ते बोरीबंदर आणि विरार ते चर्चगेट, असा धकाधकीचा दुतर्फा ‘लोकल’प्रवास करतानाच वाचनाची मुभा असलेल्या असंख्यांसाठी तर हे आणखीच कठीण कार्य. ही तत्त्वचर्चा समजून घेण्यासाठी झटापट तर करावी लागणारच. पण या वैचारिक परिश्रमानंतर एखादे ‘आग्र्युमेंट’ समजल्यावर मिळणारा आनंदही अवर्णनीयच असतो. म्हणून हा ‘प्रवास’ सुरू करायलाच हवा.
‘द आयडिया ऑफ जस्टिस’ या पुस्तकात अमर्त्य सेन यांनी वेगवगळ्या विषयांवर केलेल्या चिंतनाचा हा सारांशलोकशाहीचा ताळेबंद-
भारतातील लोकशाहीने राज्यकर्त्यांना प्रदान केलेल्या संरक्षणात्मक कवचामुळे नैसर्गिक संकटांच्या काळात बाधितांपर्यंत मदत पोहोचवणे सुकर झाले आहे. मात्र लोकशाहीचा व्यवहार आणि आवाका मर्यादित असू शकतो; भारतात लोकशाहीने सकारात्मक भूमिका बजावली असली तरी हा थिटेपणा प्रकर्षाने जाणवतोच. दीर्घकाळापासून भेडसावणा-या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी धोरणात्मक बदलाची आवश्यकता असते. असा बदल घडवून आणण्याच्या हेतूने सरकारवर दबाव आणण्याची संधी विरोधकांना लोकशाहीमुळेच प्राप्त होते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण, प्राथमिक आरोग्य सेवा, बालकांचे पोषण, अत्यावश्यक जमीन सुधारणा आणि स्त्री-पुरुष समानता अशा विविध क्षेत्रांतील दुर्बल धोरणांची संपूर्ण जबाबदारी फक्त सरकार आणि प्रशासकीय अनास्थेवर टाकता येत नाही. सार्वजनिक क्षेत्रातील वैचारिक घुसळणीचा, संवादाचा अपुरेपणा तसेच सामाजिक इच्छाशक्तीचा दुबळेपणा आणि विरोधकांच्या दबावाची प्रभावहीनता, हे घटकही या स्थितीला कारणीभूत असतात. म्हणूनच लोकशाहीची लक्षणीय कामगिरी आणि तेवढेच ठळक अपयश, अशा ताळेबंदाचे भारत हे उत्कृष्ट उदाहरण ठरते. लोकशाही प्रणातील वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या संधी ब-याच अंशी वाया दवडल्या जातात. येथे नितांत गरज भासते, ती निवडणूक‘नीती’च्या पलीकडे जाऊन लोकशाही ‘न्याय’ अमलात आणण्याची.
अन्यायाविरुद्ध बंड-
न्यायाचे तत्त्व पूर्णत: अमलात आणण्यात जग कमी पडले असल्याची जाणीव आपल्याला असतेच; किंबहुना बहुतेकांची तशी अपेक्षाही नसते. परंतु आपल्या अवतीभवती दिसणारे नानाविध स्वरूपांचे अन्याय दूर व्हावेत, अशी आपली इच्छा असते. या अन्यायांचे निराकरण करणेही शक्य असल्यानेच आपण कार्यप्रवृत्त होतो. दैनंदिन जीवनातही अनेक प्रकारचे अन्याय सहन करावे लागतात, दडपणुकीमुळे कोंडमारा होतो-क्रोध येतो. आपण राहात असलेल्या विस्तीर्ण जगात तर अशा अन्यायांचे क्षेत्र आणखी विस्तीर्ण असणारच. असे ढळढळीत अन्याय मिटवून टाकण्याची तळमळ नसती तर पॅरिसच्या रहिवाशांनी बास्तीयवर कूच केले नसते, ज्या साम्राज्यावर सूर्य कधीच मावळत नव्हता, त्या साम्राज्याला गांधीजींनी आव्हान दिले नसते आणि ‘मुक्तजनांची भूमी व शूरवीरांचे निधान’ असलेल्या देशात मार्टिन ल्युथर किंग यांनी गोऱ्यांच्या वर्चस्ववादाविरुद्ध संघर्षही पुकारला नसता. त्यांचा खटाटोप परिपूर्ण न्यायी जग अस्तित्वात आणण्यासाठी नव्हता (अशा जगाच्या संभाव्य स्वरूपाबद्दल सहमती असल्यास), तर जेवढे शक्य आहेत तेवढे अन्याय दूर करणे, हाच त्यांचा उद्देश होता. निराकरण शक्य असलेल्या अन्यायांची ओळख पटणे, हे आपल्याला न्याय आणि अन्याय या संकल्पनांबद्दल विचारप्रवण करते, हे खरेच. न्यायविषयक सिद्धान्ताचेही तेच मध्यवर्ती सूत्र आहे.
मानवी सद्वर्तन आणि सामाजिक संस्था
समाट अशोकाची सामाजिक न्यायाची संकल्पना अतिशय व्यापक होती. प्रजेचे कल्याण आणि स्वातंत्र्याला प्राधान्य देणे, हे शासन, समाज आणि प्रत्येक व्यक्तीच्या हिताचे असते, अशी त्याची धारणा होती. त्याचबरोबर, नागरिकांच्या स्वेछापूर्ण सद्वर्तनाच्या आधारावरच सामाजिक समृद्धीचे उद्दिष्ट गाठता येईल-त्यासाठी जारदस्ती करता कामा नये, असा ठाम विश्वासही होता. नागरिकांमध्ये एकमेकांप्रति आंतरिक जिव्हाळा, सद्भाव वृद्धिंगत करणे, या महत्कार्याने त्याच्या कारकीर्दीचा मोठा भाग व्यापला होता. देशात अनेक ठिकाणी असलेले शिलालेख याचीच साक्ष आजही देतात.
जवळपास संपूर्ण भारतावर एकछत्री सत्ता स्थापन करणारा पहिला सम्राट आणि मौर्य राजवटीचा उद्गाता चंद्रगुप्त हा अशोकाचा आजोबा. चंद्रगुप्ताचा महाअमात्य कौटिल्य आणि अशोक यांचे विचारव्यूह मात्र परस्परविरोधी होते. मानवी वर्तन हे अशोकाच्या विचारसरणीचे सारतत्त्व होते. तर सामाजिक संस्थांची उभारणी आणि नियमांच्या अमलबजावणीवर कौटिल्याचा भर होता. कौटिल्याने इसवी सनापूर्वी चौथ्या शतकात लिहिलेल्या ‘अर्थशास्त्र’ या जगविख्यात प्रबंधात सामाजिक संस्थांचे महत्त्व, यशस्वी राजकारण आणि अर्थकारणातील त्यांची भमिका इत्यादी मुद्याचे तपशीलवार विवेचन केले आहे. चांगल्या वर्तनाची निश्चिती करण्यासाठी निर्बंध आणि प्रतिबंध हे केवळ महत्त्वाचे नव्हे; तर अनिवार्य घटक आहेत, असे तो बजावतो. समाजात न्यायीपणा दृढ करण्यासाठी संस्थांचे माध्यम आवश्यक असल्याची मांडणी त्याने केली. पण मानवात अंगभूत चांगुलपणा असतो; भौतिक प्रलोभने, निर्बंध आणि शिक्षा यांचा वापर न करताही प्रजाजनांत स्वेच्छेने सद्वर्तन करण्याची क्षमता असते, या तथ्याची त्याने फारशी दखल घेतली नव्हतीच.
सहिष्णुतेचा जागर
अकाराने सामाजिक आणि राजकीय मूल्यव्यवस्था तसेच न्याययंत्रणा आणि सांस्कृतिक व्यवहारांची कसून छाननी आरंभली. सोळाव्या शतकातील बहुसांस्कृतिक भारतात सामाजिक सलोखा आणि एकोपा वृद्धिंगत करण्यावर त्याने लक्ष केंद्रित केले. युरोपात धर्माधतेचा वणवा भडकला असताना भारतात मात्र धार्मिक सहिष्णुतेचा जागर अकाराने चालवला होता. कोणालाही कोणताही धर्म स्वीकारण्याची मुभा असली पाहिजे असे सांगणा-या अकबराने आगरा या आपल्या राजधानीत हिंदू-मुस्लिम-ख्रिस्ती-जैन-पारसी-ज्यू अशा धर्मानुयायांसह अज्ञेयवादी आणि नास्तिक यांच्यातही तत्त्वचर्चा घडवल्या. नियोजनपूर्वक संवादाचे पूल उभारले. अनेक धर्माचे अस्तित्व ध्यानात घेऊन राज्यकारभारात धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक तटस्थता प्रस्थापित करण्याच्या हेतूने विविध उपाययोजना केल्या. त्याच्या राजवटीत झालेल्या धर्मनिरपेक्षतावादाच्या पायाभरणीचे प्रकटीकरण स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेतही झालेले दिसते.
आपल्या पूर्वसुरींनी मुस्लिमेतर प्रजाजनांवर लादलेले विशेष कर अन्यायकारक आणि पक्षपाती असल्याचे स्पष्टपणे सांगत ते रद्द करण्याचे पाऊल अकबराने उचलले. शाही गुलामांना मुक्त करण्याचे फर्मानही त्याने 1582मध्ये काढले. त्या काळात प्रचलित असलेल्या आणि आजही उपखंडातून पूर्णत: निर्मूलन न झालेल्या बालाविवाह प्रथेचा तो कट्टर विरोधक होता. हिंदू समाजातील विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार नाकारण्याच्या रूढीवर त्याने कडक टीका केली होती. (हिंदू विधवांना हा अधिकार मिळण्यासाठी आणखी काही शतके उलटावी लागली). मुस्लिम कुटुंबातील मुलीस पैतृक मालमत्तेतील अत्यल्प हिस्सा वारसाहक्काने दिला जात असे. ही प्रथा मोडीत काढून कन्येला मोठा हिस्सा मिळावा, अशी ठाम भूमिका त्याने मांडली होती.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा