PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: अनुभवाचा शोध हेच साहित्य! अनुभवाचा शोध हेच साहित्य! ================================================================================ अनुवाद-मुकुंद कुळे on 09 August, 2010 06:30:00 AM ‘सार्थ’, ‘आवरण’सारख्या लोकप्रिय ऐतिहासिक कादंब-यानंतर तुम्हाला अचानक समकालीन विषयावरची ‘कवलु’सारखी कादंबरी का लिहाविशी वाटली? - ऐतिहासिक की सामाजिक असे प्रश्न कुठल्याही सर्जनशील व्यक्तीला पडत नाहीत. जगत असताना येणारे अनुभव तो घेत असतो. ते सारं त्याच्या मनात साठवलं जात असतं. ते कलाकृती म्हणून जेव्हा बाहेर येतं, तेव्हा त्याला ऐतिहासिक-सामाजिक असं नामाभिधान मिळतं. परंतु शेवटी कुठलंही साहित्य म्हणजे माणसाला येणा-या अनुभवांचा निरंतर शोध असतो. त्या अनुभवांतूनच तो व्यक्त होत असतो. ‘कवलु’मध्ये तुम्ही पाश्चात्त्य आचारा-विचाराने प्रभावित झालेली भारतीय जीवनशैली आणि लग्नसंस्थेचा समाचार घेतला आहे. विधुर उद्योगपती आणि घटस्फोटित महिला प्राध्यापक यांच्या दोन समांतर कथा सांगताना त्यांच्या माध्यमातून तुम्ही एकूणच कुटुंब व्यवस्था, लग्नसंस्था आणि सेक्स या समाज बांधणीसाठी महत्त्वाच्या असलेल्या तीन गोष्टींचा वैचारिक वेध घेतला आहे. तसंच या कादंबरीत तुम्ही स्त्री, स्त्री-वाद या विषयांनाही हात घातलाय. स्त्रियांसंबंधीच्या कायद्यांचीही विस्तृत चर्चा केलीय. या विषयावर कादंबरी लिहावं असं का वाटलं? - मनाशी काही ठरवून मी ही कादंबरी लिहिलेली नाही. आता महिलांसाठी विविध नवीन कायदे झालेले आहेत. त्याचा महिलांना मोठा फायदाही मिळत आहे. वडिलोपार्जित इस्टेटीत आता तिचा हक्कही राखून ठेवण्यात आला आहे आणि ते बरोबरच आहे. त्यामुळे समाजात स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी महिलांना मदतच होतेय. परंतु नवीन कायदे निर्माण केल्यावरही सरकारने जुने कायदे तसेच ठेवलेत, ते कशासाठी? तसंच नवीन कायदा अस्तित्त्वात आल्यावर अनेक जण त्याचा गैरफायदा घेत आहेत, त्याचं काय? केवळ एका विवाहितेनं साधी तक्रार केल्यावर नवरा-सासू-सासरा, दीर-भावजय या सा-यांना लगेच आत टाकलं जातं. एवढंच नाही, तर त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जातो, हे कितपत योग्य आहे? एका विवाहितेच्या तक्रारीने तुरुंगाआड जाणा-यांमध्येही महिलाच असतात. म्हणजे महिलांसाठी केलेला कायदा महिलांनाच जाचक ठरतोय. मुख्य म्हणजे 498-अ सारख्या कायद्यामुळे समाज व्यवस्था विस्कळीत होत चाललीय. म्हणजे विवाहित महिलांसाठी संरक्षक ठरणारा कायदा इतर सर्वसामान्य जनतेसाठी मात्र असंस्कृत ठरतोय. या सा-याविरुद्ध कुणी तरी बोललं पाहिजे. तसंच पाश्चात्त्य जीवनशैलीचा भारतीय समाजव्यवस्थेवरच फक्त प्रभाव पडलेला नाही, इथले कायदेदेखील पाश्चात्त्यांच्या अनुकरणातून बनत आहेत. या सा-याची दखल घेण्याच्या प्रयत्नांतूनच ‘कवलु’ आकाराला आलेली आहे. पाश्चात्त्यांच्या अनुकरणातून आता भारतातही ‘लिव इन रिलेशनशिप’ किंवा विवाहबाह्य संबंध सर्रास ठेवले जात आहेत. तुम्ही ‘कवलु’मध्ये या सा-या प्रश्नांचा समावेश केलेला आहे. यासाठी तुम्ही ‘सेकंड सेक्स’सारखी अनेक पुस्तकंही वाचलीत. किती प्रभावित झालात तुम्ही या पुस्तकांनी? - केवळ ‘सेकंड सेक्स’ नाही, तर गेल्या तीस वर्षात पाश्चिमात्त्य जगात प्रसिद्ध झालेली तिथल्या स्त्रीवादी साहित्यिकांची मी अनेक पुस्तकं वाचली आहेत. आता या पुस्तकाच्या निमित्ताने काहींचं पुनरावलोकनही केलं. परंतु ही पुस्तकं वाचल्यावर किंवा गेल्या काही वर्षात महिलावाद्यांनी कथा-कादंबरी-नाटकासारख्या माध्यमातून पुरुषवर्गावर जो अस्त्रांचा मारा सुरू केलाय, त्यामुळे पुरुषवर्गाचा आत्मविश्वास डळमळीत होत चालला आहे. कॅथलिन पार्करने लिहिलेल्या ‘सेव्ह द मेलस्: व्हाय मेन मॅटर, व्हाय वुमन शोड केअर’(रॅण्डम हाऊस, न्यूयॉर्क,2008) अशा पुस्तकातून पुरुषांचं चुकीचं चित्र उभं केलं जात आहे. हे एकप्रकारे त्यांचं खच्चीकरणच आहे. हे सातत्याने होत असल्यामुळे केवळ शिक्षणच नव्हे, तर उद्योगासारख्या क्षेत्रातूनही पुरुषवर्ग बाहेर फेकला जात आहे. हे सातत्यानं असंच सुरू राहिलं, तर एक पिढीच उद्ध्वस्त होईल. पुरुषांना टीकेचं लक्ष्य करताना स्त्रीवाद्यांनी न्यायालय आणि कायद्याचाही आधार घेतल्यामुळे पुरुषांची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे. ही कोंडी फुटली नाही, तर पुरुषवर्ग अस्ताव्यस्त होईल. ‘कवलु’ कादंबरीत मी या सा-या प्रश्नांचा बारकाईने उहापोह केला आहे. माझी कादंबरी स्त्री-विरोधी किंवा पुरुषांच्या बाजूने नाही. मी सद्यकालीन कौटुंबिक, वैवाहिक, सामाजिक परिस्थितीचा विचार करून त्यावर भाष्य केलेलं आहे. या कादंबरीसाठी तुम्ही विविध विवाह कायद्यांचाही बारकाईने अभ्यास केलेला आहे का? - ते कायदे मी अगदी बारकाईने वाचलेले आहेत. पण आताच्या हिंदू विवाह कायद्यात ‘हिंदू’ या शब्दाचा अंश किती राहिलाय याबद्दल शंकाच आहे. आपले सध्याचे सगळेच विवाह कायदेही पाश्चात्त्यांच्या अनुकरणातून बनलेले आहेत. पण मी केवळ कायदेच वाचलेले नाहीत. या विषयांवर कायद्याच्या अभ्यासकांनी दिलेली व्याख्यानंही ऐकलीत. या सा-याचा सारासार विचार करूनच मी त्यांचा माझ्या कादंबरीत वापर करून घेतला आहे. ‘आवरण’ला वाचकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आणि आता ‘कवलु’ला देखील वाचकांची मोठीच दाद मिळत आहे. किंबहुना आजवर आपल्या सगळ्याच साहित्याला वाचकांनी डोक्यावर घेतलेलं आहे. वाचकांच्या या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल काय म्हणाल? - या प्रतिसादाबद्दल मी वाचकांचा आभारी आहे, ऋणी आहे. माझ्या कलाकृती वाचकांना आवडतात, कारण त्यात केवळ तंत्र किंवा केवळ रस नसतो. कुठलीही कलाकृती तंत्रदृष्ट्या अजोड असायला हवीच. पण त्याचबरोबर त्यात रसाचा परिपोषही हवा. तसंच निव्वळ रस असेल आणि साहित्यकृती म्हणून तिला काही आकार नसेल, तर ती वाचकांना आवडणार नाही. तेव्हा तंत्र आणि रसाचा योग्य सुमेळ असेल तरच ती साहित्यकृती वाचकांना भावते आणि अशी साहित्यकृती लिहिण्याकडेच माझा नेहमी कल असतो. तसंच कुठलीही मोठी साहित्यकृती लिहिताना अनुभवही तेवढाच मोठा असला पाहिजे. माझी प्रत्येक साहित्यकृती ही मोठ्या अनुभवातूनच साकार झालेली आहे. म्हणूनच तिला वाचकांचा प्रतिसाद मिळत आलाय. (‘उदयवाणी’ या कन्नड दैनिकात प्रसिद्ध झालेल्या एस. एल. भैरप्पा यांच्या मुलाखतीचा स्वैर अनुवाद)