भैरप्पा, ‘आवरण’ आणि ‘कवलु’
एस. एल. भैरप्पा हे सिद्धहस्त आणि यशस्वी कादंबरीकार आहेत. या प्रकारावर त्यांची कमालीची पकड आहे. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही कादंबरीची रचना अतिशय बांधेसूद आणि मजबूत असते. त्यामुळे निव्वळ कलाकृती म्हणून त्यांची कादंबरी वाचनीय ठरतेच. ‘आवरण’ आणि ‘कवलु’ या कादंब-याही निव्वळ कलाकृती म्हणून चांगल्या आहेतच, पण कादंबरीचा आधार घेत भैरप्पा जे काही सांगू पाहत आहेत, ते मात्र त्यांच्या सद्हेतूविषयी शंका निर्माण करणारे आहे.
एस. एल. भैरप्पा हे गेली तीस-चाळीस वर्षे कन्नडमधील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार मानले जातात. गेल्या चाळीस वर्षात त्यांनी तब्बल 21 कादंब-या लिहिल्या आहेत. आणि त्यातील जवळपास सर्वच लोकप्रिय ठरल्या आहेत. पर्व, मंद्र, वंशवृक्ष, सार्थ अशा काही कादंब-यांचे मराठी, इंग्रजी आणि इतर भारतीय भाषेतही अनुवाद झाले आहेत. या भाषेतही भैरप्पांच्या कादंब-यांनी मोठी लोकप्रियता मिळवली आहे. परंतु गेल्या तीन-चार वर्षात मात्र भैरप्पांच्या कादंब-या कन्नडमधील आणि इतर भाषेतील मान्यवर साहित्यिकांच्या टीकेचे लक्ष्य होत आहेत. त्यामुळे भारतातील सर्वात आघाडीचा हा कादंबरीकार वादाचा विषय होतो आहे.
भैरप्पा आपल्या प्रत्येक कादंबरीसाठी भरपूर मेहनत घेतात. तो विषय पूर्णपणे समजून घेतात. त्यावरील मिळतील तेवढी पुस्तके वाचतात, मान्यवर अभ्यासकांशी चर्चा करतात. ‘पर्व’ ही बहुचर्चित कादंबरी लिहिण्याआधी भैरप्पा तब्बल साडेसहा वर्षे केवळ महाभारतकालीन पुस्तकांचेच वाचन करत होते,हे एकच उदाहरण या संदर्भात पुरेसे ठरावे. मूलत: तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि प्राध्यापक असणारे भैरप्पा लेखन हाच आपला धर्म मानतात.
मग असे असताना भैरप्पांच्या अलीकडच्या कादंब-या वादग्रस्त का ठरत आहेत? यू. आर. अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, चंद्रशेखर कंबार, जी. के. गोविंद राव यांच्यासारखे मान्यवर कन्नड साहित्यिक त्यांच्या कादंबऱ्याविषयी अतिशय तिखट प्रतिक्रिया का देत आहेत? या प्रश्नांची उत्तरे भैरप्पा यांच्या कादंब-यांमधेच सापडतात. भैरप्पांच्या विचारनिष्ठा एका राजकीय विचारधारेशी निगडीत असल्याचे या कादंब-यांमधून दिसून येते, तसेच आपलीच विचारधारा पुढे रेटण्यासाठी ते ज्या गृहितकांचा, मांडणीचा आधार घेत आहेत, तोही संशयास्पद ठरतो आहे. अडीच वर्षापूर्वी प्रकाशित झालेली ‘आवरण’ आणि गेल्या महिन्यात प्रकाशित झालेली ‘कवलु’ या कादंब-या वाचल्यावर त्याची खात्रीच पटते.
भैरप्पा यांची ‘आवरण’ फेब्रुवारी 2007 मध्ये प्रकाशित झाली. 2009 पर्यंत या कादंबरीची 22 पुनर्मुद्रणे झाली. शिवाय या कादंबरीवर या तीन वर्षात कर्नाटकात एकंदर दहा चर्चासत्रे झाली. त्यात वाचल्या गेलेल्या निबंधांची दहा स्वतंत्र पुस्तके प्रकाशित झाली. त्यातील सहा पुस्तके या कादंबरीच्या बाजूने आहेत तर चार विरुद्ध बाजूने. या कादंबरीचे वाचकांनी जोरदार स्वागत केले असले तरी कन्नडमधील नामवंत साहित्यिकांनी मात्र या कादंबरीवर टीकेची झोड उठवली होती. ‘आवरण’विषयी बोलताना अनंतमूर्ती म्हणाले होते, Bhyrappa does not know either Hindu religion or the art of story-telling. He is only a debater. He does not go beyond his opinions. He constructs opinions and end up as a bedater, rather than a creative writer.”
हम्पी, काशी येथील हिंदू देव-देवतांच्या मंदिरांचा विध्वंस मुस्लिम राज्यकर्त्यांनी केला, पण हे ऐतिहासिक सत्य निधर्मीवादी अणि डाव्या विचारसरणीच्या मंडळींनी कायम दडपून टाकण्याचा प्रयत्न केला असून हम्पीतील मंदिरांचा विध्वंस शैव-वैष्णवांनी केला असल्याचा निधर्मीवादी मंडळींचा दावा खोटा आहे. मुस्लिम राज्यकर्त्यांचा, विशेषत: औरंगजेब बादशहाचा एकंदर कारभार कसा रगेल आणि रंगेल होता, हे ‘आवरण’चे कादंबरीचे मध्यवर्ती सूत्र आहे.
आपल्या म्हणण्याचा आधार स्पष्ट करण्यासाठी भैरप्पा यांनी कादंबरीच्या शेवटी तब्बल 136 संदर्भग्रंथांची यादी जोडली आहे आणि म्हटले आहे की, ‘माझे स्वत:चे या कादंबरीत काही नाही. मी जे काही घेतले आहे, ते सर्व या ग्रंथांतूनच घेतले आहे. तेव्हा माझ्या कादंबरीवर बंदी आणायची असेल तर आधी या सर्व ग्रंथांवर बंदी आणली पाहिजे.’ भैरप्पा यांचा हा युक्तिवादच त्यांच्या हेतूविषयी शंका निर्माण करतो. कारण त्यांनी दिलेल्या संदर्भग्रंथांपैकी बरीचशी पुस्तके ही हिंदुत्ववादी आणि अँटी-मुस्लिम लेखकांनी लिहिलेली आहेत. त्यात एन. एस. राजाराम (आठ पुस्तके),अरुण शौरी (दहा पुस्तके), सीताराम गोयल (सतरा पुस्तके),अन्वर शेख (दोन पुस्तके), विवेकानंद यांचे समग्र वाड्मय आणि इब्न बाराख, डेव्हिड फ्रॉले, व्ही. एस. नायपॉल, अरुण जेटली यांच्या प्रत्येकी एका पुस्तकाचा समावेश आहे. यातल्या काही लेखकांची विश्वासार्हता आधीच जगजाहीर असल्याने त्याबाबत वेगळे भाष्य करायची गरज नाही. त्यामुळे भैरप्पा यांच्या यादीत वरवर देशी-विदेशी, हिंदू-मुस्लिम, प्राचीन-अर्वाचीन लेखकांच्या पुस्तकांचा समावेश दिसत असला तरी त्यांचे वर्गीकरण केल्यावर वेगळेच चित्र समोर येते. अ. का. प्रियोळकर, जदूनाथ सरकार, अल्बेरूनी, विल डय़ूरांट यांच्या पुस्तकांचा केवळ माहितीसाठी उपयोग करायचा अणि हिंदुत्ववादी लेखकांची पुस्तके सत्य म्हणून ग्राह्य धरायची, यातून भैरप्पांचा मनसुबा उघड होतो.
मागच्याच महिन्यात 28 जूनला भैरप्पांची ‘कवलु’ (Kavalu) ही बावीसावी कादंबरी प्रकाशित झाली आहे. या कादंबरीतही त्यांनी ‘आवरण’सारखाच प्रकार केला आहे. विशेष म्हणजे या कादंबरीचे प्रकाशनाआधीच दोनदा पुनर्मुद्रण करण्यात आले. तर पुढच्या दहा दिवसात पाच पुनर्मुद्रणे झाली. सध्या या कादंबरीवर कन्नड वाचकांच्या उडय़ा पडत आहेत. भैरप्पा यांची ही कादंबरी सेक्स आणि फेमिनिझम या विषयावरची आहे. ‘कवलु’ म्हणजे मुख्य रस्त्याला फुटलेला फाटा.
या कादंबरीत भैरप्पा यांनी दोन स्वतंत्र कथानके सांगितली आहेत. पहिले कथानक एका उद्योजकाविषयीचे आहे. त्याची पहिली पत्नी मृत्यू पावलेली असते, तर मुलगी मानसिक आजाराची बळी असते. या उद्योजकाचे विवाहबाह्य संबंध, दुसरे लग्न, त्या बायकोची अफेअर्स, तिचा स्त्रीवादी दृष्टिकोन आणि तिचा मुलगा हा सारा तपशील या पहिल्या भागात येतो. तर विद्यापीठातील प्राध्यापिका आणि तिचा कट्टर स्त्रीवादी दृष्टिकोन असा दुसरा भाग आहे. या प्राध्यापिकेची अनेक अफेअर्स, तिची मुलगी, तिचा नवरा, त्याची लाइफ-स्टाइल, या दोघांचं विभक्त होणं या भोवती हा भाग फिरतो.पहिल्या भागाचे वर्णन सेक्स असे तर दुस-या भागाचे स्त्रीवादी असे करता येईल. पाश्चात्त्य पद्धतीच्या कौटुंबिक परिस्थितीवरही भैरप्पा यांनी या कादंबरीत भाष्य केले आहे. याशिवाय या कादंबरीचा काही भाग हा कायदेशीर गोष्टी- घटस्फोट, कौटुंबिक हिंसा इत्यादी- यांची तपशीलवार माहिती देणारा आणि तरीही रंजक आहे.
‘कवलु’वरही आतापासूनच टीकेला सुरुवात झाली आहे. इंटरनेट आणि ब्लॉग्जवर त्याचे पडसाद उठायला लागले आहेत. कारण या कादंबरीत भैरप्पा यांनी सरळ मुस्लिम समाजालाच टार्गेट केले आहे. कौटुंबिक आणि एकंदरच हिंसा कशी वाढत चालली आहे, मुस्लिम धर्मात कशी हिंसा आहे, हा ‘कवलु’चा मुख्य विषय आहे. ‘‘मनुवादी कुटुंबरचना आता फारशी राहिलेली नाही. पण मुस्लीम धर्मग्रंथ मात्र अजूनही हिंसेला प्रोत्साहन देतात. आणि ते बदलण्याची मुस्लिम समाजाची इच्छाही नाही. त्यासंदर्भात मार्गदर्शन करणारा नायकही त्यांच्याकडे नाही,’’ असे या कादंबरीचा विषय स्पष्ट करताना भैरप्पांनी म्हटले आहे.
भैरप्पा हे सिद्धहस्त आणि यशस्वी कादंबरीकार आहेत. या प्रकारावर त्यांची कमालीची पकड आहे. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही कादंबरीची रचना अतिशय बांधेसूद आणि मजबूत असते. त्यामुळे निव्वळ कलाकृती म्हणून त्यांची कादंबरी वाचनीय असते. ‘आवरण’ आणि ‘कवलु’ या कादंब-याही निव्वळ कलाकृती म्हणून वाचनीय आहेतच, पण कादंबरीचा आधार घेत भैरप्पा जे काही सांगू पाहत आहेत, ते मात्र त्यांच्या सद्हेतूविषयी शंका निर्माण करणारे आहे. एक जुलैला म्हैसूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भैरप्पा यांनी म्हटले आहे की, ‘‘मी मूलभूतवादी आहे, संघपरिवाराचा लेखक आहे, असा माझ्यावर शिक्का मारण्यात आलेला आहे. पण मी मुस्लिम विरोधक नाही.’’ पण त्यांच्या ‘आवरण’ आणि ‘कवलु’ या कादंब-या मात्र सरळ सरळ या समाजालाच फैलावर घेणा-या आहेत, तेही अपु-या सत्यानिशी. घटना, वास्तव आणि सत्य यांची सरमिसळ करून भैरप्पा लेखन करत आहेत. आणि तोच खरा कळीचा मुद्दा आहे.


प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा