जातीचा फटकळ

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

वास्तव घडामोडी आणि कल्पित यांची फर्मास मिसळ डिमिलेच्या लिखाणात नेहमीच आढळते. काय घडलं असावं, काय घडू शकतं याचा शोध घेता घेता तो प्रत्यक्षातील घडामोडींची वेधकपणे सांगड घालत जातो आणि आपण त्याच्या नाइट फॉल, प्लम आयलंड, द लायन्स गेम, द लायन अशा कादंब-यांची पानं उलटत त्यात गुंग होऊन जातो.

अमेरिकेत काही आठवड्यांपूर्वी खळबळ उडवणारं रशियन हेरांचं प्रकरण आठवतंय? कित्येक वर्ष अमेरिकेत राहून रशियासाठी हेरगिरी करणा-या एकूण दहा जणांचा एक गट पकडण्यात आला होता. मूळचे रशियन पण संपूर्णपणे अमेरिकन जीवनशैली अंगी बाणवलेले, स्वीकारलेले हे दहा जण अमेरिकेत कुटुंबवत्सल नागरिक म्हणून वावरत होते.. कोल्डवॉरचा जमाना असता तर किम फिल्बी प्रकरणासारखी केवढी तरी खळबळ उडाली असती, स्लीपर एजंट, मोल म्हणून अमेरिका आणि रशियाने परस्परांवर कितीतरी चिखलफेक केली असती, गदारोळ उडाला असता. पोलादी पडदा दूर झाल्यापासून आता इतके खळबळजनक काहीही घडत नाही. (आणि हेरकथालेखकांना कोल्डवॉरच्या काळासारखे विषयही मिळत नाहीत.) आताही दोन्ही देशांनी शांतपणे अगदी समजूतदारपणा दाखवत अमेरिकन आणि रशियन हेरांची अदलाबदल केली, द एन्ड..

 

एखाद्या स्पाय थ्रिलरसारख्या या घडामोडींची माहिती घेत असताना सारखं वाटायचं की, हे सारं आधीच कुठेतरी वाचलंय, अगदी हेच कथानक एका लेखकाने त्याच्या कादंबरीत मांडलंय. डोक्यात भुंगा सुरू होता आणि अचानक ट्यूब पेटली..

 

हे तर नेल्सन डिमिलेच्या द चार्म स्कूलकादंबरीचं कथानक. रशियातच एका गुप्त ठिकाणी रशियन युवकांना पूर्णपणे अमेरिकन धाटणीच्या वातावरणात, संस्कृतीत वाढवायचं, अमेरिकन जीवनशैलीतच घडवायचं आणि ते अमेरिकनझाल्यावर त्यांना अमेरिकेत स्लिपर एजंट म्हणून वसवून त्यांच्याकडून हेरगिरी वा अन्य कामांसाठी मदत घ्यायची. ही योजना रशियाने अतिशय गुप्तपणे कित्येक वर्ष अमलात आणली आहे, हा डिमिलेच्या या कादंबरीचा गाभा. कादंबरीच्या प्रस्तावनेत, एका राजनैतिक अधिका-याशी बोलताना त्याला या कथासूत्राचे धागेदोरे मिळाले होते, असे डिमिलेने लिहिलंय. फटकळ, तिरकस, उपहासगर्भ बोलण्यासाठी प्रसिद्ध डिमिले अशा कॉन्स्पिरसी थिअरी मांडण्यात पटाईत आहे. आता हे रशियन हेरांचं प्रकरण उजेडात आल्यावर माझ्याप्रमाणेच अनेकांना डिमिलेच्या चार्म स्कूलची आठवण निश्चित झाली असणार. वास्तव आणि कल्पित यांच्यात कधी कधी संभ्रमित करणारं साम्य आढळतं ते असं. आता मला रशियनांकडून या कथानकाची कल्पना मिळाली की त्यांनी माझं पुस्तक वाचून असं काही केलं, ते तुम्हीच ठरवा’, असं डिमिलेनं वाचकांना सांगितलंय.

 

वास्तव घडामोडी आणि कल्पित यांची फर्मास मिसळ डिमिलेच्या लिखाणात नेहमीच आढळते. काय घडलं असावं, काय घडू शकतं याचा शोध घेता घेता तो प्रत्यक्षातील घडामोडींची वेधकपणे सांगड घालत जातो आणि आपण त्याच्या नाइट फॉल, प्लम आयलंड, द लायन्स गेम, द लायन अशा कादंब-यांची पानं उलटत त्यात गुंग होऊन जातो.

 

लाँग आयलँडच्या दक्षिण किना-याकडे सरकणारं टीडब्ल्यूएचं एक प्रवासी विमान जुलै, 1996मध्ये स्फोट होऊन कोसळलं होतं. त्या फ्लाइट 800ची अशी दुर्दैवी अखेर जमिनीवरून डागण्यात आलेल्या विमानवेधी क्षेपणास्त्रामुळे झाली, असा एक समज आहे. डिमिलेची नाइट फॉलकादंबरी याच कथासूत्राभोवती फिरते. हा स्फोट, विमानाचं कोसळणं प्रत्यक्ष पाहणा-या व्यक्तींच्या साक्षीपुराव्याची कागदपत्रं डिमिलेनं माहितीच्या अधिकाराखाली मिळवली आणि मग त्याला त्याच्या कल्पनाशक्तीची जोड दिली. या दुर्घटनेबद्दल मी अनेकांकडून हीच शक्यता (विमान क्षेपणास्त्रामुळे पडलं) ऐकत होतो आणि विमान कसं पडलं असावं याची अ‍ॅनिमेटेड फिल्म तयार कुणी केली तर सीआयएनं, सीआयएचा संबंध येतोच कुठं इथं.. मग मनात प्रश्न उभे राहतात आणि प्रश्नांची उत्तरं मी माझ्या परीनं शोधण्याचा, त्याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न करतो’, असं डिमिले सांगतो.

 

अगदी प्रारंभी म्हणजे 1973मध्ये तो पोलिस कथा लिहायचा, त्यासुद्धा टोपणनावानं. कधीतरी मला माझ्या ख-या नावानं तुफान लोकप्रिय असं पुस्तक लिहायचंय हे ठरवून मी माझं खरं नाव त्या कादंबरीसाठी राखून ठेवलं होतं’, असं तो सांगतो. पुढे तसंच झालं. बाय द रिव्हर्स ऑफ बॅबिलॉनही त्याची पहिली कादंबरी चांगली खपली आणि डिमिलेचं नाव गाजू लागलं. त्या काळात इस्लामी दहशतवादाबद्दल लिहिणारे लेखक विरळाच होते. डिमिलेनं थॉमस हॅरिसच्या ब्लॅक संडेपासून स्फूर्ती घेत ही वेगळी वाट शोधली होती. अमेरिकेत हाहाकार उडवण्यासाठी शिरलेल्या एका लिबियन दहशतवाद्याबद्दल 2000मध्ये त्याने लिहिलेल्या द लायन्स गेमचं जोरदार स्वागत झालं. (आता या कादंबरीचा पुढचा भाग द लायनतितकाच गाजतोय)

 

फर्स्ट लेफ्टनंट म्हणून तो व्हिएतनाम युद्धात लढलाय. त्या अनुभवांविषयी वर्ड ऑफ ऑनरआणि अप कंट्रीया त्याच्या दोन कादंब-यांमध्ये तो सडेतोडपणे आणि सणकून लिहितो. द जनरल्स डॉटरया त्याच्या कादंबरीवर पॅरामाऊंटनं जॉन ट्रव्हल्टाला घेऊन काढलेला चित्रपट आजही त्यांच्या सर्वाधिक कमाईच्या पन्नास चित्रपटांमध्ये आहे. त्याच्या चार्म स्कूल, लायन आणि इतर दोन कादंब-यांचे हक्क चित्रपटांसाठी विकले गेले आहेत. त्याच्याकडे असलेल्या आणखी दोन-तीन कथाकल्पनांवर स्वतंत्रपणे पटकथा लिहिण्याचा त्याचा विचार आहे. त्याच्या आणखी दोन कादंब-या पुढील वर्षात वाचकांसमोर येणार आहेत.

 

खवचटपणात त्याचा कुणी हात धरणार नाही. काय वाचतोस, कुठले लेखक आवडतात, असं विचारल्यावर, मी मुळातच कमी वाचतो आणि वाचतो तेही दिवंगत लेखकांचं साहित्य. म्हणजे काय की मला त्यांना पत्र लिहिण्याचं कर्तव्य पार पाडावं लागत नाही.., असं या पठ्ठ्यानं सांगितलं होतं. एकदा कुणीतरी त्याला पुस्तक कसं गाजवायचं, प्रसिद्ध करण्यासाठी काय खटाटोप करावा लागेल, असं विचारलं होतं. याने सांगितलं, तुमचं मुख्य पात्र व्हॅम्पायर आहे असं दाखवा, नाहीतर, कुठल्यातरी दिवंगत लेखकांच्या नावानं स्वत:च तुमची पाठ थोपटून घ्या..

 

कुणाच्या तरी सहकार्याने पुस्तक लिहिण्यावर त्याचा विश्वास नाही. सगळ्याच बेस्टसेलर लेखकांप्रमाणे तो खूप मेहनत घेतो. संदर्भ संशोधन आणि वाचन, मुलाखती व कादंबरीतील घटनास्थळांची प्रत्यक्ष पाहणी अशा तीन पातळ्यांवर माझी कादंबरी लेखनाची पूर्वतयारी सुरू होते. पेन्सिलीनं मी तावच्या ताव लिहून काढतो, ते माझी सेक्रेटरी नंतर टाइप करते, मग त्याचं फेरलेखन, फायनल ड्राफ्ट वगैरे. या सगळ्याला साधारणपणे 18 ते 24 महिने लागतात, त्यामुळेच मी इतरांसारखा बहुप्रसवी कादंबरीकार नाही’, अशी टपलीही तो मारतो. त्याच्याप्रमाणेच जॉन कोरी ही त्याची व्यक्तिरेखाही येता-जाता मस्त टोले मारत असते. जॉनचा जो काही चटपटीतपणा आहे तो लिहिताना तसा पटकन कागदावर उतरत नाही. त्यासाठी मला 10-15 मिनिटे विचार करावा लागतो हो. वाचकांना गुंतवून ठेवणं फारच अवघड काम आहे’, असं डिमिले मिश्किलपणे सांगतो.

 

द लायनबद्दल काही वाचकांनी, टीकाकारांनी त्याला हेटमेल पाठवले होते. यापुढे मी अजिबात तुमची पुस्तकं वाचणार नाही, विकत घेणार नाही, असं या मंडळींनी म्हटलं होतं. त्यांना या फटकळ माणसानं, ‘थँक यूम्हणून उत्तर देऊन विषयच संपवला. क्या बात है!

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0