PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: सृजनाची अफाट ऊर्जा सृजनाची अफाट ऊर्जा ================================================================================ कृष्णा किंबहुने on 16 August, 2010 08:10:00 AM कुर्रतुल-ऐन-हैदर यांचं स्थान केवळ उर्दू साहित्यात किंवा भारतीय साहित्यात महत्त्वाचं नसून, ते वैश्विक साहित्यातही अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांच्या बहुरंगी आणि समृद्ध साहित्यानं उर्दू साहित्यातल्या आधुनिक प्रवाहाला नवी दिशा दिली. हैदरबाईंचा जन्म 20 जानेवारी 1927 रोजी अलिगढमध्ये झाला. त्यांचे वडील सज्जद हैदर येल्दरीम (1880-1943) आणि आई नझर सज्जाद हैदर (1894-1967) हे दोघंही उर्दूतले महत्त्वाचे लेखक होते. कुर्रतुल-ऐन हे बैदरबाईंचं नाव इराणी कवयित्री कुर्रतुल-ऐन ताहिराच्या नावावरून ठेवलं गेलं. त्यांची पहिली कथा 1939 मध्ये वयाच्या बाराव्या वर्षी तर दुसरी कथा सतराव्या वर्षी प्रकाशित झाली. त्यांच्या या दुस-या कथेमुळे ‘नवीन विचारांची तरुण लेखिका’ म्हणून त्या प्रकाशात आल्या. त्यांनी ज्या काळात लिहायला सुरुवात केली, तो खरं तर उर्दू साहित्य परंपरेतला कवितेच्या तेजीचा काळ होता. कादंबरीसारख्या साहित्य प्रकारानं तर आपली मूळंसुद्धा तेव्हा रोवलेली नव्हती. नंतर, 1947 मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह ‘सितारों से आगे’ प्रकाशित झाला. हा कथासंग्रह उर्दू नवकथेचा आरंभबिंदू समजला जातो. याच वर्षी त्यांनी लखनऊ विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. आपल्यापल्या प्रतिभेची जाणीव, भाषा, साहित्य, समाज यांच्याशी असलेली अपार निष्ठा व बांधिलकी आणि गद्य साहित्यातच व्यक्त होण्याचा मार्ग त्यांना याच कालखंडात गवसल्याचं दिसतं. कारण नंतर सातत्यानं त्यांचं अवघ्या भारतीय साहित्यविश्वाला हादरवून टाकणारं लेखन प्रकाशात येत गेलं. त्यात प्रामुख्यानं ‘मेरे भी सनम खाने’ (1949), ‘सफिनाये- गमे दिल’ (1952), ‘आग का दरिया’ (1959), ‘कारे जहाँ दराज है- खंड 1’ (1977), ‘आखिरे शब के हमसफर’ (1979) या कादंब-या; ‘दिलरुबा’, ‘सीता हरण’, ‘चाय के बाग’, ‘अगले जनम मोहे बिटिया न किजो’ या एकाच खंडात 1981 मध्ये प्रकाशित झालेल्या चार कादंबरिका; ‘सितारों से आगे’ (1947), ‘शिशे के घर’ (1952), ‘पतझर की आवाझ’ (1967) (त्यांची ‘द हाऊसिंग सोसायटी’ ही कादंबरीसुद्धा या संग्रहात समाविष्ट केली आहे. 1967 मध्ये या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.) आणि ‘रोशनी की गती’ (1982) हे कथासंग्रह या अद्भुत लेखनाचा समावेश होतो. सृजनशीलतेची, कल्पनाशक्तीची, सामाजिक-राजकीय परिस्थितीच्या विलक्षण आकलनाची आणि दु:ख, विरह, एकटेपण, करुणा, सहानुभूती या स्वाभाविक मानवी जाणिवांची अविश्वसनीय उंची गाठणा-या या साहित्यकृतींबरोबरच त्यांनी बरीच प्रवासवर्णनंही लिहिली आणि इतर भाषांमधून खूपशी भाषांतरेही केली.हैदरबाईंचं अगदी सुरुवातीचं लेखन हे प्रायोगिकच म्हणावं लागेल. या लेखनावर काही पाश्चिमात्त्य लेखक-लेखिकांचा, विशेषत: व्हर्जिनिया वुल्फ आणि तिच्या ‘स्ट्रीम ऑफ कॉन्शसनेस’ तंत्राचा बराच प्रभाव जाणवतो. वाचक- अभ्यासकाच्या समीक्षकीय दृष्टिकोनातून त्यांचं लेखन ‘रोमँटिक’ असल्याचंही जाणवतं. पण त्यातली सृजनाची ऊर्जा आणि लेखनाच्या अप्रतिम शैलीनं निर्माण केलेलं जिवंतपण आपल्यावर येऊन आदळल्यावर हा आक्षेप निश्चितच काहीसा सौम्य होतो. इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, मिथकं- दंतकथा आणि एकूणच भूतकाळ यांचं त्यांना अफाट आकर्षण असलं पाहिजे. त्यांचं बहुतेक साहित्य देशाच्या फाळणीभोवती गुंफलेलं आहे. पण फक्त एवढय़ाच विषयावर त्यांचं लेखन आहे, असं मात्र म्हणता येत नाही. जशी ‘आग का दरिया’सारखी फाळणीपासून सुरू होणारी कादंबरी उत्तरार्धात काळाचे सगळे बंध आणि सीमा पार करून सार्वकालिक होते. काळाच्या कुठलाही खंडा समकालीन करून घेण्याचं सामर्थ्य त्यांच्या लेखनात आहे. कुर्रतुल-ऐन-हैदर यांच्या बारा अप्रतिम कथांचा संग्रह दिल्लीच्या ‘नॅशनल बुक ट्रस्ट’नं 1997 मध्ये प्रकाशित केला होता. नुकतीच या पुस्तकाची चौथी आवृत्ती (किंमत : 50रुपये) आली आहे. या कथांचं मूळ उर्दूतून हिंदी भाषांतर केलंय शाहिना तबस्सुम यांनी. हे हिंदी भाषांतर निर्दोष आहे किंवा पूर्णपणे हिंदी आहे, असं मात्र ठामपणे म्हणत येत नाही. तरीही हैदरबाईंच्या प्रतिभेची झळाळी त्यातून लख्ख होतेच. या संग्रहात त्यांच्या कलंदर, कारमिन, फोटोग्राफर, जुगनूओं की दुनिया, हाजी गुलबाबा बेकताशी के प्रवचन, कोहरे के पीछे, कुलवंती, सेंट फ्लोरा ऑफ जॉर्जिया की आत्मस्वीकृतियाँ, रोशनी की गती, डालनवाला, लकडबग्घे की हँसी आणि अगले जनम मोहे बिटिया न किजो या गाजलेल्या कथांचा समावेश आहे. हैदरबाईंच्या मूलभूत आस्था विषयांवरच्या इतर कथांबरोबरच हाजी गुलबाबा बेकताशी के प्रवचन, सेंट फ्लोरा ऑफ जॉर्जिया की आत्मस्वीकृतियाँ आणि रोशनी की गती यांसारख्या रूपकात्मक म्हणाव्यात अशा कथाही आपलं लक्ष वेधून घेतात. या सगळ्या कथांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातली भिन्न-भिन्न थरांतली, दु:खानं होरपळलेली, निरंतर कसल्या तरी शोधात असलेली, कितीही कठीण परिस्थितीत तग धरून जगण्याचा तोल ढळू न देणारी सोशिक, समंजस, विनोदबुद्धी असलेली अद्भुत पात्रं! या कथांतली किती तरी पात्रं स्वत:ची भूमी, देश नसलेली अशीच आहेत आणि असं ‘भूमिहीन’ भागधेय घेऊन वाट्याला आलेलं दु:ख धैर्यानं सोसत ही पात्रं जगातल्या शक्य त्या कोप-यात आश्रय शोधताना स्वत:तलं प्रेम आणि जगण्यावरची निष्ठा आश्चर्यकारकपणे जिवंत ठेवतात. आयुष्यानं निरंतर फरफटीचा दिलेला शाप सोसत जगणा-या कुलवंतीच्या धैर्य आणि सोशिकपणाचा आलेख वाचकाला फाळणीनंतरच्या ऐतिहासिक दु:ख, अपमान, विरह, एकटेपण या जाणिवांशी जोडतो. अशा हादरवून टाकणा-या कथांबरोबरच ‘जुगनूओं की दुनिया’ ही लहानपणातल्या अनुभवांना उजाळा देणारी छोटीशी, गतकातर (नोस्टॅल्जिक) होत जाणारी गोष्ट आहे. पण ही गोष्टदेखील गतकारतेपुरतीच बंदिस्त नाही, तर आता भविष्यात असं विश्व पुन्हा माणसाच्या वाटय़ाला येणं अशक्य आहे, ही दु:खद जाणीव देणारी आणि मानवी मूल्यांचं वरचेवर होत जाणारं पतन चित्रित करणारीही आहे. लहान मुलामुलींच्या गंमतशीर खेळांपासून सुरू होत ही कथा- ‘‘क्योंकि वक्त एक ऐसी लौहे- महफूज्म (एक ऐसी तख्म्ती, जिस पर लिखा मिटाया नहीं जा सकता) है, जिस पर वक्त का कोई असर नहीं।’’ - अशा आधिभौतिक (मेटाफिजिकल) वाक्यात परिणत होते. आयुष्यात दु:खाला पर्याय नाही, हे भीषण सत्य हैदराबाई अतिशय सहजतेनं गृहीत धरतात आणि असीम धैर्यानं जगण्यासाठीच्या आवश्यक ऊर्जेचा शोध घेतात. त्यांची स्पर्धा आणि वैर थेट इतिहास आणि काळ यांच्याशीच आहे, असं आपल्या लक्षात येतं. सृजनाची अफाट ऊर्जा असलेल्या या लेखिकेला तीन वर्षापूर्वी काळानं आपल्या कवेत घेतलं, पण निस्सीम प्रेम करू शकणारी, जगण्याशी असीम बांधिलकी आणि निष्ठा असणारी अजरामर नि अकुतोभय पात्रं निर्माण करून त्यांनी काळावर मात केलीच!