PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: प्रारब्धवादाचं ओझं प्रारब्धवादाचं ओझं ================================================================================ संकलन : समीर करंबे on 23 August, 2010 08:15:00 AM अर्जेटिनात जन्मलेल्या अ‍ॅन्टिनिओ डी बेनेडेट्टोने स्पॅनिश भाषेत विपुल लिखाण केलं आहे. मुंडो अ‍ॅनिमल (1953), एल पेंटागोनो (1955), ग्रोट (1957) डिक्लीनेसियन एंजल (1957), एल कॅरिनो डे लॉस टोन्टोस (1961), एल सिन्सिरिओ (1964), लॉस सुसाइडस (1969), अ‍ॅबसॉडरेस (1978), सोंबेरास नॉडा मस (1984) यासारख्या कादंब-या आणि लघुकथा बेनेडेट्टोच्या नावावर आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची पुस्तक अनेक भाषांत भाषांतरितही झाली आहेत. 1976च्या लष्करी राजवटीने त्यांना एक वर्षभरासाठी तुरुंगातही डांबण्यात आलं होतं. त्यानंतर ते स्पेनला निघून गेले होते. मृत्यूपूर्वी काही दिवस आधी ते परत अर्जेटिनाला आले. 1956 मध्ये प्रसिद्ध झालेली त्यांची ‘झामा’ ही विसाव्या शतकातील लॅटिन अमेरिकन साहित्यातील एक उत्कृष्ट कलाकृती समजली जाते. असं म्हणतात की, ती लिहिण्यासाठी बेनेडेट्टो यांनी पॅराग्वेच्या (जो एकेकाळी ब्युनॉस आयर्सची एक वसाहत होता) इतिहास आणि भूगोलावरील पुस्तकं घेऊन अनेक दिवस स्वत:ला एका खोलीत बंद करून ठेवलं होतं. या निवांतपणातून बेनेडेट्टोने प्रसवलेली ही कादंबरी म्हणजे निव्वळ इतिहासाचा अन्वयार्थ किंवा पुनर्लेखन नाही. तर ती अनुभवजन्य नैराश्य आणि गतानुगतिक प्रारब्धवादाचं ओझं वागवणा-या विसाव्या शतकातील एका नायकाच्या वेगळ्याच व्यक्तिमत्त्वाची कहाणी उलगडून दाखवते. हा नायक म्हणजे दिएगो डी झामा. तो वसाहतीच्या प्रशासनाचा एक अधिकारी आहे. असूनसिओनच्या गव्हर्नरचा सल्लागार म्हणून काहीसं संदिग्ध काम त्याच्यावर सोपवण्यात आलं आहे. यासाठी तो बायका-मुलांना सोडून या शहरात आला आहे. कादंबरीच्या सुरुवातीलाच बंदराच्या धक्क्याला बांधलेल्या एका जाळ्यात समुद्री लाटांवर हिंदकळणा-या माकडाच्या शवाचं वर्णन आहे. या वर्णनातून चिवट स्वभाव आणि संभाव्य ताटातूट, त्यांचा झगडा दिसतो. झामाची स्थितीही याहून वेगळी नाही, हेच लेखकाला यातून सुचवायचं असतं. ही कादंबरी नागरी अध:पतन आणि मुल्यांची घसरणदेखील अधोरेखित करते. ती अभिजात साहित्याचं सौंदर्य आणि दमदारपणा असलेली देखणी कलाकृती तर आहेच, शिवाय फारशी न दखल घेतलेली ती एक ‘मास्टरपीस’ही आहे. बहुतेक लॅटिन अमेरिकन साहित्याच्या बाबतीत विलक्षण, जादूई वास्तववाद वरचढ ठरतो. ही लॅटिन अमेरिकेतील साहित्यिकांची त्या वेळी एकमेव शैली होती, असं म्हटलं जातं. पण ‘झामा’देखील तशीच कादंबरी असेल, असा समज असल्यास तो खरा नाही. या कादंबरी आत्मतत्त्ववादी, कालातीत शैली, वसाहतीचा अस्थिर भूतकाळ आणि निर्थक स्मृतींविषयी सांगते. त्या अशा देशांच्या आहेत जिथला निसर्ग कोपला आहे. या कादंबरीतील ठोस विधानं तिला विलक्षण वास्तववादाच्या पार पलिकडे नेऊन ठेवतात. निसर्गाची कुठलीही ठरलेली तत्त्वं नसतात. तो कधी निशब्द असतो, कधी क्रूर असतो. तो कधी शांत असतो, तर कधी विनाशक हा धडा या कादंबरीतून मिळतो.