थ्री अँड हाफ परसेंट!
अमेरिकेतल्या लेखकांचा धंदा मंदीमुळे चांगलाच बसलाय. आधी अगोचर असलेली मंदी 2008 मध्ये दृग्गोचर झाली, तोवर ‘टॉप टेन’ लेखकांची (फक्त दहाच जणांची) एकूण कमाई 56 कोटी 30 लाख डॉलर होती. यंदा (ऑगस्ट 2010 मध्ये) ‘टॉप टेन’ कमावत्या दहा लेखकांची एकूण कमाई 27 कोटी डॉलरच झाली आहे.
‘आम्हां घरी धन। शब्दांचीच रत्ने’, असं ज्या भाषेत तुकाराम म्हणाले, त्याच भाषेत हाही मजकूर लिहिला जातोय, वाचला जाणारेय. पण इंग्रजी म्हंजे पैशे कमावण्याची भाषा, हे अगदी केजी-नर्सरीतल्या मुलांचे पालकही छातीठोक सांगू शकतील. इंग्रजी लेखकांना पैसा बरा मिळतो, अशी म्हटलं तर माहिती म्हटलं तर खंत/सल मराठी लेखकांच्या काही पिढ्यांमध्ये आहेच. मग त्यातल्यात्यात बरी बातमी अशी की, इंग्रजीतला- विशेषत: अमेरिकेतल्या लेखकांचा धंदा मंदीमुळे चांगलाच बसलाय. आधी अगोचर असलेली मंदी 2008 मध्ये दृग्गोचर झाली, तोवर ‘टॉप टेन’ लेखकांची (फक्त दहाच जणांची) एकूण कमाई 56 कोटी 30 लाख डॉलर होती. यंदा (ऑगस्ट 2010 मध्ये) ‘टॉप टेन’ कमावत्या दहा लेखकांची एकूण कमाई 27 कोटी डॉलरच झाली आहे.
‘फोर्ब्ज’ नावाचं नियतकालिक श्रीमंताच्या ब-याच याद्या अधूनमधून प्रसृत करतं. भारतीय यादीत टाटा- अंबानींचा समावेश अव्वल स्थानी असतो, तर अमेरिकी यादीत हेच लोक 22 व्या किंवा 56 व्या स्थानावर असतात.
याच फोर्ब्जनं 2008 मध्ये पहिल्यांदा ‘सर्वाधिक कमावणारे दहा लेखक’ अशी यादी काढली. 2009 मध्ये ही यादी करण्याचं त्यांना बहुधा सुचलं नसणार, इतकी रडारड अमेरिकी अर्थकारणात होती. ताजी- 2010ची यादी गेल्याच आठवड्यात जाहीर झाली.. या लेखकांची कमाई केवळ पुस्तकांच्या मानधनातून होत नाही, हेही फोर्ब्जनंच गृहीत धरलंय. टीव्ही सिरियल वा सिनेमा बनवण्यासाठीचे हक्क, तुमच्या कादंबरीवर कम्प्युटरमधला गेम काढण्याचे हक्क, असल्या बाजारातून लेखकांना कमाई होते.
फोर्ब्जच्या ताज्या यादीतला पहिल्या नंबरावरला लेखक जेम्स पॅटरसन (यंदा कमाई सात कोटी डॉलर, दोन वर्षापूर्वी पाच कोटी डॉलर) हा तर ‘दोन वर्षात 17 पुस्तकं लिहिणारा’ म्हणून नावाजलाय.. शिवाय, ‘अमेरिकेत विकल्या जाणा-या कुठल्याही 17 कादंब-यांमध्ये एक पॅटरसनची असते’ असंही बाजारातलं स्टॅटिस्टिक्स आहे. पॅटरसननं म्हणे असिस्टंट ठेवलेत. तो फक्त कल्पना आणि प्रसंग मांडतो. बाकी काम कनिष्ठ सहकारी लेखकांचं.
‘हॅरी पॉटर’मुळे प्रख्यात झालेल्या जे. के. रोलिंगची कमाई 2008 मध्ये तब्बल 30 कोटी डॉलर होती! या कमाईत अर्थातच, हॅरी पॉटरच्या चित्रपटांचे आणि कम्प्युटर-गेमचे हक्क विकून मिळालेला पैसाही होता. त्या वर्षी पहिल्या क्रमांकावर असलेली रोलिंग यंदा अवघे एक कोटी डॉलर कमावून शेवटच्या - दहाव्या क्रमांकावर आहे. रोलिंगइतक्याच निर्ढावलेपणानं लिहून गेल्या दोन वर्षात प्रसिद्ध झालेल्या ‘ट्वायलाइट कादंबरीचतुष्ट्या’ची कर्ती स्टेफनी मेयर 2008 मध्ये कुठंच नव्हती, ती यंदा चार कोटी डॉलरच्या कमाईनिशी दुस-या क्रमांकावर आहे.
या दोन्ही याद्यांतला एकही लेखक भारतीय वा आशियाई तर सोडाच, गौरेतरही नाही. म्हणजे ही यादी कुणाची? कोणत्या आधारावर कोण यांना ‘लेखक’ म्हणतंय? कुठं गाजताहेत हे आणि का दिले जाताहेत काही कोटी डॉलर यांना?
‘आजचं मराठी साहित्य हे साडेतीन टक्क्यांचं साहित्य आहे’ अशी टीका सुमारे 25 वर्षापूर्वी झाली होती. तीच या यादीच्या आधारे करता येईल. तथाकथित सवर्ण आणि मध्यमवर्गीय शहरी चेह-याचं (पुण्यामुंबईचं) साहित्यच त्या वेळी मराठी पाठ्यपुस्तकांपासून ते साहित्य संमेलनं आणि त्यांच्या अध्यक्षपदांपर्यंत सगळीकडे मिरवायचं. मराठीतले साहित्यिक म्हणून मिरवणारे हे लोक साडेतीन टक्क्यांचे प्रतिनिधी आहेत, असं ठासून सांगणारे एकापेक्षा जास्त लोक होते, म्हणून तसल्या साहित्याची सद्दी मराठीत कमी झाली. तरीही मराठी दिवाळी अंकांच्या प्रकाशकांना विचारून पाहा- आजही पुण्यामुंबईच्या (फार तर नागपूर, औरंगाबाद) उच्चवर्णीय लेखकांना जास्त ‘भाव’ आणि बाकीच्यांना कमी, अशीच उतरंड लावली जाते. मौजच वाटते, हे कालचे निर्णय आजच्या टाइम्सच्या महाराष्ट्रातही दीपावलीच्या वेळी घेणा-यांची. पण नावं कुणाकुणाची घेणार? शिवाय याच लब्धप्रतिष्ठित अंकांची बंडलं विविध भेटवस्तूंसह साडेतीन टक्क्यांची संस्कृती वाढवायला तयार!
फोब्र्जची ती यादी, त्यातले ते लेखक, त्यांची ती कोटी डॉलरची कमाई.. यांत इंग्रजीच्या भारतीय वाचकांना रस नसेल, तसा जगात अन्यत्रही नसेल. इंग्रजीचा साहित्यपसारा मोठा आहे, त्यात बुकर वा कॉमनवेल्थ प्राइझपासून अनेक पारितोषिकांच्या निमित्तानं लेखक आणि त्यांच्या ब-या पुस्तकांच्या याद्या (लाँगलिस्ट, शॉर्टलिस्ट) प्रसृत होतात. त्यामुळे फोब्र्जनं ज्यांना यादीत चढवून ठेवलंय, ते निव्वळ साडेतीन टक्क्यांचे (हवं तर इंग्रजीत म्हणू- थ्री अँड हाफ परसेंटचे ) प्रतिनिधी आहेत, असं मानायला काहीही हरकत नाही.
त्याच त्या प्रेमकथांमधल्या थरारात किंवा काल्पनिक रहस्यात वाचकांना रस असतो असं मानून फॅक्टरीसारख्या धडाधड वेगानं- पण प्रसंगी ‘असिस्टंट’ ठेवून तपशीलवार- लिहिली गेलेली पुस्तकंच हे दहाही ‘टॉप टेन हाय्येस्ट पेड’ लेखकू कशी काय लिहितात? ‘ट्वायलाइट’ किंवा अन्य कादंब-यावर सिनेमे झाले, ते तरी काय वकुबाचे होते? ‘ट्वायलाइट’ चित्रपटातल्या नायकाच्या देखणेपणाची चर्चा महिलांच्या मासिकांनी पराकोटीला नेली, पुरुषदेहाचं हे वस्तूकरण चाललेलं असतानाच ‘मेयर यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट’ अशी अनुषंगिक प्रसिद्धी पुन्हा स्टीफनीबाईंनाही मिळालीच.
अशी का होईना, पण प्रसिद्धी मिळो, असं कुणाला वाटत असेल तर छान आहे! वास्तविक आपण भारतीय आणि इंग्रजी जाणणारे म्हणजे, साडेसत्त्याण्णव टक्के जगाचा किमान 15 टक्के भाग ठरू.. असं असताना फोर्ब्ज-याद्यांवरच विश्वास ठेवायचा असल्यास, इंग्रजीतल्या साडेतीन टक्केशाहीची चीड आपल्याला येत नाही, एवढाच त्याचा अर्थ होतो.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा