PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: पद्मा सचदेव मदर ऑफ डोगरी पद्मा सचदेव मदर ऑफ डोगरी ================================================================================ राम जगताप on 23 August, 2010 08:50:00 AM टूट जाते हैं कभी मेरे कनारे मुझ में डूब जाता है मुझ में समंदर मेरा या परिस्थितीत काही लिहिलं जातं. हा जो समुद्र आहे, तो प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये असतो. कुणाचा शांत पडून राहतो, तर कुणामध्ये लाटा निर्माण होतात. अशा लाटा जम्मूतल्या पद्मा सचदेव या मुलीच्या मनात निर्माण झाल्या आणि ती डोगरी भाषेतील पहिली कवयित्री ठरली. डोगरी ही प्रामुख्याने जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातल्या उत्तर भागात बोलली जाणारी भाषा. ती इंडो-आर्यन भाषांपैकी एक मानली जाते. ही पहाडी भाषा बोलणा-यांना डोग्राज म्हणतात. अवघ्या 20 लाख लोकांची भाषा असली तरी या भाषेतलं साहित्य मात्र समृद्ध आहे. 18 व्या शतकातील कवी दट्टू यांच्यापासून ते करण सिंग, राम नाथ शास्त्री (ज्यांना ‘फादर ऑफ डोगरी’ म्हटलं जातं.), दिनूभाई पंत, मधुकर शर्मा, यश शर्मा आणि पद्मा सचदेव यांच्यापर्यंत साहित्याच्या परंपरेचा आलेख काढला जातो. (प्रसिद्ध संतुरवादक पं. शिवकुमार शर्मा हेही डोगरीच.) 1969 साली डोगरी भाषेला ‘स्वतंत्र आधुनिक साहित्य भाषा’ म्हणून साहित्य अकादेमीच्या जनरल कौन्सिलने मान्यता दिली, तर 2003 मध्ये तिला ‘राष्ट्रीय भाषे’चा दर्जा देण्यात आला. डोगरी भाषेला आपल्या साहित्याच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देण्यात पद्मा सचदेव यांचं मोठं योगदान आहे. पद्माताईंचा जन्म जम्मूतल्या पुरमंडल या छोट्या गावी झाला. त्यांचे वडील जय देव शर्मा हे संस्कृत स्कॉलर होते. फाळणीच्या वेळी उसळलेल्या दंगलीत जय देव शर्मा यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे कळत्या वया नंतर पद्माताईंनी स्वातंत्र्याच्या अर्थाचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांनी पहिली कविता 1955 साली लिहिली, ती जम्मूतल्या स्थानिक वर्तमानपत्रात छापून आली. पण त्यांचं पहिलं पुस्तक ‘मेरी कविता मेरे गीत’ प्रकाशित व्हायला मात्र पुढची चौदा वर्षे जावी लागली. दरम्यान त्या ऑल इंडिया रेडिओत जॉइन झाल्या. 1969मध्ये त्यांची मुंबईत बदली झाली. मुंबईत त्यांनी बरीच वर्षे काम केलं. त्या वेळी आकाशवाणी हे सांस्कृतिक व्यासपीठ असल्याने पद्माताईंना अनेक कलाकारांचा-साहित्यिकांचा सहवास मिळाला, त्यांच्या ओळखी झाल्या. पद्माताईंच्या पहिल्या कवितासंग्रहाला 1971 साली साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला. त्या वेळी त्याचं वय होतं एकतीस वर्षाचं. त्यांच्या या पुस्तकाला हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘पद्मा की कविता सून कर मुझे लगा मैं अपनी कलाम फेंक दूँ. क्योंकी जो बातें पद्मा कहती हैं, वहीं असली कविता हैं.’’ त्यांनीच पद्माताईंचं साहित्य पहिल्यांदा ‘धर्मयुग’मध्ये छापून आणलं. मुंबईतल्या सहवासात पद्माताईंचा धर्मवीर भारती आणि मंगेशकर कुटुंबांशी चांगला घरोबा निर्माण झाला, तो अजूनही कायम आहे. भारतीजींची मुले त्यांना ‘बुवाजी’ म्हणतात, तर पद्माताई भारतीजींना ‘भैया’ तर पुष्पा भारतींना ‘भाभीजी’ म्हणतात. गेल्या चाळीसेक वर्षापासून पद्माताई मंगेशकर कुटुंबाच्याही सदस्य आहेत. लतादीदींचा पहिला डोगरी म्युझिक अल्बम काढण्यात पद्माताईंचा मोठा वाटा आहे. लतादीदींकडेच त्यांची मराठी कवयित्री शांता शेळके यांच्याशी ओळख झाली. शांताबाईंच्या साधेपणाविषयी आणि त्यांच्या लेखनाविषयी त्या भरभरून बोलतात. सांगतात, ‘‘इतक्या शांत स्वभावाची आणि इतकं कमी बोलणारी स्त्री मी आजवर पाहिली नाही.’’ एके काळी ‘धर्मयुग’मध्ये अनेक नामवंत साहित्यिकांचं लेखन येत असे. त्यात मराठी लेखकांचंही साहित्य येत असे. ‘धर्मयुग’ बंद झाल्यामुळे संस्कृतीचा एक मोठा गड ढासळला, असं पद्माताईंना वाटतं. पण आजही महाराष्ट्राबद्दल त्यांना खूप प्रेम आमि आत्मीयता आहे. ‘‘एक रीड की हड्डी हैं महाराष्ट्र की भाषा में, जो मुझें बडमी पसंद है,’’ असा त्यांचा अभिप्राय आहे. ऐंशीच्या दशकात ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ हा दूरदर्शनवरील मराठी कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला होता. तो हिंदी दूरदर्शनवर पद्माताई करायच्या. त्यावर आधारित मुलाखतींची त्यांची ‘मितवा घर’, ‘दिवाणखाना’ आणि ‘अमराई’ अशी तीन पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. पद्माताई मूळच्या जम्मूच्या असल्याने तिथल्या अशांत परिस्थितीविषयी त्या सजग असतात. जम्मू-काश्मीरातल्या आतंकवादाविषयी त्यांनी बरंचसं लिहिलंही आहे. ‘नौशीन’ ही कादंबरी, काही कविता लिहिल्या आहेत. त्या आतंकवाद्यांना विशेषत- तरुणांना भेटून त्यांच्याशी चर्चा करतात. त्यांचं मन पालटवण्याचा प्रयत्न करतात. त्या सांगतात, ‘‘अशा प्रकारचा विस्फोट तेव्हाच होतो, जेव्हा सरकार जनतेचं ऐकत नाही. ही करणी लोकांची नाही सरकारची आहे. ‘नेहरूंनी हा प्रश्न वेळेवर सोडवला असता तर असं झालं नसतं,’ ही एकच गोष्ट हे अनेक लोक घेऊन बसलेत. असं नसतं. सरकारनेही वेळेवर आतंकवाद्यांना अटकाव केला नाही. हा आतंकवाद 1989ला सुरू झाला असं अनेकांना वाटतं, पण तो 1946 पासूनच सुरू झालेला आहे.’’ पद्माताई गेल्या काही वर्षापासून दिल्लीत राहतात, पण वर्षात तीन-चार वेळा त्या जम्मूला जातात. त्यामुळे तिथल्या परिस्थितीविषयी त्या अत्यंत खिन्नतेनं बोलतात. संध्याकाळी सहानंतर कुणी घराच्या बाहेर पडत नाही. एकदा गोळीबार सुरू झाला की, कळत नाही कोणाचा मृत्यू झाला. कुणाला जाणून घेण्याची गरजही वाटत नाही. तिथे मृत्यू इतकी किरकोळ गोष्ट झालीय. पद्माताईंना याचं फार दु:ख होतं. ‘‘आपण ज्या देशात राहतो त्याच्या एका कोप-यात किती अन्याय होतो, किती अत्याचार होतात! रक्ताचे पाट वाहतात. हे सार मी साहू शकत नाही. मी ठरवलंय की जे थोडं फार माझ्याकडून लिहून होणार आहे, ते लिहून गुपचूप निघून जावं. इथलं दु:ख मला परत आठवू नये,’’ पद्माताईंची अशी हताश प्रतिक्रिया काश्मीरातल्या आतंकाच्या स्वरूपाची धगच स्पष्ट करते. पण साहित्यावर त्यांचं मनस्वी प्रेम आहे, त्याविषयी त्या भरभरून बोलतात. भारतीय साहित्यातले काही मोठे लेखक म्हणत असतात की, आमची पिढी शेक्सपिअर, मिल्टन यासारख्या लेखकांचं साहित्य वा त्यांचे अनुवाद वाचत मोठी झाली. असं बोललं जातं तेव्हा पद्माताईंना फार राग येतो. त्याचं म्हणणं असतं, ‘‘आपल्या इथं एवढे शेक्सपिअर असताना बाहेरच्या शेक्सपिअरची कशाला बात हवी. ते आधी वाचा. परंतु आजकालची मुलं तेच करतात.’’ पद्माताईंनी सुरुवातीला पाश्चात्त्य साहित्य वाचलं, नाही असं नाही. पण त्याचबरोबर त्यांनी भारतीय साहित्यही वाचलं. डोगरीतलं तर सर्वाचं साहित्य वाचलं, अजूनही वाचतात. त्यामुळे त्यांना माहीत असतं की, कोण नव्याने लिहू लागलाय, कोण काय लिहितोय; हे लोक कुठल्या दर्जाचं लिहिताहेत, बाहेर कुठल्या दर्जाचं लिहिलं जातंय. मराठी वाचता येत नसलं तरी ‘समकालीन भारतीय साहित्य’मध्ये अनुवादित होणारं मराठी लेखन त्या आवर्जून वाचतात. पद्माताईंनी अनुवादाच्या क्षेत्रातही खूप काम केलं आहे. पंजाबीतून हिंदीत, हिंदीतून डोगरीत, डोगरीतून हिंदीत, हिंदीतून इंग्रजीत, इंग्रजीतून डोगरीत असे विविध अनुवाद केले आहेत. पद्माताईंना आजवर पद्मश्री, साहित्य अकादेमी, जम्मू-काश्मीर कल्चरल अकादेमी, सोव्हिएत लँड नेहरू, हिंदी अकादेमी, हार्मोनी अ‍ॅवार्ड, राजा राममोहन राय, माता कुसुम कुमारी आंतरदेशीय पुरस्कार, जोश्व अ‍ॅवार्ड, साहित्य अकादेमी अनुवाद, अनुवाद परिषद असे अनेक मानसन्मान मिळाले आहेत. पुरस्कार मिळाल्यावरच काम केल्याचं सिद्ध होतं यावर त्यांचा विश्वास नाही. त्या म्हणतात, ‘‘पुरस्कारांची मला खूप भीती वाटते. कारण त्यामुळे जिम्मेदारी वाढते. पुरस्कारामुळे स्वत:ला त्या योग्यतेचं बनवावं लागतं, जेणेकरून तो देणा-याला पश्चात्ताप होऊ नये.’’