पहिले पान | मध्यंतर | बुकमार्क | पीडित-दलितांचा चित्रगुप्त

पीडित-दलितांचा चित्रगुप्त

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

डॉ. केशव रेड्डी हे तेलुगूमधील लेखक. लघुकादंबरी या वाङ्मयप्रकारावर विलक्षण पकड असणा-या या लेखकाच्या लघुकादंबऱ्यांचे जवळपास सर्वच भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. सांगलीचे लेखक वसंत केशव पाटील यांनी डॉ. रेड्डी यांच्या काही कादंब-यांचे मराठी अनुवाद केले आहेत. ‘अतडु अडविनि जयिंचाडु’ या रेड्डींच्या लघुकादंबरीचा पाटील यांनी ‘त्याने जंगल जिंकले’ या नावाने केलेला अनुवाद लवकरच ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ प्रकाशित करत आहे. त्यानिमित्ताने डॉ. रेड्डी यांच्या एकंदर लेखनाविषयी..

आधुनिक तेलुगू साहित्याचा इतिहास जेमतेम  शे-सव्वाशे वर्षाचा. अनेकविध प्रयोग आणि चळवळी वगैरेंचा विचार केल्यास तेलुगू कविता ही इतर वाङ्मयप्रकारांपेक्षा आघाडीवर आहे. अलीकडे कादंबरीनेही मनोरंजन करणारा लोकप्रिय वाङ्मयप्रकार म्हणून आपले स्थान पक्के केले आहे. परिणामी मनोरंजनपर कादंब-यांचे पेव फुटले असले तरी भारतीय साहित्यात आदर्शभूत ठरलेले रवीन्द्रनाथ टागोर, शरदबाबू, प्रेमचंद, चल्म यांसारक्या दिग्गजांचा समृद्ध वारसा आणि वसा जपणारे काही मोजके समर्थ कादंबरीकार तेलुगूमध्ये आहेत. त्यात डॉ. केशव रेड्डी यांचे स्थान अग्रभागी आहे.

 

बदलत्या मूल्यव्यवस्थेबरोबर अवघा भारतीय समाज ढवळून निघतो आहे. या स्थित्यंतरात साहित्यही येते. त्यामुळे समाजाची नेमकी नस पकडण्याचे कार्य साहित्याने केले पाहिजे. काय रोग झाला आहे, हे सांगण्यापुरतीच साहित्याची, विशेषत: कादंबरीची मजल असेल तर साहित्य म्हणजे केवल दिखावू आरसाच म्हणायचा! रोगावरील रामबाण उपाय, उपचारादींचा निर्देश करून साहित्य जेव्हा रोगनिर्मूलनाला भिडेल तेव्हाच ते उत्तम व चिरंतन म्हणता येईल.

 

 या भूमिकेचा पुरस्कार करून गंभीरपणे लेखनरत असलेले डॉ. केशव रेड्डी हे पेशाने त्वचारोग - तज्ज्ञ. त्यांचा जन्म 1946 सालचा. माणूस आणि निसर्ग, प्रदेश आणि पर्यावरण यांचा सखोल आणि सर्वंकष वेध व चिंतन यांत रमणारा हा लेखक. उदारमनस्क समाजशास्त्रज्ञाची त्यांच्याकडे अभिजात अशी एक भविष्यदृष्टी आहे. आणि त्याला जोड आहे ती तळागाळातील लोकांविषयीच्या कळवळ्याची.

 

गेली चाळीस वर्षे डॉ. रेड्डी लेखनरत आहेत. त्यांनी बहुतेक सगळ्या लघुकादंब-याच लिहिल्या आहेत. शे-सव्वाशे पानांचा ऐवज पण विलक्षण कसदार आणि कलात्मक. आर्थिक विषमता ही सर्व सामाजिक प्रश्नांचे मूळ असून त्यावरील उपाय म्हणजे वर्ग-संघर्ष, अशी डॉ. रेड्डींची भूमिका आहे. असे असले तरी साहित्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन होत नाही, तर ते भौतिक परिस्थितीच्या माध्यमातून शक्य आहे, असा त्यांचा विश्वास आहे. ते म्हणतात, ‘‘माझ्या भोवतीच्या जगात गरिबी आणि उपासमारी आहे. आणि तोच विषय मला भूरळ घालतो. दीन-दलितांविषयी माझ्या मनात अपार करुणा आहे. जन्माने मी दलित नाही, पण आर्थिकदृष्टय़ा मी स्वत:ला दलितच मानतो. दलित साहित्याला कुठल्या एका जातिधर्माशी जोडणे बरोबर नाही.’’

 

विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तेलुगूमध्ये दलित साहित्याचा उदय होण्याच्या आधीपासून डॉ. रेड्डी दलितांच्या समस्यांचे करुणार्द्र दृष्टीने चित्रण करत आहेत. मानवी संघर्ष निरंतर सुरू असतो अशी त्यांची धारणा आहे. म्हणूनच आपल्या ग्रामीण व्यवस्थेमध्ये आजही अत्यंत निकृष्ट असे जीवन जगणारे हरिजन, गिरीजन, आदिवासी आणि अन्य दलित वर्गाच्या जीवनातील अंधा-या गुहांमध्ये डोकावताना डॉ. रेड्डींची कादंबरी एखाद्या सर्चलाइटप्रमाणे उपयोगी ठरते. कष्टकरी वर्गाचा जीवघेणा संघर्ष हाच त्यांच्या कादंबरीचा मुख्य विषय आहे. त्यामुळेच समीक्षकांनी त्यांच्या कादंब-यांबद्दल लिहिताना सार्थपणे म्हटले आहे,‘‘डॉ. रेड्डींच्या कादंब-या क्रांतीसाठी पोषक भूमिका तयार करतात. त्यांच्या लेखणीने एक ऐतिहासिक उत्तरदायित्व मोठय़ा ताकदीने पेलले आहे.’’

 डॉ. रेड्डींच्या कादंब-यांतील परिसर म्हणजे आंध्रातल्या रॉयलसीमा भागातला चित्तूर जिल्हा. तेथील दीन-दुबळ्यांच्या आक्रोशाचे आणि त्यांच्या रोजच्या गाण्या-गा-हाण्यांचे चित्रण रेड्डींनी आपल्या सर्वच कादंबऱ्यांमधून केले आहे. लेखकाचा प्रकाशझोत राजकीय मिथ्याला बगल देऊन सामाजिक सत्तेवर स्थिर झालेला आहे. साध्या रोजगारासाठी हात पसरणाऱ्या दलितांना मालकाकडून किती यातना दिल्या जातात, त्याचे चित्रण रेड्डी कोणत्याही इझमचा चष्मा न वापरता करतात.

डॉ. रेड्डींची पहिली लघुकादंबरी बानिसलु-भगवान उवाच 1977 साली प्रकाशित झाली. नंतर चिवरी गुडिसे, अतडु अडविनि जयिंचाडू,मूगवानी पिल्लनग्रोवि आणि रामुडुन्नाडु राज्यमुंडादि आदी कादंब-या प्रकाशित झाल्या. अतडु अडविनि जयिंचाडू अर्थात त्याने जंगल जिंकले या कादंबरीत एक म्हातारा, त्याची डुकरीण, तिची नवजात पिल्ले, राखी वय्वय्या व म्हाताऱ्याचा नातू एवढीच पात्रं आहेत. घटनेचा संपूर्ण काळ सूर्यास्त ते सूर्योदय या दरम्यानचा. या एवढय़ा मर्यादित काळात किर्र जंगलात घडलेले विलक्षण नाटय़ रेड्डींनी मोठय़ा ताकदीने उभे केले आहे. त्यामुळे काही समीक्षकांनी या कादंबरीची तुलना जगप्रसिद्ध लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ओल्ड मॅन अँड सी हिच्याशी केली होती. मूगवानी पिल्लनग्रोवि अर्थात मातीमायमध्ये येते ती एका शेतक-याची करुण शोकांतिका-एका भूमिपुत्राची अपूर्व आणि भव्योत्कट अशी कहाणी. बक्की रेड्डी नावाच्या शेतक-याचा काळ्या आईवरील लोभ, त्याचे समर्पण आणि त्याचा धीरोदात्त संधर्ष या साऱ्याने डोळे दिपून जातात. देवदुर्लभ असे भाग्यदान एका वेडय़ा भूमिपुत्राच्या पदरात पडावे ही अदृष्टाची चेष्टा म्हणायची की मातीमायच्या वत्सल मांडीवरील मरणोन्मुख क्षणाचा पार्थिव सोहळा. बक्कीची ही लोकविलक्षण कथा एकदा का आपल्यात शिरली की ती आपल्या पेशीपेशींतून निरंतर निसवत नि पसरत राहते.

 

चिवरी गुडिसे अर्थात अखेरचे झोपडेमध्ये एका पारध्याच्या झोपडीची झालेली करणरम्य वाताहत चित्रित केली आहे. मनवा हा पारधी सतत गांगरलेला. त्याचा मुलगा चिन्या, आगंतुक अवतरलेला साधुबाबा, कुत्रा राजी व क्रूर जमीनदार या पात्रांच्या माध्यमातून जीवनाचे जे विलक्षण रोमहर्षक दर्शन होते. त्याने आपले अंत:करण हेलावून जाते.

 डॉ. रेड्डींची भाषा-शैली मोठी मिताक्षरी आणि संपृक्त आहे. पुन्हा ती तेलुगू ग्रामीण बोली. एकही शब्द व्यर्थ जागा अडवत नाही. सगळी रचना थेट शिल्पासारखी. म्हणूनच एका तेलुगू समीक्षकाने रेड्डींना पीडित-दलितांचा चित्रगुप्त म्हटले आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0