किंग इज किंग

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

किंग जे काही लिहितोय त्यावर वाचकांच्या उडय़ा पडतात, त्याच्या नव्या पुस्तकाची उत्सुकतेने वाट पाहिली जाते, तीस-बत्तीस भाषांमध्ये अनुवादित झालेली त्याची सुमारे चाळीसेक पुस्तकं जवळपास 35 देशांमध्ये खपतात, त्याच्या 38 कादंब-यांवर आधारित चित्रपट आहेत. असे असताना, ‘ह्यॅ, हे काय साहित्यय..?’, असं म्हणून शहामृगासारखं वाळूत डोकं खुपसून सत्याकडे पाठ फिरवण्यात काय अर्थ आहे?

काही दिवसांपूर्वी फोर्ब्ज मासिकाने एक यादी प्रसिद्ध केली. या टॉप टेन यादीचं वेगळेपण होतं ते तिच्या मानक-यांमुळे. केवळ लिखाणावर जगात सर्वाधिक कमाई करणा-या दहा लेखकांची ती यादी आहे. त्यात स्टीफन किंगचं नाव तिस-या क्रमांकावर आहे. किंग म्हणजे भय, रहस्य, विज्ञान, गूढकथांच्या साहित्यप्रवाहातील मानकरी. आपल्या नारायण धारपांच्या पंगतीतला लेखक. त्याचं नाव घेतलं की नाक मुरडलं जाणारच. ट्रॅश, रटाळ चोपडी, प्रवासापुरतं साहित्य अशी सगळी हेटाळणी त्याच्या नावावर गेली कित्येक र्वष जमा आहे. मजेची आणि तितकीच लक्षात घेण्याची गोष्ट म्हणाल तर ही की, फोब्र्जच्या या यादीतील सगळेच्या सगळे मानकरी असेच पॉप्युलिस्ट म्हणून हेटाळले जाणारे पेपरबॅक साहित्य लिहिणारे लेखक आहेत.

 

मग किंगचं लिखाण दुर्लक्षून कसं चालेल? जे रंजकपणे, वेधकपणे सांगितलं जातं, वाचक विकत घेऊन वाचतात, त्यांना आवडतं ते चांगलं लिखाण आणि ते लिहिणारा लेखक लोकप्रिय अशी साधीसरळ कसोटी लावायची झाली तर किंग इज किंग हे समीकरण नाकारणं अशक्य आहे. तो जे काही लिहितोय त्यावर वाचकांच्या उडय़ा पडतात, त्याच्या नव्या पुस्तकाची उत्सुकतेने वाट पाहिली जाते, तीस-बत्तीस भाषांमध्ये अनुवादित झालेली त्याची सुमारे चाळीसेक पुस्तकं जवळपास 35 देशांमध्ये खपतात. (आजवरचा खप सुमारे तीस कोटी प्रती) स्टॅन्ले क्युब्रिकसारखा प्रतिभावंत दिग्दर्शक त्याच्या द शाइनिंगवर चित्रपट बनवतो, त्याच्याच शॉशँक रिडम्प्शन, ग्रीन माइलवर बनलेले चित्रपट ऑस्करसाठी स्पर्धेत असतात. चिल्ड्रेन ऑफ द कॉर्न, द मिस्ट, पेट सिमॅटरी, ग्रेव्हयार्ड शिफ्ट, मिसरी, ड्रीमकॅचर असे सुमारे 38 चित्रपट किंगच्याच कादंब-यांवर आधारित आहेत. असे असताना, ह्यॅ, हे काय साहित्यय..?, असं म्हणून शहामृगासारखं वाळूत डोकं खुपसून सत्याकडे पाठ फिरवण्यात काय अर्थ आहे?

 

अर्थात, किंगला किंवा त्याच्या वाचकांना असे काही प्रश्न पडत नाहीत. तो लिहितो आणि ते वाचतात. त्याच्या एकूणच लिखाणावर भयाची, गूढरम्यतेची, अद्भुत, अनाकलनीय घटनांची गडद छाया असते. सुपरनॅचरल अर्थात अमानवी अस्तित्वांविषयी त्याचं बहुतेक लिखाण असलं तरी त्यानं डार्क टॉवरसारखं अद्भुतरम्यही लिहिलंय आणि विज्ञानकथाही लिहिल्या आहेत. कॅरीनं त्याला भयकथालेखक म्हणून पहिली ओळख दिली. खरं तर त्याने काही अतिंद्रिय शक्ती असलेल्या कॅरीची कथा दोन-चार पानं खरडून नंतर वैतागून फेकून दिली होती. त्याच्या सुदैवानं त्याच्या पत्नीनं ती पानं उचलली, वाचली आणि त्याला कथा पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. कॅरीचे पेपरबॅक हक्क चार लाख डॉलरला विकले गेले आणि किंगनं त्याची प्राध्यापकी सोडून दिली.

 

तो केवळ भयकथा, भूतकथाच लिहितो असं नाही. मानवी मनोव्यापाराचं गढुळलेलं विश्वही तो त्याच्या कथा-कादंब-यांमधून उभं करतो. त्याच्यावर लिहिण्याचं ठरवत होतो आणि शनिवारी रात्री स्टार मूव्हीजवर द मिस्ट सुरू झाला. आपल्याच मनात साकळलेल्या दुष्ट, स्वार्थी, घातकी प्रवृत्तींचं किंगने मिस्टमध्ये यथार्थ चित्रण केलं आहे. घरातील एका जुन्या फडताळात काहीतरी शोधत असताना माझ्या हातात एच. पी. लव्हक्राफ्टचा एक कथासंग्रह पडला. त्याच्या मुखपृष्ठावर असलेलं राक्षसाचं चित्र पाहताना मला एकदम भयकथा लिहिण्याची स्फूर्ती मिळाली.., असं त्यानं एका ठिकाणी म्हटलंय. कॅरी, सालेम्स लॉट, द शायनिंग, द स्टॅण्ड, इट आणि द डार्क टॉवर या कादंबरी मालिकेनं किंगचं नाव बेस्टसेलरच्या प्रभावळीत वाजतगाजत विराजमान केलं.

 भयकथांपेक्षा वेगळ्या जातकुळीतील डार्क टॉवरबद्दल प्रारंभी त्याला फारसा आत्मविश्वास नव्हता. जे. आर. आर. टोल्कीनच्या धाटणीची वाचकांना वेगळ्या विश्वात नेणारी त्याची ही कथामालिका 1982 मध्ये पुस्तकरूपानं प्रसिद्ध झाली ती अवघ्या दहा हजार प्रतींची. त्याच वेळी त्याची इतर पुस्तकं एक लाख, अडीच लाख प्रतींची आवृत्ती या हिशेबानं संपत होती हे इथं लक्षात घ्यायला हवं. तर किंगचं असं काही वेगळं पुस्तक आलंय याची खबर त्याच्या वाचकांमध्ये पसरल्यावर पहिल्या दोन्ही आवृत्त्या हातोहात संपल्या. (आज या आवृत्त्यांना कलेक्टर्स आयटमचं मूल्य आहे). डार्क टॉवरच्या प्रकारचं लिखाण आपल्या थोडक्याच वाचकांना आवडेल या समजापोटी किंगने पहिल्या तीनही आवृत्त्यांची प्रतसंख्या अगदी कमी ठेवली होती. 2004 पर्यंत त्याने या मालिकेत सात कादंब-या लिहिल्या, पहिल्या मूळ कथानकाचं पुनर्लेखन केलं. मधल्या काळात तो त्याचं नेहमीच्या भय, गूढकथाही लिहीत होताच. त्यातील सात कादंबऱ्या त्याने रिचर्ड बाखमॅन नावानं लिहिल्या.

काही वर्षापूर्वी झालेल्या अपघातानंतर त्याचा लिहिण्याचा वेग जरा कमी झालाय. लेखनासाठी मेहनत घ्यायलाच हवी असं मानणारा किंग नवोदितांना फार चांगला सल्ला देतो - दररोज किमान चार ते सहा तास वाचन-लिखाण झालंच पाहिजे. तितका वेळ तुम्ही देऊ शकत नसाल तर चांगले लेखक होण्याची आशा तुम्ही सोडलेलीच बरी. किंगच्या मते, चांगलं लिखाण म्हणजे जे स्वीकारलं जातं, त्यासाठी मानधनाचा चेक येतो, तो वटतो आणि तुम्ही त्या पैशांमधून तुमची बिलं भागवता, हे जर जमू लागलं तर समजा तुम्ही चांगले लेखक आहात..

 सर्वसामान्यांना अघटित, अकल्पित अडथळ्यांची, विस्कळीतपणाची कुठेतरी भीती वाटत असते. पाण्याच्या संथ प्रवाहात कुणीतरी दगड भिरकवल्यावर जशी खळबळ उडते तशीच खळबळ आपल्या मनामध्ये उडते. मी याच मानसिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न करतो, असं किंग त्याच्या लिखाणाविषयी म्हणत असला तरी त्याच्या टीकाकारांना त्याचं लेखकपणच मान्य नाही. काही वर्षापूर्वी नॅशनल बुक फाऊंडेशननं त्याला मौलिक योगदानाबद्दल सन्मानित केलं होतं. तेव्हा लॉस एंजेलिस टाइम्समधून हॅरॉल्ड ब्लुम यांनी त्याच्यावर सडकून टीका केली होती. किंगची लेखक म्हणून काय लायकी आहे, भले त्याच्या कादंब-या लाखोंनी खपत असल्या तरी त्याच्यात कुठलीच पात्रता नाही.., असं काय-काय त्यांनी लिहिलं आहे.बिग मॅक आणि फ्राइज् ज्या प्रकारे हातोहात खपतात तसाच काहीसा प्रकार साहित्यक्षेत्रात माझ्या बाबतीत घडतोय.., असं सांगत किंगनं ब्लुममहाशयांनी खपाच्या बाबतीत केलेल्या विधानाशी कधीच सहमती दर्शवली आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0