समाधानाची ऊर्जा देणारं घर
शिक्षण, संस्कार, शिस्त, आरोग्य या चार सूत्रांना मनापासून मानणारं शोभा आणि नंदकुमार यांचं ठाण्याच्या ‘हायलँड रेसिडन्सी’मधील ‘सनफ्लॉवर’ इमारतीतलं हे घर. पती-पत्नी आणि दोन मुलं अशा चौकोनी कुटुंबानं घराच्या सजावटीसाठी आपापल्या कल्पना मांडल्या आणि त्यातून एक सुंदर घरकुल तयार झालं.
शहराच्या गर्दी गोंगाटापासून थोडंसं दूर, पण शहराच्या लगत असणा-या गृहनिर्माण संस्थांमध्ये घर घेण्याचा अनेकांचा कल असतो. ठाणे शहराला लागून अनेक संकुलं उभी राहताहेत. आठ-दहा वर्षापूर्वी कोलशेत-ढोकाळी रोड किंवा घोडबंदर रोडवरील सदनिकांचे भाव सर्वसामान्यांच्या आटोक्यात होते. १ हजार ते बाराशे रुपये स्क्वेअर फूट दरानं बुकिंग व्हायचं. तेव्हा शोभा आणि नंदकुमार (नायर) दाम्पत्याने ‘हायलँड रेसिडन्सी’मध्ये सनफ्लॉवर इमारतीत घर पसंत केलं. परवडणा-या दरात तिस-या मजल्यावरील दोन लगतचे फ्लॅट त्यांना मिळाले. या गोष्टीलाही पाहता पाहता सातेक र्वष झाली. मध्यंतरी शोभा नंदकुमार यांनी आपल्या सुमारे १२०० स्क्वेअर फुटांच्या या घराचं रिनोव्हेशनही केलं. पती-पत्नी आणि दोन मुलं असं हे चौकोनी कुटुंब आहे. प्रत्येकाची आवडनिवड जपण्यासाठीच नायर कुटुंबाला मोठय़ा घराची गरज होती.
शोभा ठाण्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुख्याध्यापिका आहेत. शिक्षणक्षेत्रात कार्यरत असतानाही त्यांनी वेळात वेळ काढून घराच्या सजावटीकडे लक्ष दिलं. पती नंदकुमार आणि मुलं सुरज व निरज यांनी त्यांना या कामात मदत केली. चौघांनी रंगसंगती, फर्निचर, डेकोरेशन, मांडणी, सजावट प्रत्येक बाबीवर एकत्र बसून चर्चा केली आणि त्यातूनच त्यांच्या हस-या स्वभावाचं प्रतिबिंब असणारं घर साकारलं. पती-पत्नी दोघं केरळचे. परंतु विवाहानंतर ते मुंबईत आले. आधी अँटॉप हिल येथील सीजीएस कॉलनी, नंतर ठाण्यातील कोरस पार्क, खोपट येथील कपिलवास्तू येथील घरं बदलली. पण त्यांच्या मोठ्या घराचं स्वप्न पूर्ण केलं ते सनफ्लॉवरमधील स्वीट होमनं. याच वास्तूमध्ये या दाम्पत्याच्या विवाहाचा रौप्यमहोत्सवही गेल्या वर्षी जुलै महिन्यात साजरा झाला.
‘घर मोठं असलं की त्याची देखभाल करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. पूर्वेच्या भिंतीला लांबलचक खिडकी असल्यानं आणि समोरच्या इमारतीदरम्यान भरपूर जागा मोकळी असल्यानं मुबलक हवा येतेच, पण काही प्रमाणात धूळही येते. या धुळीचा प्रतिबंध करण्यासाठी नेटलॉनच्या जाळी लावून घेतल्या आहेत. काचेच्या स्लायडिंग आहेच, आतल्या बाजूला अॅडजेस्टेबल विंडो-कर्टन्स लावून घेतल्यात. शिवाय मास्टर बेडरूमला एसी बसवला आहे.’ शोभा सांगतात.
या घरातील सुसंस्कृत सदस्यांच्या कलात्मकतेची झलक दिसते, ती दरवाजावरील आकर्षक लाकडी नेमप्लेटपासून. हॉलमध्ये सोफा, आरामखुच्र्या, छोट्या बैठका, ग्रेनाईटचा ओटा, डायनिंग, त्याभोवतीच्या लाकडी खुच्र्या, खुच्र्या-सोफ्याचे आगळ्यावेगळ्या रंगसंगतीचे ज्यूट-कॉटनचे कुशन यांची मांडणी आहे. दरवाजासमोरच विरुद्ध दिशेला असणा-या खिडक्यांच्या मधोमध छोटंसं लाकडी टेबल असून त्यावर दोन दक्षिण भारतीय समया आणि पितळी भांड्यांचा सेट ठेवलाय. घरात प्रवेश करणाऱ्यांना प्रसन्न वाटावं हा त्यामागचा उद्देश. उजवीकडील कोप-यात एक लाकडी कॉर्नर टेबल आहे. त्यात शोभेच्या वस्तू ठेवल्या आहेत. सोफ्यासमोर काचेचा टीपॉय आहे. डावीकडील कोप-यात टीव्ही, स्पीकर्स यांना जागा करून दिली आहे. हॉलमधील कुठल्याही कोनातून टीव्ही पाहता यावा ही यामागील संकल्पना आहे. भिंतींवर पेंटिंग्ज आणि भवानी देवीची तसबीर आहे. लाइट यलो शेडच्या मार्बल टाइल्समुळे दिवाणखान्याला झळाळी आली आहे. वास्तुशास्त्रावर या कुटुंबाचा विश्वास आहे.
‘घराचे रिनोव्हेशन करताना मी, पती आणि आर्किटेक्चर इंजिनीअरिंग करणारा मोठा मुलगा सुरज, तसंच दहावीत असणारा नीरज सर्वानी मिळून आपापल्या कल्पना मांडल्या. प्रत्येकाची आवडनिवड मिळतीजुळती होती, हे विशेष. त्यानुसार भिंतींना रंग असो की, फर्निचर कव्हर असो, आम्ही घरातील वस्तूंच्या मांडणीला पुरक अशी सजावट केली. किचनमधील गॅस ओटा, सामान ठेवण्याचे रॅक, आमच्या मास्टर बेडरूममधील भिंतीवरील रंगाच्या डार्क-लाइट ब्ल्यू शेड्स, अॅटॅच्ड बाथरूममधील टाइल्स वगैरे यात नवेपण तसंच वैविध्यपूर्णता कशी आणता येईल, याचा विचारही झाला. त्यानुसार आखणी केली गेली. छोट्याची स्टडी रूम आणि मोठ्या मुलाची खोली यांनाही त्यांच्या स्वभावानुसार सजवलं. प्रत्येक खोलीला वेगवेगळा रंग देण्याची कल्पना सर्वानाच आवडली. त्यातही एक रंग गडद, दुसरा रंग फिका अशी थोडी आगळी रंगसंगती केली,’ शोभा आपल्या घराच्या सजावटीची माहिती देतात.
आपल्या घरात प्रवेश केल्यावर कुणालाही आपलेपण वाटावं, असं नायर कुटुंबाला मनापासून वाटतं. त्यांच्या घराच्या सजावटीतून त्याचंच प्रबिबिंब दिसतं.



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (1 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा