बुलंद, बेलाग, बेफाम चढाई
बेफाम उंची, अत्यंत कठीण आणि ठिसूळ अशी मिश्र प्रस्तररचना, तांत्रिकदृष्टय़ा कठीण आरोहण, सुरक्षादोर कापून काढणारे धारदार खडक, पाण्याचं दुर्भिक्ष्य, जंगली श्वापदांचा मुक्त वावर यांमुळे माहुली अभेद्य समजला जातो. मनगटात जोर आणि उरात धमक असेल त्यानेच माहुलीच्या वाटेला जावं, असं म्हणतात. अत्याधुनिक साधनसामग्री, सुमारे 100 हून अधिक कडे-सुळक्यांवरील चढाईचा भक्कम अनुभव आणि कुशल आरोहकांचा तगडा संघ घेऊन ‘सॅक’ने किल्ले माहुलीच्या घे-यातील तीन अजस्र सुळक्यांचं अजिंक्यत्व संपुष्टात आणलं.
‘दुरून डोंगर साजरे’ या अर्थाची म्हण जगातील जवळजवळ सर्वच भाषांमध्ये आढळते. डोंगरावर जाणं टाळणा-या महाभागांनीच ती तयार केली असावी. डोंगरावर जीवापाड प्रेम करणारे साहसी गिर्यारोहक मात्र या म्हणीतील शब्दश: अर्थाकडे सपशेल दुर्लक्ष करतात. अशाच शेकडो गिरी-निसर्ग-साहसप्रेमींनी गिर्यारोहणाचा समृद्ध वारसा महाराष्ट्रात एका मोठय़ा परंपरेने जपला आहे. साहसी गिर्यारोहकांच्या परंपरेत आज मुंबईतील ‘दि सह्याद्री अॅडव्हेंचर क्लब’ अर्थात ‘सॅक’ या निव्वळ प्रस्तरारोहणाला वाहिलेली संस्था आघाडीवर असल्याचे दिसून येते.
26 जानेवारी 2000 रोजी ‘सॅक’ची स्थापना झाली तेव्हापासून आजतागायत प्रत्येक प्रजासत्ताक दिन एखाद्या बेलाग सुळक्यावर साजरा करण्याची परंपरा ‘सॅक’ने जपलीय. यंदा ‘सॅक’ने बारावं वर्ष पूर्ण केलं आणि या तपपूर्तीचा जल्लोषदेखील तितक्याच जोषात साजरा केला. यानिमित्त युवा-सह्याद्रीचा साहसी संबंध अधोरेखित करण्याकरता ‘सॅक युवा सह्याद्री-2012’ या भव्य, महत्त्वाकांक्षी प्रस्तरारोहण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या विक्रमी मोहिमेकरता आधीच पाहणी मोहिमेत हेरलेल्या अजिंक्य सुळक्यांच्या चढाईकरता ‘सॅक’चा चमू 21 जानेवारीच्या मध्यरात्री किल्ले माहुलीच्या पायथ्याशी दाखल झाला. सुमारे महिनाभर आधी ‘सॅक’चे ज्येष्ठ आरोहक संतोष निगडे आणि आनंद शिंदे यांनी गुरू आगिवले या ग्रामस्थासह माहुलीवरील अनवट वाटांवर भ्रमंती करून काही नोंदी घेतल्या होत्या. माहुलीतील प्रस्तरारोहण हे महाराष्ट्रातील सर्वात अवघड आरोहण मानलं जातं. बेफाम उंची, अत्यंत कठीण आणि ठिसूळ अशी मिश्र प्रस्तररचना, तांत्रिकदृष्टय़ा कठीण आरोहण, सुरक्षादोर कापून काढणारे धारदार खडक, पाण्याचं दुर्भिक्ष्य, जंगली श्वापदांचा मुक्त वावर यांमुळे माहुली अभेद्य समजला जातो. मनगटात जोर आणि उरात धमक असेल तरच माहुलीच्या वाटेला जायचे अन्यथा ‘दुरून डोंगर साजरे’ आहेतच. अत्याधुनिक साधनसामग्री, सुमारे 100 हून अधिक कडे-सुळक्यांवरील चढाईचा भक्कम अनुभव आणि कुशल आरोहकांचा तगडा संघ घेऊन ‘सॅक’च्या १३व्या मोहिमेला ज्येष्ठ आरोहक संतोष निगडे यांच्या दमदार नेतृत्वाखाली सुरुवात झाली.
पाहणी मोहिमेत हेरलेल्या अजिंक्य सुळक्यांवरील पहिली दमदार चढाई 22 जानेवारी रोजी सकाळीच सुरू झाली. महादेव गायकवाड या कसलेल्या आरोहकाने चढाईला हात घातला. गडमाथ्याच्या उत्तरेकडील कणगा सुळक्याशेजारचं हे टोक. इथून सुळक्याचं दर्शन होत नाही. याकरता माथ्यावरून सुमारे 300 फूट खाली किल्ला आणि सुळका यांच्या अरुंद खिंडीत रॅपलिंगद्वारे काळजीपूर्वक उतरावं लागतं. जेमतेम तिघं-चौघं मुश्किलीनं उभे राहतील अशा या अरुंद खिंडीत रॅपलिंग करत काळजीपूर्वक उतरावं लागतं. इथे उभं राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणंच. महादेवने किल्ल्याच्या भिंतीला पाठ लावून चिमणीचा अंदाज घेतला आणि अक्षरश: एखाद्या घोरपडीने कडा सर करावा असं तंत्रशुद्ध आरोहणाचं प्रदर्शन करत तो त्या अंगावर येणा-या उभ्या ताशीव कडय़ाचा टप्प्याटप्प्यावर वेध घेऊ लागला. सुंदर मुक्त चढाईबरोबरच कृत्रिम चढाईद्वारे महादेवने दिवसभरात सुमारे सहा खिळ्यांचा खुबीने वापर करत सायंकाळपर्यंत बाजी मारली आणि त्या बलाढय़, अनगड सुळक्याचं आव्हान संपुष्टात आणून त्यावर ‘सॅक’ची यशोपताका फडकावली. पाठोपाठ ग्रामस्थ गुरू आणि इतर सदस्यांनी आरोहण पूर्ण केलं. आरोहणादरम्यान संजय टिक्का यांच्या पायाला झालेल्या एका लहानशा दुखापतीने माहुली गडावर रुधिराभिषेकच झाला. मोहिमेच्या रितसर सुरुवातीची जणू खूण होती ती. मोहिमेची सलामी तर जोरदार झाली. सलामीलाच एका अजिंक्य सुळका काबीज केल्यानंतर 23 जानेवारीच्या पहाटे महेंद्र कुबल या दमदार आरोहकाच्या नेतृत्वाखाली आणखी एका बलदंड सुळक्याच्या चढाईला प्रारंभ केला. सुरुवात अन् अपयश असं महिंद्राबाबत सहसा घडत नाही. खतरनाक चढाई पूर्ण करत त्याने मोहिमेचा दुसरा-तिसरा दिवस गाजवला आणि आणखी एका 350 फुटी अजिंक्य सुळक्यांवर ‘सॅक’चं निशाण रोवलं.
मोहिमेच्या पाचव्या दिवशी परिसरात आणखी एक सुळका आढळला. आता मात्र ‘सॅक’च्या नवोदित फळीतील तुळशीदास मांजरेकर यांच्यावर आव्हान सोपवलं. सुमारे तीन तासांच्या अथक आणि कुशल चढाईनंतर मोहिमेतील तिसरा सुळकादेखील पादाक्रांत झाला. सलग पाच दिवस चाललेल्या या भव्य मोहिमेत किल्ले माहुलीच्या घेऱ्यातील तीन अजस्त्र सुळक्यांचं अजिंक्यत्व संपुष्टात आणून ‘सॅक’नं त्यांचं साजेसं नामकरणदेखील केलं. ‘सॅक युवा सह्याद्री 2012’चं नेतृत्व संतोष निगडे यांनी केलं. महादेव गायकवाड आणि महेंद्र कुबल हे दोन कसलेले आरोहक त्यांचे सहाय्यक होते. ज्येष्ठ आरोहक दत्तू शिंदे आणि दत्ता चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली तुळशीदास मांजरेकर, सुरेश नागवेकर मुख्य आरोहण संघाच्या अहोरात्र मदतीस होते. रंजन गावडे, विनायक वाडेकर, सचिन दाभोळकर अशा कुशल आरोहक-छायाचित्रकारांनी आरोहकांचा थरार मोठय़ा कुशलतेनं कॅमेराबद्ध केला.
गिर्याराहण ही केवळ पुरुष आरोहकांची मक्तेदारी राहिलेली नाही. ‘सॅक’च्या मनीषा ठोंबरे, जयश्री वाईकर, मेघना परब, मनीषा राखुंडे, नमिता दैत तसंच अवघ्या 10 वर्षाची बालमोहनची विद्यार्थिनी मधुरा गावडे या जिगरबाज आरोहकांनीदेखील मोहिमेतील अजिंक्य सुळके सर करून ‘हम किसीसे कम नही’ याचा प्रत्यय दिला. अशा मोहिमांची मुख्य मदार असते ती सपोर्ट टीमवर. माहुलीचे प्रेमळ ग्रामस्थ आणि ‘सॅक’चे बबनराव केमकर व रवींद्र खुळे तसंच किशोर कदम, शैलेश चव्हाण, अजय चव्हाण, प्रतीक झांझड, संदेश सोनावळे, अमेय पारकर यांच्या सपोर्ट टीमने मोठय़ा खुबीने ही जबाबदारी पार पाडली. तसंच ‘गिरीविहार’चे अभिजीत बर्मन ऊर्फ बॉग यांनीही मोहिमेला तांत्रिकदृष्टय़ा मोलाची मदत केली. नववर्षाच्या सुरुवातीलाच ‘सॅक’ने या मोहिमेतील जबदरस्त यशाने आगामी मोहिमांची नांदीच झाली. तपपूर्तीनिमित्त ‘सॅक’मार्फत आगामी वर्षभरात एका भव्य हिमालयीन मोहिमेसह सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि अपंग बांधव यांच्याकरता साहसविषयक अनेक उपक्रमांचा संकल्प केलेला आहे.
100 कडे-सुळक्यांवरील यशस्वी चढाईचा विक्रमी टप्पा कधीच ओलांडलेल्या ‘सॅक’ने गेल्या काही वर्षात रोमांचक प्रस्तरारोहणाद्वारे आपला दरारा निर्माण केला आहे. केवळ प्रस्तरारोहण करणाऱ्या ‘सॅक’च्या जांबाज पथकाच्या मनामनांत जाज्वल्य देशभावना, निसर्गाबद्दल अतिव आदर आणि ‘गुरू’सारख्या गिरीजनांबद्दल नितांत प्रेम आहे. या महामोहिमेत सर केलेल्या तीन अजिंक्य सुळक्यांचं गुरू- 1, 2 आणि 3 असं नामकरण करून ‘सॅक’ने गुरू आगिवलेच्या साहसाला सलामच केला आहे. गुरू आगिवले हा माहुली गावातील किल्ले माहुलीचा एक अवलिया वारकरी. इतिहासात शिवछत्रपतींनादेखील त्रासदायक ठरलेल्या या गडाचा कानाकोपरा माहीत असलेला गुरू हा एक आदर्श माउंटन गाइड. गेली अनेक वर्ष त्याचं घर ‘सॅक’ आणि इतर अनेक संस्थांसाठी बेसकँप बनलं आहे. माहुलीचं यथासांग दर्शन घडवणाऱ्या या सह्यपुत्राचं नाव घे-यातील अजिंक्य सुळक्यांना मिळाल्याचं पाहून माहुलीचा गडपुरुषदेखील गहिवरला असेल.
गुरूचे मोठे बंधू कृष्णा आगिवले यांनीही माहुलीतील प्रस्तरारोहणात अनेक वर्ष अजोड सहकार्य केलं. यातीलच एका अजिंक्य सुळक्याला पूर्वी त्यांचंदेखील नाव दिलं गेलं आहे. गिर्यारोहकांनी केलेल्या या आगळ्यावेगळ्या नामकरणाने हे बंधू महाराष्ट्राच्या गिर्यारोहणाच्या इतिहासात अजरामर झाले आहेत हे नक्की.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा