पहिले पान | मध्यंतर | साय-फाय | मोनोरेलची धाव!

मोनोरेलची धाव!

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

मुंबईत लवकरच मोनोरेल धावणार आहे. जमिनीपासून विशिष्ट उंचीवर सुनियोजित पद्धतीने बांधलेल्या खांबावरून धावणा-या या वाहतूक व्यवस्थेमुळे मुंबईतील ट्रॅफिकचा ताण हलका होणार आहे. तसंच दररोज प्रवास करणा-या प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारी रोजी प्रस्तावित मुंबई मोनोरेलप्रकल्पाची चाचणी वडाळा येथे यशस्वीरीत्या पार पडली. महानगराच्या वाहतुकीच्या समस्येवर महत्त्वपूर्ण असा उपाय ठरेल, अशी मोनोरेल डिसेंबर २०१०पर्यंत मुंबईत धावू लागेल अशी आश्वासक चिन्हं या चाचणीतून मिळाली व मुंबईकरांना हायसं वाटलं. पण ही मोनोरेल नेमकी कशी चालते? या तंत्रज्ञानाचा उगम कुठून झाला? याविषयी जाणून घेणं यानिमित्ताने रंजक ठरावं.

 

मोनोरेल पहिल्यांदा १८२०मध्ये रशिया येथे तयार झाली आणि तिचे निर्माते होते इवान एल्मानोव. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासूनच प्रचलित रेल्वे व्यवस्थेला पर्यायी वाहतूक व्यवस्था उभारण्याचे प्रयत्न चालू होते, त्यास मोनोरेलच्या निर्माणानंतर यश आलं. मोनोरेलचं पेटंट मिळविण्याचा व पहिल्या प्रवासी मोनोरेलचा मान मात्र जातो इंग्लंडकडे. इंग्लंडमधील हेन्री पाल्मरने मोनोरेलचं पेटंट मिळवलं व खाणीत मर्यादित जागेत दगडांची ने-आण करण्यासाठी प्रथम तिचा वापर केला. पुढे तिचाच वापर प्रवासी वाहतुकीसाठी झाला.

 

मोनोरेलच्या सुरुवातीच्या काळात तिचं स्वरूप दोन कडा असलेल्या धातूच्या एका रुळावर चालणारी रेल्वे असं होतं. तिच्या डब्यांची रचना एका रुळावर उभे राहतील, अशी होती. मोनोरेलने प्रस्थापित दोन रुळांच्या रेल्वेस पर्याय उपलब्ध करून दिला, पण वाचून आश्चर्य वाटेल की, १८५७मध्ये दोन रुळांच्या रेल्वे पाठोपाठ प्राथमिक अवस्थेतील ही मोनोरेल भारतातही धावत होती. पतियाला स्टेट मोनोरेल ट्रेनवे (पी.एस.एम.टी.) या नावाने ओळखल्या जाणा-या या संस्थेच्या अंतर्गत अशी मोनोरेल १९१० ते १९२७पर्यंत धावत होती. या मोनोरेलची कार्यपद्धती संयुक्त कार्यप्रणालीवर आधारित होती. ती म्हणजे डब्यांचा भार उचलणारा एकमेव रूळ व हा भार विभागून घेणारी अतिरिक्त चाकं. या मोनोरेलचं इंजिन व डबे आजही नवी दिल्लीच्या राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय (नॅशनल रेल्वे म्युझियम)मध्ये जतन करून ठेवण्यात आले आहेत.

  १९०० ते १९५०पर्यंत मोनोरेल म्हणजे एका रुळावर चालणाऱ्या रेल्वेच्या स्वरूपात फारसा बदल झाला नाही आणि जे बदल सुचवले गेले ते कागदापुरतेच मर्यादित राहिले. १९५०नंतर ख-या अर्थाने मोनोरेलच्या संकल्पनेत व रचनेत बदल होण्यास सुरुवात झाली. पहिला बदल होता तो म्हणजे, आता मोनोरेल जमिनीवरून उंचीवर म्हणजे सुनियोजित पद्धतीने बांधलेल्या खांबांवरून धावू लागली. तिच्या एकूण रचनेत बदल व आधुनिकता येऊ लागली. अशा आधुनिक मोनोरेल कॅलिफोर्नियातील डिस्नेलँड तसंच फ्लोरिडा, सिएटल, जपान इत्यादी ठिकाणी धावू लागल्या.

मोनोरेलला तिच्या रुळांवरून धावण्याच्या किंवा डब्यांच्या स्थितीनुसार दोन प्रकारांत विभागलं जातं.

 

स्टॅडल बीम मोनोरेल : सध्या प्रचलित असलेला हा मोनोरेलचा प्रकार मुंबईत आपल्याला दिसेल. विशिष्ट प्रक्रिया व पद्धतीने पोलादाच्या जाळीने मजबूत केलेल्या खांबांवरून ही मोनोरेल धावते. डब्यांचा तोल राखण्यासाठी दोन्ही बाजूस रबरी चाकेही असतात. ही पद्धत जर्मनीच्या अलवेगया कंपनीने लोकप्रिय केली.

 

सस्पेंडेड मोनोरेल : या प्रकारात उभारलेल्या खांबांमध्ये रबरी चाके फिरतात व डबे खांबांच्या खाली लोंबकाळत्या अवस्थेत असतात, याला स्कायबसअसंही नाव आहे. हा प्रकार फ्रान्सच्या सेफेजया कंपनीने विकसित केला आहे. बहुतेक मोनोरेलमध्ये ऊर्जेसाठी विद्युत मोटारचा वापर केला जातो; पण हल्ली जर्मन तंत्रज्ञांनी विकसित केलेल्या मॅग्नेटिक लॅविटेशन या चुंबकीय शक्तीचा वापर करून मोनोरेलला ऊर्जा पुरवण्याची सोय झाली आहे. ज्यामुळे मोनोरेल सुपरफास्ट वेगानेही धावू शकते.

मोनोरेलच्या बाबतीत बोलायचं झालं तर फायद्यांच्या दृष्टीने ती इतर वाहतूक प्रकाराहून उजवी ठरते. मोनोरेलचे आणखी काही फायदे आपण पाहू -
  • मोनोरेल खांबांवरच उभारली जात असल्याने कमी जागा लागते.
  • लोकल रेल्वेच्या बांधणीच्या खर्चापेक्षा मोनोरेलचा खर्च तुलनेने    कमी आहे.          
  • प्रचलित वाहतूक व्यवस्थेत मोनोरेल हस्तक्षेप करत नाही.
  • मोनोरेल रुळावरून घसरण्याची शक्यताच नाही. (अपवाद : नैसर्गिक आपत्तींमुळे खांबांमुळे काही दोष असल्यास)
  • सर्वात महत्त्वाचा मुख्य मुद्दा म्हणजे, मोनोरेल प्रदूषणरहित आहे.
 अशी ही आधुनिक तंत्रज्ञानाची वेगवान मोनोरेल काही महिन्यांतच मुंबईत आपल्या डोळ्यासमोर धावू लागेल व परदेशातील दळणवळाणाचा एक उत्तम पर्याय आपल्यासाठीही उपलब्ध होईल.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0