PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: हिमकल्लोळ! हिमकल्लोळ! ================================================================================ वैभव वझे on 16 February, 2010 08:00:00 AM हिमकडा कोसळण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. याची शास्त्रीय कारणे कोणती, याचा शोध वारंवार आणि सातत्यानं घेतला जात आहे. हे हिमकडे एकदम, अचानक कोसळतात असं म्हणणं योग्य होणार नाही. प्रत्येक हिमकडा कोसळण्यापूर्वी काही दिवस त्याची सूचना देत असतो. फक्त ही सूचना आपल्याला ऐकू येत नाही हेच आपलं दुर्दैव. हिमकडा कोसळला की मगच ही भयंकर आपत्ती आपल्या लक्षात येते. दरवर्षी असे हिमकडे कोसळून सरासरी 150 व्यक्ती मरण पावतात. त्यामध्ये व्यक्तींमध्ये गुराखी, जवान, ‘स्किअर्स’, गिर्यारोहक यांचा समावेश होतो. हिमकडा कोसळतो म्हणजे नेमकं काय होतं, याचा शास्त्रीय अभ्यास झाला आहे. सर्वसामान्यांच्या ज्ञानानुसार, एका खडकाळ पृष्ठभागावर वर्षानुवर्ष बर्फ जमतं आणि त्यातून बर्फाळ डोंगर तयार होतो. या मूळ डोंगरावर, त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक बर्फ जमला की तो एके दिवशी अचानक कोसळतो. परंतु वास्तवात ही प्रक्रिया इतकी सोपी नसते. हिमकडा कोसळण्यामागे भूप्रतलाच्या हालचाली, दूरवर होत असलेल्या भूकंपाचा अप्रत्यक्ष धक्का (पॅसिव्ह क्वेक), प्रस्तरभंग अशा महत्त्वाच्या पण भूपृष्ठावर न जाणवणा-या हालचाली कारणीभूत असतात. आणखी काही कारणं हिमकडा कोसळण्यासाठी दिसतात. त्यापैकी महत्त्वाची कारणं म्हणजे या डोंगररांगांत होणारी वादळं, सोसाट्याचा वारा, मोठय़ा प्रमाणात होणारी बर्फवृष्टी किंवा पावसाळ्यात वीज पडणं. आशिया खंडाचा विचार केला तर असं दिसतं की, 10 टक्के खंड हा हिमकडा कोसळण्याच्या प्रदेशात येतो. 1995 ते 2006 या काळात सर्वाधिक हिमकडे हिमालयाच्या भारतीय हद्दीत कोसळले होते. 1971 ते 2005या काळात तर, दरवर्षी 50 माणसं हिमकडा कोसळल्याने मृत्युमुखी पडली होती. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम ही राज्यं हिमकडा कोसळण्याच्या छायेत येणारी आहेत. हिमकडा कोसळण्यामागे भूप्रस्तराची होणारी हालचाल हे महत्त्वाचं कारण आहे. मात्र याला अप्रत्यक्षरीत्या ‘ग्लोबल वॉर्मिग’ हेदेखील महत्त्वाचं कारण आहे. हिमालयाच्या परिसरातलं तापमान वाढून मोठय़ा प्रमाणावर बर्फ वितळतं. असं बर्फ वितळलं तर मग मूळ खडक आणि बर्फ यातला दुवा निखळतो आणि त्यामुळेही अचानक हिमकडा कोसळू शकतो. हिमकडा कोसळू नये यासाठी ग्लोबल वॉर्मिग कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सुरक्षित हिमकड्यांच्या बर्फाची आणखी झीज होणार नाही यासाठीही प्रयत्न होणं आवश्यक आहे. हिमाच्छादित प्रदेशात लोकवस्ती असेल तर या लोकवस्तीला हिमकडा कोसळल्यास काय करावं याचं प्रशिक्षण देणंही गरजेचं आहे. हिमाच्छादित डोंगर ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. तसाच तो पाण्याचा मुख्य स्रेतही आहे. या दोन्ही दृष्टिकोनांतून हिमकड्यांना कोसळण्यापासून वाचवणं आणि पर्यायानं हिमकडय़ांच्या पायथ्याशी असणा-या जीवसृष्टीचं रक्षण करणं हेदेखील आपलं कर्तव्य आहे. * माउंट एव्हरेस्ट, ल्होत्से आणि नुप्त्से या तीन पर्वतांवर हिमकडे कोसळण्याचे प्रकार सर्रास होतात. असा हिमकडा कोसळताना पाहणं पर्यटकांसाठी पर्वणी असते. या तीन पर्वतांच्या परिसरात कोसळणारे हिमकडे जीवितहानी करत नाहीत, असा अनुभव आहे. *हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या कल्पा इथं किन्नौर जिल्ह्याचं मुख्यालय होतं. परंतु सतत कोसळणा-या हिमकडय़ांमुळे ते पिऊ इथं हलवण्यात आलं. *लडाखमधलं तुंडा हे संपूर्ण गाव 1838 मध्ये हिमकडा कोसळून त्याखाली गाडलं गेलं होतं. *हिमालयातल्या स्पिती या दरी प्रदेशात १९७८मध्ये हिमकडा कोसळल्यामुळे तिथल्या लोकांना बाहेर काढणं फार कठीण गेलं होतं. हिमकडे कोसळून देशनिहाय दगावलेल्यांची संख्या (1995 ते 2006 या काळातील) देश व्यक्तींची संख्या अर्मेनिया 5 अझरबैजान 20 इराण 67 चीन 80 जपान 96 तुर्की 138 ताजिकिस्तान 151 अफगाणिस्तान 209 पाकिस्तान 291 भारत 565 ं