PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: भारतातील हिमयुगाच्या स्पष्ट -अस्पष्ट खुणा भारतातील हिमयुगाच्या स्पष्ट -अस्पष्ट खुणा ================================================================================ प्रवीण गवळी on 23 February, 2010 04:00:00 AM गेल्या महिन्यात अनेक देशांत तुफान बर्फवृष्टी झाली आहे. भारतातही हिमालय पर्वतराजीच्या परिसरात नेहमीपेक्षा जास्तच बर्फवृष्टी झाली आहे. ‘ग्लोबल वॉर्मिग’चा हा परिणाम का? आपण या विषयाला बगल देऊ या व भारतीय उपखंडात अवतरलेल्या हिमयुगाचा आढावा घेऊया. पृथ्वीचा जन्म कधी, कसा, कोणत्या परिस्थितीत झाला याचा आता फक्त अंदाज बांधला जाऊ शकतो. आपल्या ग्रहाचा जन्म, त्यानंतर जमीन व वातावरणनिर्मिती तसंच जीवन उत्पत्तीच्या सा-या घडामोडींसाठी किमान दोन-अडीच अब्ज वर्षांचा कालावधी लागला. या कालखंडातील स्थित्यंतराचा इतिहास कोठेही व कोणत्याही स्वरूपात जतन झालेला नाही. पृथ्वीच्या पहिल्या एक-दोन अब्ज वर्षांचा इतिहास हा काही प्रयोगांच्या आधारे, गणिताच्या मदतीने व कल्पनेच्या भरारीने मांडण्यात आलेला आहे. त्यानंतरची माहिती मात्र खडक व जिवाश्मांच्या रूपात जतन झालेली आहे. पृथ्वीवर सर्वाधिक वयाचे जे खडक आढळतात, ते अडीच ते चार अब्ज वर्षाचे आहेत. हे सारे खडक एकाच विशाल महाखंडाचे घटक होते. कालांतराने या महाखंडाचे अनेक तुकडे झाले व खंडीय स्थलांतराच्या सिद्धांतानुसार अनेक ठिकाणी विखुरले गेले. हिमयुगाचा अभ्यास करणा-या वैज्ञानिकांचा असा दावा आहे की, या जगाचे सर्वव्यापी, पहिले हिमयुग सुमारे पंचावन्न कोटी वर्षापूर्वी अवतरलं होतं. या पहिल्या हिमयुगामुळे त्या काळी अस्तित्वात असणा-या बहुतांश सजीवांचा अस्त झाला होता. हिमयुगाचा उद्गम पृथ्वीच्या भ्रमणांश बदलामुळे होतो, हा कित्येकांचा समज आहे. सूर्याभोवती आपल्या पृथ्वीचे भ्रमण अंडाकृती कक्षेत होत असते. त्यामुळे पृथ्वी काही कालावधीसाठी सूर्यापासून लांब जाते. त्या वेळी सूर्यापासून मिळणा-या ऊर्जेत फार मोठय़ा प्रमाणावर घट होते व पृथ्वीवर थंडीचं साम्राज्य पसरतं. ज्वालामुखी उद्रेकही हिमयुग निर्माण करण्याला कारणीभूत ठरतात. ज्वालामुखी व हिमयुग हे समीकरण जरा विचित्रच वाटतं, पण ज्वालामुखी उद्रेकातून लाव्हारसाबरोबर अनेक प्रकारचे वायूदेखील खूप मोठय़ा प्रमाणात वातावरणात प्रवेश करतात. हा बाहेर पडलेला वायू वातावरणात पसरून सूर्यकिरणांना जमिनीवर येण्यापासून मज्जाव करतो. त्यामुळे जमिनीवर पोहोचणा-या ऊर्जेत कमालीची घट होते व पर्यायाने थंडी वाढू लागते. आपल्या पृथ्वीवर कायमस्वरूपी बर्फ फक्त दोन ठिकाणी आढळतो. उत्तर व दक्षिण ध्रुवावर बर्फावर जेव्हा सूर्यकिरणं पडतात. तेव्हा ती इतर ठिकाणांपेक्षा जास्त प्रमाणात वातावरणात परावर्तीत होतात. त्या कारणाने इथले बर्फाचं प्रमाणही वाढत जातं व ध्रुवापासून खाली सरकत विषृववृत्तापर्यंत पोहोचतं असा एक साधा सिद्धांत काही वैज्ञानिकांनी मांडला आहे, पण या सिद्धांतात एक गफलत आहे. पृथ्वीवर कायमस्वरूपी हिमयुग असायला हवं, जे कधीच झालं नाही. सत्तर ते पन्नास कोटी वर्षांदरम्यानच्या कालखंडात आपली पृथ्वी एका ध्रुवापासून दुस-या ध्रुवापर्यंत संपूर्णपणे बर्फाने आच्छादलेली होती. या हिमयुगाच्या पाऊलखुणा आजही पृथ्वीभर जतन झालेल्या आढळून येतात. सूर्यकिरणं परावर्तीत होण्यामुळे हिमसंचय वाढत जातो, हा सिद्धांत मान्य केल्यास पूर्वीचं हिमयुग आजही अबाधित राहायला हवं होतं. पण तसं घडलेलं नाही. कारण पृथ्वी जरी पूर्णपणे बर्फमय झाली तरी काही ठिकाणी तिच्या उदरात उष्णता खेळत असते. ज्वालामुखी उद्रेकावाटे बाहेर पडणारे कार्बन डायऑक्साईडसारखे हरितगृह वायू पृथ्वीचं तापमान वाढवतात व त्यामुळे बर्फ वितळू लागतो. त्यामुळेच हिमसंचय कायमस्वरूपी अस्तित्वात नसतो. हिमयुग अस्तित्वाचे महत्त्वाचे पुरावे काही विशिष्ट खडक, खडकांवर हिमसंचयामुळे झालेले संस्कार तसंच सजीवांची वाढ व -हास हे आहेत. ५५ ते ४४ कोटी वर्षादरम्यान अनेक प्राणी नाश पावले व काही नवीन सजीवांचा या खडतर काळात उदय झाला. २९ ते २१ कोटी वर्षांदरम्यानच्या कालखंडात मध्य व उत्तर भारतात गोंडवाना नावाचा एक अद्भुत खडकसमूह तयार झाला आहे. या खडकसमुहाच्या पायथ्याशी बोल्डर नावाचा खडक प्रकार आहे. बोल्डर खडक सामान्यपणे नदीच्या पात्रात आढळणा-या गारगोट्यांसारखा असतो, पण त्यांच्याइतका गुळगुळीत नसतो. तो असतो फार ओबडधोबड, रखरखीत, एकदम टोकदार. असे दगड फक्त बर्फ पाझरण्याच्या प्रक्रियेद्वारेच तयार होऊ शकतात. हे खडक राजस्थान ते ओरिसा या पट्टय़ात व काश्मीर ते हिमाचल प्रदेशात सापडतात. गोंडवाना खडक समुद्राच्या एकूण सोळा कोटी वर्षादरम्यानच्या काळात हवामानात किमान चार वेळा (थंड-उष्ण-थंड-उष्ण) बदल घडून आला. आज अस्तित्वात असणारा जगाचा नकाशा हा पूर्णाशाने वीस लक्ष वर्षापूर्वी तयार झाला. त्या वेळी भारतीय उपखंडात हत्ती व हत्तीसदृश प्राण्यांचे तीसपेक्षा अधिक प्रकार होते. माकडांचे पंधरापेक्षा जास्त प्रकार होते. त्यातीलच एका प्रकारामधून मानवाचा उत्क्रांतीच्या वाटेने उगम झाला. या व इतर शेकडो प्राण्यांचा अंत वीस लक्ष वर्षापूर्वी अवतरलेल्या हिमयुगांमुळे झाला. हे हिमयुग सा-या पृथ्वीतलावर पसरले होते व या हिमयुगाचे पुरावे जगाच्या कानाकोप-यात आढळतात. उत्तर भारतातही या हिमयुगाचे पुरावे जतन झालेले आहेत, पण दक्षिण भारतात मात्र परिस्थिजन्य पुराव्याच्या आधारे या हिमयुगाच्या निष्कर्षाप्रत पोहोचावं लागतं. नजीकच्या काळात मात्र भारतात हिमयुग अवतरण्याची शक्यता फारच कमी आहे. (लेखक भारतीय भूचुंबकत्व संस्था, मुंबई येथे वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.)