PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: वर्तमानपत्रांद्वारे विज्ञान प्रसार वर्तमानपत्रांद्वारे विज्ञान प्रसार ================================================================================ जोसेफ तुस्कानो on 23 February, 2010 04:30:00 AM सर्वेक्षण घेत असलेल्या एका पत्रकाराने एका खेडुताला त्याचं मत विचारताना प्रश्न केला, ‘माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटात संगणक पूर्णपणे वर्तमानपत्रांची जागा घेईल, असं तुम्हाला वाटतं का?’ त्यावर तो भाबडा खेडूत म्हणाला, ‘ते कसं शक्य आहे? संगणकद्वारे वारा घेणं थोडंच जमू शकेल?’ या किश्शातील विनोदाचा भाग वगळला तर एक गोष्ट निश्चित जाणवते, ती म्हणजे प्रत्येक गोष्टीचं आपलं एक वैशिष्टय़ असतं व त्यामुळे त्याचे अस्तित्व टिकवलं जातं. वाङ्मय क्षणभंगुर असलं तरी लेखन किंवा साहित्य हे चिरकाल टिकतं. साहित्याचं स्वरूप बदललं, वाचक बदलले, त्यांच्या गरजा बदलल्या, साहित्य प्रसारणाचा वेग बदलला तरी अक्षररूपातील साहित्य कायम टिकून राहणार आहे, एवढं मात्र खरं, कारण मुद्रित शब्दांचा पिढय़ान् पिढय़ा मानवी अंतर्मनात पडलेला प्रभाव पटकन संपुष्टात येणार नाही. भाषातज्ज्ञ व्हार्फ म्हणतो त्याप्रमाणे, ‘जे बोलणं लिपीबद्ध स्वरूपात लिहिता येत नाही, ते जाणिवेच्या कक्षेत आणणं, हे अवघड व अशक्यप्राय असतं. जे लिपीबद्ध लेखनातून प्रतिध्वनित होतं, ते पूर्ण प्रतिरूप (मॉडेल) म्हणून समोर येतं?’ याच विचाराचा पाठपुरावा करताना डॉ. डेव्हिड ऑलसन या तज्ज्ञाने म्हटलंय, ‘लेखनाचं जे तंत्र माणसाला उपलब्ध झालं आहे, ते मानवाच्या बौद्धिक व स्मरणात्मक ज्ञान संपादनाला प्रदीर्घ टिकाऊ बैठक देणारं आहे. आपली जगाबद्दलची आधुनिक संकल्पना आणि आपली स्वत:बद्दलची आधुनिक संकल्पना कागद आणि त्यावरचे चिन्हांकित लेखनाची अनुषांगिक निर्मिती होय.’ मानवी जीवनातील ग्रंथ व वर्तमानपत्रं/नियकालिकांचं स्थान या दोन विचारवंतांच्या मनातून स्पष्ट प्रकट होतं. सध्या विज्ञानप्रसाराच्या महत्त्वपूर्ण चळवळीत वर्तमानपत्र आघाडीवर आहेत. काही वर्तमानपत्रं साप्ताहिकं, विज्ञान पुरवण्या काढतात. तर काही वर्तमानपत्रं ठळक वैज्ञानिक घटनांना मुखपृष्ठावर आकृष्ट करणा-या चित्रासह स्थान देऊन वाचकांपर्यंत त्या घडामोडी पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. एखादा गूढ शोध वा क्लिष्ट वैज्ञानिक प्रक्रिया जनसामान्यांना सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं वर्तमानपत्रांचं हे कार्य उल्लेखनीय म्हणावं लागेल. नुकतंच घडलेल्या जिनोम प्रकल्पाचं इतिवृत्त, मंगळावर आढळलेला पाण्याचा अंश, युरोपच्या बर्फाळ भूमीखाली दडलेल्या खा-या समुद्राची शक्यता, प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक्स, चांद्रयान मोहीम इत्यादी घटना याचे पुरावे म्हणून देता येतील. संगणकावरील माहिती महाजालातून जगात कुठे नि काय वाचायला मिळेल, याचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाचक नेहमीच उत्सुक असतात. तसेच दृक्श्राव्य पद्धतीने शास्त्रीय घटना दूरदर्शनवरून पाहताना बहार येईल, परंतु एखाद्या विषयाची संपूर्ण माहिती संगणकावरून वाचणं कितपत सोयीचं ठरेल? समाजात करमणुकीला प्राधान्य दिलं जात असताना, फावल्या वेळात केवळ वैज्ञानिक कार्यक्रम दूरदर्शनवरून पहाणारे विरळाच असतील. वीस वर्षापूर्वी असं एक भाकीत करण्यात आलं होतं की, इ.स. 2000 पर्यंत देशाच कागदाचा वापर बंद होईल. पण आज तसं घडलेलं नाही, हे सत्य आहे, कारण पुस्तकं/वर्तमानपत्रं यातून अक्षररूपाने येणारं साहित्य टिकाऊ स्वरूपात वाचकांना साथ देत असतं. माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीचा वेग पाहता, येत्या काही वर्षातच प्रादेशिक भाषेतील सॉफ्टवेअर्स सर्रास निर्माण होतील व संगणक हा घरोघरीचा गरजेचा भाग बनून राहील, यात शंकाच नाही. तेव्हा, वर्तमानपत्रकांनी आपलं अस्तित्व टिकवताना संगणक व दूरदर्शन या साधनांशी पूरक अशी भूमिका घ्यायला हवी. साधारणपणे आज हॉलिवुड/बॉलिवुडमधील घडामोडींसंबंधी जी भूमिका वर्तमानपत्रं घेत आहेत, तोच पावित्रा त्यांना विज्ञानप्रसाराबाबत यापुढे घ्यावा लागेल. रंगीबेरंगी चित्रांसह वैज्ञानिक घटना वाचकांच्या मनावर बिंबवण्याचे आवाहन नि आव्हान स्वीकारताना, सत्याला पराविज्ञानाचा मुलामा लागणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. कारण यापुढील मानवी जीवन विज्ञान-तंत्रज्ञान इतकं व्यापलेलं असेल की, दैनंदिन जीवन घटना या एकप्रकारे ललित विज्ञान, कथा बनून जाणार आहेत. कमीत-कमी किमतीत उपलब्ध असणारं, प्रवासात सोबत नेता येणारं, खेडोपाडी पसरलेले संदर्भ राखून ठेवता येणारं वर्तमानपत्र हे प्रसारमाध्यमांचं लोकप्रिय साधन असून आगामी दशकात वर्तमानपत्रांना विज्ञानप्रसारासाठी आघाडीची भूमिका घ्यावी लागणार आहे.