PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: हवामान बदल अटळ? हवामान बदल अटळ? ================================================================================ प्रवीण गवळी on 02 March, 2010 09:15:00 AM पर्यावरण हा सध्या एका गटाचा जिव्हाळ्याचा तर दुस-या गटासाठी माथी भडकविणारा विषय झाला आहे. पर्यावरणवादी व प्रगतिवादी एकमेकांविरुद्ध जिवाचं रान करून आगपाखड करीत आहेत, तर सामान्य माणूस पर्यावरण या विषयावरून पार भांबावून गेला आहे. पर्यावरणाचा समतोल राखणं, हे सर्वाचं आद्यकर्तव्य आहे. पर्यावरणाशी निगडित सर्व घटकांची सुरक्षा व त्यांचा विकास ही आपली जबाबदारी आहे, म्हणूनच क्योटो व कोपनहेगन परिषदांची गरज निर्माण झाली. पण पर्यावरण, हवामान, निसर्ग कधीच बदलत नाही का? निसर्गात आजवर कधीच केव्हाच बदल घडलेला नाही का? तो जसा पूर्वी होता तसाच आजही आहे व उद्याही राहणार आहे का? या प्रश्नांचा उलगडा होणं आवश्यक आहे. निसर्गाला स्वत:चा एक ताल आहे. त्याला स्वत:ची एक लय आहे व त्याचा खेळ व कार्यप्रणाली हजारो-लाखो वर्षाची असते. त्याचसाठी आपली विचारसरणी विस्तृत तसंच दीर्घ पल्ल्याची करणं आवश्यक ठरतं. निसर्गाच्या घडामोडींचा आवाका इतका प्रचंड आहे की, वैज्ञानिकांनी शे-दोनशे वर्षाचा कालखंडाचा अभ्यास करून काढलेला निष्कर्ष पृथ्वीच्या सरसकट सा-या घटनाक्रमांना लावणं संयुक्तिक ठरत नाही. आपल्या ग्रहाचा इतिहास पाच अब्ज वर्षाचा आहे व या एवढ्या मोठ्या कालखंडात या ग्रहांवर अनेक बदल व स्थित्यंतरं घडलेली आहेत. हरितगृह वायूमुळे हवामानात बदल घडून येत आहेत किंवा घडतील, या म्हणण्यात तथ्य आहे. पण सारेच बदल हरितगृह परिणामांमुळे होत आहेत का? तसं असेल तर आधीचे बदल कोणत्या कारणामुळे घडून आले? वीस हजार वर्षापूर्वी जागतिक स्तरावरचं तापमान आजच्यापेक्षा एक अंश सेल्सिअसने कमी होतं. तसंच सागरी किनारपट्टी आजच्यापेक्षा १०० मीटरने कमी होती. पृथ्वीचं तापमान अनेकदा कमी-जास्त झालेलं आहे व ते का होत आहे, याचं रहस्य उलगडणं गरजेचं आहे. वातावरणात नैसर्गिक व मानवनिर्मित कारणांमुळे, अनेक वायू निरंतर मिसळत असतात व त्या प्रत्येक घटकाची एकमेकांबरोबर रासयनिक प्रक्रिया घडून आणखी नवे वायू तयार होत असतात. एखाद्या विवक्षित वायूचा साठा वातावरणात वाढू लागला की, त्याचे बरे-वाईट पडसाद संपूर्ण जीवसृष्टीवर पडतात. पर्यावरणात घडून आलेल्या रासायनिक बदलांमुळे प्रिकेम्ब्रियन (साडेचार अब्ज ते ५७ कोटी वर्षे) काळात लोह खनिजाचे अतिप्रचंड साठे निर्माण झाले. त्या काळातील वातावरणात कार्बन डायऑक्साइड व नायट्रोजनचं प्रमाण जास्त तर ऑक्सिजन कमी प्रमाणात होता. लोह व सिलिका हे घटकही फार मोठ्या प्रमाणात त्यावेळच्या समुद्रात विरघळलेल्या अवस्थेत होते. प्रकाश विगमन, प्रकाश संश्लेषण व प्रेसिपिटेशनच्या एकत्रित क्रियांमुळे फेर्रिक लोहाची निर्मिती झाली. फक्त आपल्या देशातच या खनिजाचा सतरा हजार दशलक्ष टन इतका प्रचंड मोठा साठा आढळून येतो जो ३५० ते ३०० कोटी वर्षापूर्वी तयार झाला आहे. हवामानाविषयांचे तज्ज्ञांचे व पर्यावरणवाद्यांचे विचार नित्यनेमाने प्रसिद्ध होत असतात. औद्योगिकीकरणाचे कसे भयावह परिणाम हवामानावर होत आहेत याचं विदारक चित्र सतत आपल्यासमोर उभं केलं जात आहे, पण हवामानाविषयीची परिस्थिती नेमकी कशी आहे? या आधुनिक युगात अनेक जटील समस्यांचा बिमोड करण्यासाठी संगणक प्रणालीचा वापर केला जात असतो. संगणकात प्रचंड मोठ्या प्रमाणावर माहिती जमा केली जाऊ शकते. त्यामुळे कोणत्याही समस्येचं उत्तर मिळवण्यासाठी अनेक परिमाणांचा स्वतंत्ररीत्या किंवा एकत्र विचार करणं शक्य होतं. हवामान व हवामान बदलाचं भाकित वर्तवण्यासाठी संगणकात हवामानाला बदलू शकणा-या अथवा प्रभाव टाकू शकणा-या घटकांची माहिती पुरवली जाते. त्यानंतर जटील गणितीच समीकरणांच्या सहाय्याने संगणक एक ‘उत्तर’ सुचवतो. या सा-या प्रक्रियेला ‘मॉडेलिंग’ म्हणतात. शास्त्रज्ञांनी हवामानबदलासंबंधीची अनेक मॉडेल्स तयार केलेली आहेत. पण या मॉडेल्समुळे वैज्ञानिकांत दोन महत्त्वपूर्ण गट पडलेले आहेत. हरितगृह परिणामांमुळे हवामान बदलत आहे, या मुद्दय़ावरून त्याच्यात वाद निर्माण झाला आहे. एक गट म्हणतो की, पृथ्वीचं तापमान वाढत आहे तर दुसरा गट सांगतो की तिचं तापमान कमी होत आहे. शास्त्रज्ञात हा विरोधाभास का आढळतो? त्यांच्यात एकवाक्यता का नाही? शास्त्रज्ञांच्या हाती ज्ञानाचं भांडार असतं व हाती असलेली माहिती कोणत्या त-हेने वापरत आणल्याने, आपण शोधत असलेल्या समस्येचं निराकरण योग्यरीत्या होईल, याचा वस्तुनिष्ठपणे व सांगोपांग विचार शास्त्रज्ञाला करावा लागतो. जेव्हा ठरविण्याची वेळ येते तेव्हाच्या नाजूक व मोक्याच्या वेळी या शास्त्रज्ञाचे पूर्वग्रह कळत-नकळत परिणाम व घटक निवडीच्या आड येतात. त्यामुळे त्यांच्यात एकवाक्यता आढळत नाही. निसर्गाने कधीही व कोणालाही आतापर्यंत डोईजड होऊ दिलेलं नाही. प्रिकेम्ब्रियन काळाची सुरुवात अतिशय तप्त व उष्ण होती व तिचा शेवट मात्र हिमयुगात झाला. पोलिओझोईक (५७ ते २४.५ कोटी वर्षे) काळाची सुरुवात जीवनाचा फुलोरा उमलल्याने व फुलण्याने झाली. पण या कालखंडाचा शेवट ट्रॉयकोबाइल्स या सागरी प्राण्याच्या समूळ वंशनाशाने झाला. मिसोझोइक (२८ ते ६ कोटी वर्षे) कालखंड महाकाय डायनॉसॉरना, फलदायी ठरला, पण त्याच कालखंडाच्या शेवटाला ते नामशेष झाले. या सा-या कालखंडात सस्तन प्राण्यांचं अस्तित्व अजिबात जाणवत नव्हतं; पण सध्याच्या कालखंडात तेच प्रभावशाली आहेत. याचाच अर्थ असा की निसर्गाने कोणत्याही एका विशिष्ट परिस्थितीला किंवा सजीवाला सार्वभौमत्व बहाल केलेलं नाही. पृथ्वीचा भौतिक चेहरामोहरा सतत बदलत आला आहे. तिचं चुंबकीय क्षेत्रही स्थिर नाही. तसंच हवामानसुद्धा अस्थिर आहे. निसर्गात जर कोणतीच गोष्ट शाश्वत नाही तर पर्यावरणाला ‘जैसे थे’ अवस्थेत ठेवण्याचा अट्टहास कितपत योग्य आहे किंवा यशस्वी ठरू शकतो? बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे व या बदलाशी जुळवून घेणं आपल्या दृष्टीने हितकारक होऊ शकतं. (लेखक भारतीय भूचुंबकत्व, मुंबई येथे वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.)