इंधन बचतीच्या छोट्या क्ऌप्त्या
इंधनाचा साठा जगभर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. या परिस्थितीत इंधनाची बचत करण्याशिवाय गत्यंतर नाही. ही बचत तुम्ही-आम्हीच करू शकतो. त्यासाठी वेगळं काही करयाची गरज नाही. छोट्या-छोट्या गोष्टींतूनही ती होऊ शकते.
ट्रक चालवताना डिझेल कसं वाचवायचं, यासंबंधी ट्रक चालकांना प्रशिक्षण देणारा एक कार्यक्रम ऐन भरात आला होता. खेळीमेळीच्या वातावरणात चालकांना डिझेल वाचवण्याच्या क्लृप्त्या सांगितल्या जात होत्या. ट्रकचा वा बसगाडीचा वेग ताशी 40 ते 50 किमी ठेवल्यास मोठ्या प्रमाणात इंधन वाचतं. भरधाव गाडी चालवण्याने इंधन बचत होते, हा एक गैरसमज आहे. त्यामुळे केवळ अपघात होण्यास आपण कारणीभूत ठरतो. ब्रेक, गियर व तत्सम साधनांचा सुयोग्य वापर करून इंधन बचतीस हातभार लागले, हे त्यांना पटवून दिलं जात होतं. प्रत्यक्ष गाडी चालविताना येणारे अनुभव आणि त्यानुषंगाने डिझेल वाचवण्यासाठी असलेला वाव प्रशिक्षणार्थिना प्रात्यक्षिकाद्वारे दाखवण्यासाठी, त्यांना एका बसगाडीतून नेलं जात होतं. वाटेत चहापानासाठी गाडी थांबवण्यात आल्यावर, त्या चमूच्या प्रशिक्षकाने त्यातील स्मार्ट वाटणा-या ड्रायव्हरकडे गाडीची चावी दिली आणि गाडी स्टार्ट करायला सांगितलं. ड्रायव्हिंगचा हातखंडा असलेला तो हौशी चालक ती चावी हातात नाचवत, तात्काळ ड्रायव्हरच्या केबिनमध्ये शिरू लागला. तोच, त्या प्रशिक्षकाने त्याला हाक मारून परत बोलावलं. आपलं काय चुकलं, हे त्याच्या ध्यानात येईना. इतर प्रशिक्षणार्थी ड्रायव्हर्ससुद्धा बुचकळय़ात पडले. तेव्हा त्या तज्ज्ञ प्रशिक्षकाने त्यांच्या ध्यानात आणून दिलं की, प्रत्येक ड्रायव्हरने गाडी सुरू करण्याआधी आपल्या गाडीभवती एक प्रदक्षिणा घातली पाहिजे आणि टायरची हवा तसंच गाडीची एकूण स्थिती नजरेसमोरून घातली पाहिजे. या दक्षतेमुळे किती तरी डिझेल इंधन वाचू शकतं.
आपल्याकडे सर्वात जास्त खप असलेले पेट्रोलियम इंधन म्हणजे डिझेल होय. डिझेलच्या वाढत्या मागणीमुळे त्याची मोठ्या प्रमाणात आयात करण्याची गरज भासते. त्याच्या तुटवड्यामुळे तर देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणाच मोडल्यागत होईल. डिझेलमध्ये बायो-गॅस मिसळून त्याची बचत करण्यासाठी संशोधकांची खटपट सुरू आहे. पृथ्वीच्या पोटात जितकं पेट्रोलियम खनिज तेल दडलेलं आहे, तितक्याच प्रचंड प्रमाणात नैसर्गिक वायू कोंबलेला आहे. या वायूमध्ये 94 ते 98 टक्के मिथेन गॅस असतो आणि या मिथेन वायूचं डिझेलमधील मिश्रण जड वाहनांच्या इंजिनात थोडासा फेरबदल करून वापरता येण्यासारखा आहे. या सुधारित इंजिनात 15 ते 20 टक्के डिझेल तेल आणि 80 ते 85 टक्के मिथेन गॅस वापरता येऊ शकते, तसंच आवश्यकतेनुसार फिरवून केवळ डिझेलवर ते काम करू शकेल, अशी संरचना असेल.
1972 च्या तेल संकटानंतर आपल्या देशातील पेट्रोलियम खातं खडबडून जागं झालं आणि तेलाच्या बचतीसाठी एक ‘अॅक्शन ग्रुप’ स्थापन करण्यात आला. या तज्ज्ञांच्या गटात तेल कंपन्यांतील अधिकारी, ‘नॅशनल प्रॉडक्टिव्हिीटी कौन्सिल’ आणि पेट्रोलियम खात्यातील तज्ज्ञ समाविष्ट होते. त्यांच्या सुचनेनुसार पुढे 1979मध्ये ‘पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोशियन’ या संस्थेची खास ऊर्जा बचतीसाठी स्थापना करण्यात आली. ही संस्था पेट्रोलियम तेल वाचवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात आणि स्वयंचलित वाहने चालवणा-या नागरिकांना मार्गदर्शन करत असते. आतापर्यंत देशातील हजारोंच्या वर कारखान्यात उष्णता मिळवण्यासाठी जाळण्यात येणा-या फ्यूएल ऑइलचा खप कमी करण्यासाठी त्यांनी उपयुक्त सूचना केल्या आहेत. ‘दी वॉटर अँड पॉवर सव्र्हिसेस इंडिया लिमिटेड’ ही कंपनी वीज आणि पाणी बचतीसाठी मार्गदर्शन करण्यास तयार असते. ‘नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी कौन्सिल’ ही औद्योगिक क्षेत्रातील इंधन बचतीसाठी कार्यरत आहे. आतापर्यंत शेकडो कारखान्यांचा त्यांनी ऊर्जा बतचीच्या दृष्टीने तपास केलेला आहे. त्यांच्या सर्वेक्षणात असं आढळून आलं होतं की, वाहतूक, उद्योग आणि शेती व्यवसायात 20 ते 30 टक्के ऊर्जा सहज वाचवता येते आणि त्यामुळे सरकारचे दरवर्षी 3300 कोटी रुपये वाचू शकतात. ‘टाटा इलेक्ट्रिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट’ ही संस्थादेखील आपल्या उपयुक्त संशोधनाद्वारे ऊर्जा बचतीच्या कामी हातभार लावत आहे. शिवाय राष्ट्रीय स्तरांवर कार्यरत असलेल्या ‘को-ऑर्डिनेटर रिसर्च प्रोजेक्ट सेंटर ऑन एनर्जी रिक्वायमेंट्स’द्वारा शेतीक्षेत्रात वापरल्या जाणा-या विविध प्रकारच्या ऊर्जेविषयीचा कसून अभ्यास होत असून विविध राज्ये त्याचा लाभ उठवत आहेत.
या सर्व संस्थांना आणि त्यांच्या ऊर्जा बचतीविषयक प्रकल्पांना ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्स’ ही देशातील मानक संस्था प्रेरणा देत असते. ऊर्जा बचतीसाठी आवश्यक ती प्रमाणे म्हणजे ‘स्टँडर्स’ निर्माण करून त्यांचा योग्यरीतीने वापर व्हावा म्हणून ‘बीआयएस’ प्रमुख भूमिका बजावित आहे. आतापर्यंतच्या त्यांच्या विविध 14,000 भारतीय प्रमाणांपैकी 200 प्रमाणे ही ऊर्जा बचतीविषयीची आहेत. हा आकडा जरी छोटा वाटत असला तरी देशात ऊर्जा बचतीसाठी त्यांचा परिणामकारक आणि प्रभावी हातभार लागत आहे. ‘को-ऑर्डिनेशन फॉर एनर्जी कन्झर्वेशन’ हा वेगळा कक्ष स्थापन करून ‘बीआयएस’ ही संस्था देशभर 300 ऊर्जा बचतीसाठी कार्यरत असलेल्या समितीतील तज्ज्ञांच्या कार्याचा आढावा घेते. हा कक्ष ‘पी.सी.आर.ए.’, ‘एन.पी.सी.’, ‘टी.ई.आर.आय.’ या उपरोल्लेखित संस्थांचं आणि तेल कंपन्यांचं सहकार्य घेऊन राष्ट्रीय स्तरावर वापरली जाऊ शकतील, अशी प्रमाणे निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतो.
‘पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन’ ही संस्था औद्योगिक कंपन्यांसोबतच, सामान्य जनतेलादेखील पेट्रोलियम इंधनांचा कमीत कमी वापर करण्यासाठी मार्गदर्शन करत असते. साधं स्वयंपाकघरातील एल.पी.जी. गॅसचं उदाहरण घ्या. स्वयंपाक करताना, एकदा का भांडय़ातील पाणी उकळू लागलं की आपण जर गॅसचा बाहेर पडणारा प्रवाह कमी करून ज्वाला मंद केली तर 40 टक्के गॅसची बचत होते. वाहनांच्या बाबतीतदेखील हेच घडतं. ताशी 80 किमी वेगाऐवजी आपले वाहन 40 किमी गतीने नेलं तर आपल्याला 40 टक्के जास्त मायलेज मिळू शकतं. आपल्या खासगी गाड्यांचा वारंवार आणि अनावश्यक वापर न करणं, एकाच दिशेने जाणा-या अनेकांनी एकाच वाहनाने प्रवास करणं, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कौशल्याने गाडी हाकणं आणि व्यवस्थित पार्क करणं या गोष्टी इंधन वाचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात. वेळोवेळी गाडीचे गिअर्स बदलण्याने 20 टक्के इंधन जास्त संपतं. तसंच वाहनांच्या रबरी चाकात योग्य दाबाची हवा असणं, ब्रेकचा वारंवार वापर न करणं, इंधनतेलासोबत वंगणांचं योग्य प्रमाणात मिश्रण वापरणं, सहजगत्या ऑक्सिलेटर कमी-जास्त न करणं इत्यादी सवयी इंधन वाचवण्याच्या दृष्टीने उपयुक्त करतात. दुचाकी वाहनाचे गिअर्स बदलताना साधरणपणे पहिल्या गिअरमधून दुसरा गिअर ताशी 11 किमी वेग असताना, तिसरा गिअर ताशी 17 किमी आणि चौथा ताशी 25 किमी वेग असताना बदलणं योग्य असतं तर मोटारगाडीचा पहिला गिअर 20 किमी वेग असताना, दुसरा 35 किमी वेग असताना तसंच तिसरा 60 किमी वेग असताना बदलले पाहिजेत. सिग्नलजवळ वा रेल्वेफाटकाजवळ गाडी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणार असेल तर इंजिन बंद करायला हवं. तसंच इंधनाची टाकी, काब्र्युरेटर, फ्यूएल लाइन्स दररोज तपासून इंधनतेल कुठून गळत तर नाही ना, याची पाहणी केली पाहिजे.
स्वयंपाकघरात इंधन वाचवण्याच्या अनेक युक्त्या आहेत. मोठय़ा व कमी खोल असलेल्या टाकीच्या स्टोव्हचा वापर केला तर रॉकेलचा खूप कमी होतो. अन्न शिजवताना कमीत कमी पाणी वापरणं, भात-डाळीसारखे पदार्थ पाण्यात भिजवून मग शिजवायला घेणं, पाणी उकळायला लागले की ज्वाला मंद करणं, फ्रीजमधील थंडगार पदार्थ प्रथम हवेत काही वेळ उघडे ठेवून, मग शिजवायला घेणं, अन्न शिजत असलेल्या भांडय़ावर झाकण ठेवणं, प्रेशरकूकरचा वापर करणं सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी सगळय़ा आवश्यक वस्तूंची तयारी ठेवणं, या दक्षतांमुळे खूप बरंच वाचवता येतं. या दृष्टीने ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पेट्रोलियम’ ही संस्था प्रयत्नशील असून स्टोव्हमध्ये तांत्रिक बदल घडवून केरोसिनऐवाी स्वस्त वपस्पती तेलांचा इंधन म्हणून वापर करणं, नवे बर्नर तयार करणं, वातीचा स्टोव्ह वापरण्यास प्रोत्साहन देणं या व अशा प्रकारच्या घरगुती तंत्रज्ञानाची उपाययोजना करत आहे.
आपण आपल्या दैनिक जीवनातदेखील छोटय़ा-मोठय़ा दक्षतेने मोठय़ा प्रमाणात ऊर्जा वाचवू शकतो. घराच्या व कामाच्या ठिकाणी बल्बऐवजी फ्लुरोसन्ट टय़ुबलाइट वापरून, घरातील वीज उपकरणासाठी पुरेशी जाड तार वापरून, फ्रीज वारंवार न उघडून, एकाच दिव्याचा अनेकांनी वापर करून, घरात-कामांच्या ठिकाणी व गाडीत पंखे आणि दिवे नको असताना बंद ठेऊन आपण वीज वाचवू शकतो. तसंच टोस्टर, इस्त्री, वॉटर हिटर या विजेवर चालणा-या उपकरणांना ‘थर्मोस्टॅटिक कट ऑफ’ यंत्रणा जुळवली तर पदार्थ जळण्याचे प्रकार टळतात नि विजदेखील वाचते. थोडक्यात काय, तर कण-कण ऊर्जा वाचवून साठवणं, हे आपणा प्रत्येकाचं कर्तव्य ठरतं.
खरं म्हणजे कोळशाचा खूप मोठा साठा पृथ्वीच्या पोटात आहे व आजच्या तेलयुगात माणसाला त्याचा विसर पडलेला दिसतो. या खजिन कोळशावर प्रक्रिया करून त्यापासून पेट्रोलजन्य तेले तयार करण्यासारखी आहेत. तसंच अणुशक्ती, वीज, वायू, जल आणि सौरऊर्जा यांचा वाढता वापर करून पेट्रालियम तेलांचा वापर कमी करण्यावर सर्वत्र भर दिला गेला पाहिजे.
पेट्रोलियम कंपन्यांच्या ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ विभागाकडून याबाबतीत फार मोठ्या अपेक्षा केल्या जात आहेत; पण पेट्रोल, केरोसिन, डिझेल, वंगणतेलं वाचवण्यासाठी कराव्या लागणा-या संशोधन प्रकल्पांकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. औद्योगिक क्षेत्रात वापरून झालेलं वंगणतेल संघटितरीत्या गोळा करून त्याचं रि-फाईनिंग म्हणजे पुनर्शुद्धीकरण करण्याकडे आपल्याला फारसा उत्साह दिसत नाही. खतं तयार करण्यासाठी नॅफ्था या तेलाऐवजी अल्कोहोल आणि खनिज कोळसा वापरता येऊ शकतो. घरगुती कामासाठी एलपीजीऐवजी बायोगॅस व कोळसा चालू शकतो; पण टाकाऊ प्राणीज आणि वनस्पतीज घटकांपासून बायोगॅस व इंधनतेलं तयार करण्याच्या संशोधनात आपल्याकडे फारशी प्रगती नाही. अशा प्रकारे, ’रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ विभागांवरील कमकुवत विश्वासामुळे खनिजजन्य पदार्थ विपुल प्रमाणात वापरले जातील व त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरील विपरीत परिणाम वाढतच जाईल. तेव्हा, ‘इंधन वाचवा’ ही काळाची हाक समजून प्रत्येकाने आपापल्या परीने या हाकेला प्रतिसाद द्यायला हवा.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा