PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: इजाग्रस्त त्वचेला नवसंजीवनी इजाग्रस्त त्वचेला नवसंजीवनी ================================================================================ अनुराग कांबळे on 23 March, 2010 08:35:00 AM शरीरावर झालेल्या जखमांचे व्रण तसेच भाजलेल्या भागावरची त्वचेच्या खुणा ब-याच काळापर्यंत टिकून असतात. मोठ्या अपघातात इजाग्रस्त झालेल्या किंवा मोठ्या प्रमाणावर भाजलेल्या व्यक्तीच्या जखमा भरून आल्यानंतर त्यावर येणारी त्वचाही मूळ त्वचेपेक्षा फार निराळी असते. पण यावर शास्त्रज्ञांनी नुकताच एक उपाय शोधून काढला आहे, ज्यामुळे अपघातग्रस्त किंवा भाजलेल्या व्यक्तींना थोड्या प्रमाणावर दिलासा मिळेल. हॅन्स क्लेवर्स आणि डच व स्वीडिश चमूने केलेल्या एका प्रयोगाअंती आलेल्या निष्कर्षावरून असं आढळलं आहे की, शरीराच्या मूळ त्वचेइतकीच अस्सल व मजबूत त्वचा स्टेम पेशींच्या आधारे निर्माण करता येऊ शकते. स्टेम पेशी म्हणजे शरीरातील अशा पेशी ज्यांच्यात शरीरातील इतर पेशींची निर्मिती करण्याची क्षमता असते.त्वचेचे आवरण तयार करणा-या पेशींची मुख्यत्वेकरून तीन पेशींमध्ये विभागणी करता येऊ शकते. १. हेअर फॉलिकल २. शिबेशियस ग्रंथी ३. वरील दोन पेशींच्या मध्ये स्थित असलेल्या इंटर फॉलिक्युलर शास्त्रज्ञांना आजवर असं वाटत होतं की, एपिडर्मीस त्वचेचं आवरण तयार करणा-या या तीन पेशी समुहांची निर्मिती त्या-त्या पेशींच्या स्टेम पेशींमार्फत होत असावी; परंतु क्लेवर्स आणि त्यांच्या सहका-यांनी केलेल्या निरीक्षणाआधारे या तीनही पेशींची निर्मिती एका स्टेम पेशींमधून होते. या पेशीसमुहाला त्यांना ‘मदर सेल’ किंवा ‘जननी पेशी’ असं संबोधलं आहे. एका जखमी उंदरावर करण्यात येणा-या प्रयोगात शास्त्रज्ञांना आढळलं की, जखमांभोवती असणा-या काही पेशींमुळेच त्वचेची निकोप व झपाट्याने वाढ होत आहे. शोधाअंती असं दिसून आलं की, त्वचेभोवतालच्या एलजीआर६ पेशींमुळे त्वचेची वाढ ही झपाट्याने होते व नवीन त्वचा ही मूळ त्वचेसारखीच निर्माण होते. या एलजीआर६ पेशीसमुह असलेल्या स्टेमपेशी हेअर फॉलिकलमध्ये स्थित असतात व यातील एका विशिष्ट जनुकांमुळे त्वचेची वाढ जलद व ब-याचशा प्रमाणात नैसर्गिक होते. आतापर्यंत भाजलेल्या अथवा मोठ्या प्रमाणावर त्वचेचं नुकसान झालेल्या व्यक्तींच्या त्वचारोपणासाठी त्या व्यक्तींच्यात त्वचापेशींपासून प्रयोगशाळेत त्वचेची निर्मिती केली जात असे. त्यामुळे जखमी भाग नैसर्गिकरीत्या तयार होणा-या त्यासारख्याच दिसणा-या, परंतु प्रयोगशाळेत बनवल्या गेलेल्या त्वचेने झाकला जाई, पण या त्वचेत अनेक दोषही असतात. प्रयोगशाळेत तयार केलेली त्वचा ही फारच कमकुवत असते. तसेच त्याला शिबेशियस ग्रंथींचे पोषण न मिळाल्याने ब-याच अंशी ती कोरडीही राहते. तसंच प्रयोगशाळेत तयार केलेल्या त्वचेवर केस उगवत नसल्याने ही त्वचा एकंदर शरीरावरील मूळ त्वचेपेक्षा मोठ्या प्रमाणावर वेगळी दिसते. पण या नव्या शोधामुळे जननी स्टेम पेशी अशा त्वचेची निर्मिती करेल की, ज्यामुळे नवनिर्मित त्वचा ही उर्वरित शरीरासारखीच दिसेल व ज्याचे पोषण शिबेशियस ग्रंथींकडून होईल. या जननी पेशींमुळे अपघातांमध्ये वा भाजल्याने झालेली त्वचेची हानी भरून काढण्याची एक नवी त्वचारोपण पद्धत अंमलात येईल. अशा अत्यंत नव्या व पूर्णत: नैसर्गिक त्वचारोपण पद्धती आपल्यापर्यंत पोहोचायला मात्र थोडा कालावधी लागेल. कारण मानवी त्वचेतून एलजीआर६ या पेशी विलग करून त्याचे संवर्धन (कल्चर) कसं करायचं, याचा सध्या शोध सुरू आहेत. पण त्वचारोपणाच्या प्रचलित पद्धती पाहता ही पद्धत फारच सोपी व वैद्यकीयदृष्ट्या आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून निर्धोक असेल, हे नि:संशय!