PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: मधुमेहींना दिलासा लिराग्लुटाइड मधुमेहींना दिलासा लिराग्लुटाइड ================================================================================ डॉ. सतीश नाईक on 23 March, 2010 08:45:00 AM भारत आणि चीनमध्ये मधुमेह झालेल्यांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. ही वाढ इतकी जलद आहे की, येत्या काही वर्षामध्ये या दोन देशांमध्ये जगातल्या एकूण मधुमेहींपैकी निम्मे असतील. अशा परिस्थितीत मधुमेहावर जेवढी जास्त औषधं उपलब्ध होतील तेवढं उत्तमच. या दिशेनं मोठ्या जोमात प्रगतीही सुरू आहे आणि मधुमेहाच्या वेगवेगळ्या समस्यांवर तोडगा म्हणता येईल, अशी अनेक औषधं येत्या काळात बाजारात येण्याची तयारी करत आहेत. त्यातलंच एक म्हणजे लिराग्लुटाइड. हे औषध ‘इन्क्रेटीन मिमेटीक’ या गटातलं आहे. अर्थात, औषधाचं नेमकं काम कसं होतं, हे समजून घेण्यासाठी इन्क्रेटीन म्हणजे काय ते पाहावं लागेल. एका प्रयोगात असं दिसून आलं की, जेव्हा आपण तोंडाने ग्लुकोज घेतो तेव्हा आणि नसेतून ग्लुकोज चढवतो तेव्हा शरीरात जितकं इन्शुलिन येतं त्यात तफावत आहे. म्हणजे तोंडाने जर ग्लुकोज घेतलं तर शरीर खूपच अधिक इन्शुलिन बनवतं. असं का, याचा शोध घेतल्यावर कळलं की, ग्लुकोज जेव्हा आपल्या आतड्यांमध्ये पोहोचतं तेव्हा तिथल्या पेशी काही हार्मोन्स बनवतात. हे हार्मोन्स मग इन्शुलिन बनवणा-या स्वादुपिंडातल्या बिटा पेशींना इन्शुलिन बनवायला उद्युक्त करतात. शिरेवाटे दिलेलं ग्लुकोज आतड्यांपर्यंत पोहोचत नसल्यानं हे हार्मोन्स तयार होत नाहीत. साहजिकच कमी इन्शुलिन तयार होतं. यालाच म्हणतात इन्क्रेटीन इफेक्ट. संशोधकांनी मग या हार्मोन्सकडे मोर्चा वळवला. ते शोधून काढले. त्यात जी.आय.पी. आणि जी.एल.पी.१ हे दोन प्रामुख्यानं आढळले. यापैकी मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जी.आय.पी.ची यंत्रणाच कोलमडत असल्यानं त्या हॉर्मोनचा औषध म्हणून उपयोग नव्हता. राहता राहिला जी.एल.पी.१ इथेही एक प्रश्न होता. शरीरात बनवणारा जी.एल.पी. केवळ दोन मिनिटं टिकतो. तो तयार झाल्यावर काही मिनिटांतच डी.पी.पी.४ नावाचं रसायन जी.एल.पी.१ वर हल्ला करतं आणि त्याला कुचकामी करून टाकतं. त्यामुळे प्रत्यक्षात जी.एल.पी.१ शरीराला पुरवून काहीच साध्य झालं नसतं. त्यातून जी.एल.पी.१ सारखंच काम करू शकतील; परंतु डी.पी.पी.४चा हल्ला सहन करू शकतील, अशा औषधांचा शोध घेणं सुरू झालं. या संशोधनातून जी औषधं बाहेर आली त्यांना ‘इन्क्रेटीन मिमेटीक’ म्हटलं जाऊ लागलं. म्हणजे इन्क्रेटीन सारखाच परिणाम करणारी औषधं! या गटातलं पहिलं औषध होतं, एक्झेनाटाइड. आता दुसरं येतंय ते लिराग्लुटाइड. हे दुसरं औषध बनवलंय ‘नोव्हा नॉरडिक्स’ या कंपनीने. या कंपनीने हे औषध बनवण्याचं खास कारण म्हणजे एक्झेनाटाइड या औषधाची मात्रा केवळ पाच-सहा तासच लागू पडायची. त्यामुळे ते औषध दिवसातून दोनदा द्यायला लागायचं. या गटातली औषधं फक्त इंजेक्शनद्वारा देता येत असल्याने रुग्णाला दोन वेळा टोचणं भाग पडायचं. शिवाय त्यात सुरुवातीला पेशंटला खूप मळमळायचं, वांत्या व्हायच्या. लिराग्लुटाईड दिवसातून फक्त एकदाच द्यावं लागतं. शिवाय मळमळ, वांत्या यांचं प्रमाणही खूपच कमी आहे. या गटाच्या औषधांनी रुग्णाला जे फायदे व्हायचे ते मात्र तसेच राहिलेत. यात रक्तातली साखर झटपट खाली आणण्याची क्षमता आहे; कारण दिल्या दिवसापासूनच यांचा प्रभाव सुरू होतो. साखर बरीच खाली येते आणि बोनस म्हणजे रुग्णाचं वजन कमी होतं. मधुमेहींपैकी बरीच मंडळी ‘हेवी वेट’ गटात मोडत असल्यानं याचा फार मोठा फायदा त्यांना मिळतो. मधुमेहाच्या इतर औषधांनी वजन वाढतं. (नाही म्हणायला मेटफॉर्मिनने वजन थोडंसं घटतं; पण हा इफेक्ट लिराग्लुटाइड एवढा नाही.) वर मळमळ, वांत्या सोडल्या तर इतर कुठलाही दुष्पपरिणाम या गटाची औषधं करीत नाहीत. निदान आतापर्यंतच्या पाहण्यातून तरी तसंच दिसून आलंय. त्यामुळे मधुमेहींना, विशेषत: ‘वजनदार’ मधुमेहींना येत्या दोनेक महिन्यांत मोठा दिलासा मिळायला हरकत नाही. लिराग्लुटाइड बाजारात आल्यानंतर त्यांचा बराच त्रास वाचणार आहे.