पहिले पान | मध्यंतर | साय-फाय | मिथेनच्या ‘ऊर्जे’चा शोध

मिथेनच्या ‘ऊर्जे’चा शोध

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

पारंपरिक ऊर्जास्रोतांचा पर्याय शोधण्याचा आटोकाट प्रयत्न सध्या चालू आहे. पृथ्वीवर मोठय़ा प्रमाणावर असलेला मिथेन पुढील काही शतकांची उर्जेची गरज सहजपणे भागवू शकतो, पण मिथेनचा शोध घेऊन त्याचा वापर करणं हे काम सोपं नाही. हे खरं असलं तरी मिथेन शोधून काढण्यासाठी अनेक पद्धतींचा विचार होतोय. कोणी सांगावं, पुढची पिढी पेट्रोलऐवजी मिथेन आपल्या गाडीत भरत असेल!

नैसर्गिक तेल व वायुसाठा सदासर्वकाळ टिकणारा नाही, याची जाणीव सर्वाना आहेच, त्यामुळे नवीन साठे शोधून काढण्याचे प्रयत्न व नवीन ऊर्जास्रोतांचा वापर करून नवी ऊर्जाप्रणाली स्थापित करण्याची जागतिक स्पर्धा सुरू आहे. आज अस्तित्वात असणारे नैसर्गिक तेल व वायूचे साठे काही दशकांनंतर संपणार आहेत, याबद्दल कोणालाच शंका नाही. शास्त्रज्ञांनी या पारंपरिक ऊर्जास्रोतांचा पर्याय शोधण्याचा आटोकाट प्रयत्न चालू केलेला आहे व त्यात त्यांना लक्षणीय यशही मिळालेलं आहे. ढोबळ अंदाजानुसार मिथेनचे 20,000 ट्रिलियन क्युबिक मीटरचे साठे जगभर विखुरलेले आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील मिथेन पुढील काही शतकांची उर्जेची गरज सहज भागवू शकते. आजच्या तेल कंपन्या कालांतराने मिथेन कंपनीत बदलून जातील.

 

मिथेनची पैदावार सामान्यत: समुद्रातील जमिनीच्या उतारावर होते. नैसर्गिक तेल व वायू ज्याप्रमाणे सजीवांपासून निर्माण होतो, त्याप्रमाणेच मिथेनदेखील उद्गम पावतो. समुद्रातील जमिनीच्या उतारावर गाळ साचलेला असतो. या गाळात अनेक प्रकारचे सुक्ष्मजीव आपले बस्तान बसवून असतात. येथील बॅक्टेरिया सेंद्रीय तत्त्वांचं भक्षण करत असतात व या प्रक्रियेद्वारे आपल्या सभोवतालच्या परिसरात मिथेन व इतर वायू सोडत असतात. ही क्रिया सहाशे ते पंधराशे मीटर पाण्याखाली होत असते. अशा ठिकाणी फार मोठय़ा प्रमाणात दाब व फार कमी प्रमाणात तापमान असतं, त्यामुळे बॅक्टेरियातून बाहेर पडणारा मिथेन वायू मिथेन हायड्रेटमध्ये परिवर्तित होतो. हजारो वर्षे ही क्रिया सुरू राहिल्यास जमिनीच्या उतारावरील गाळात त्यांचा संचय होऊन मोठे साठे तयार होतात. प्रत्येक एक क्युबिक मीटरच्या हायड्रेटमधून एकशे साठ क्युबिक मीटरपेक्षाही जास्त मिथेन मिळू शकतो.

 एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर मिथेन मिळण्याची शक्यता असल्याकारणाने अनेक मोठय़ा तेल कंपन्यांचं लक्ष या वायूचे साठे शोधण्याकडे गेलं आहे, पण मिथेनचा शोध घेणं हे काही सोपं काम नाही. त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. पण या साठय़ांचा शोध जरी लागला तरी त्यांचं उत्खनन व वहन करणं मोठय़ा जिकिरीचं काम असतं.समुद्रतळाच्या विशाल क्षेत्राचं सर्वेक्षण करण्यासाठी भरपूर पद्धती आहेत, पण त्यामध्ये सर्वाधिक परिणामकारक कंपन पद्धत आहे. या पद्धतीमध्ये समुद्राच्या पाण्यात व समुद्रतळाखाली ध्वनितरंग सोडले जातात. ते वेगवगेळय़ा थरातून किती वेगाने पुनश्च मागे येतात, याचं निरीक्षण करून मिथेन साठे आहेत किंवा नाहीत, हे ठरवलं जातं. वायू, तेल व मिथेनचे साठे ध्वनितरंगांना अगदी तत्परतेने परावर्तित करत असतात. या वेगाच्या आधारावरून जटील गणिती समीकरणांच्या सहाय्याने मिथेनचे परिणाम शोधले जातात. त्यासाठी प्रयोगशाळेत वेगवेगळय़ा माध्यमातून व या माध्यमात विखुरलेल्या मिथेन हायड्रेटमधून ध्वनितरंग कसे परावर्तित होतात याचे प्रयोग केले जातात. ही माहिती संकलित करून प्रत्यक्ष सर्वेक्षण केल्यानंतर जी परिस्थिती समोर उभी ठाकते, तिचं आकलन करून योग्य निष्कर्ष काढण्यासाठी उपयोगात आणली जाते.

पण मिथेन हायड्रेटचा साठा सापडला की, आपलं काम संपलं, असं नसतं. त्या हायड्रेटला जमिनीवर आणणंही तितकंच महत्त्वाचं असतं, पण आपण खाली गेलो आणि हायड्रेटला वर घेऊन आलो, असं म्हणण्याइतकंही क्रिया सोपी नाही. कारण सामान्य तापमान व दाबाखाली हा हायड्रेट नाश पावतो. त्याचे बुडबुडे आपल्या डोळ्यांदेखत हवेत विरून जातात. हे टाळण्यासाठी जागतिक स्तरावर अनेक प्रयोग केले जात आहेत.

नैसर्गिक वायू व तेल ज्या पद्धतीने समुद्रतळाखालून मिळवले जाते, त्याप्रमाणे मिथेन मिळवता येत नाही. विहीर खणली व तेल मिळालं, असं मिथेनबाबत होत नाही. कारण तो विखुरलेल्या स्वरूपात असतो. अटलांटिक महासागरात अनेक समुद्रपर्वतांच्या पायथ्याशी अंदाजे एक ट्रिलियन टन इतकं मिथेन हायड्रेट आहे, पण इथल्या गाळाच्या तो पाच टक्के इतकाच आहे. याचाच अर्थ, असा की शंभर टन गाळातून फक्त पाच टन हायड्रेट मिळेल, म्हणूनच अशा साठय़ांचा उपसा करणं जितकं कष्टदायक, तितकंच ते खर्चिकसुद्धा असतं. म्हणून आर्थिकदृष्टय़ा झेपतील व सोसतील अशा नवनवीन युक्त्या शोधण्याचं काम जोरात सुरू  आहे.

एक युक्ती जी अंमलात आणली जाऊ शकते, ती आहे डिप्रेशरायझेशन. या पद्धतीत हायड्रेट साठय़ाच्या खाली खणून पोकळी निर्माण करून त्या हायड्रेटवरचा दाब कमी करण्यात येतो. कमी दाब निर्माण झाल्यामुळे वरील हायड्रेट वायुरूपात त्या पोकळीत जमा होतील, पण पारंपरिकरीत्या ज्या वेगाने तेल उपसलं जातं त्यामानाने हायड्रेटचं वायूत रूपांतरण व संचय फारच धीम्या गतीने होतं.

 

मिथेनचा उपसा करण्यासाठी आणखीही एक युक्ती अंमलात आणली जाऊ शकते. ती आहे फाइव्ह स्पॉटपद्धत. या पद्धतीत चार टोकांना चार व त्यांच्याबरोबर मधोमध पाचवी विहीर खोदली जाते. मग त्या चार टोकांच्या विहिरींमधून उकळतं पाणी सोडलं जातं. या उकळत्या पाण्यामुळे मिथेन हायड्रेटचं विघटन होतं व तो मधल्या विहिरीतून बाहेर पडतो.

 

या सर्व सोपस्कारानंतर एक महत्त्वाचा मुद्दा उरतो व तो म्हणजे मिथेन ग्राहकांपर्यंत कसा पोहोचवणार? पेट्रोलचा पुरवठा जसा पाइप व इतर दळणवळणाच्या साधनांतून होतो तसा मिथेनचा करणं तांत्रिकदृष्टय़ा थोडंसं कठीण आहे. सामान्य दाब व तापमानात घनसदृश हायड्रेट वायूत बदलतो व विरळ होतो म्हणून एका विशिष्ट खोलीत (डेप्थ) मिथेन वायू व पाण्याचा संयोग घडवून, त्याचं हायड्रेटमध्ये रूपांतरण करून, हायड्रेटच्या छोटय़ा-छोटय़ा गोळ्या बनवून त्यांचं योग्यरीत्या जतन करण्याचा एक उपाय योजला जात आहे. या गोळ्यांची मग पाणबुडीसदृश बोटींतून ने-आण करणं सहज शक्य होईल.

 मिथेनचं जतन व ग्राहकांना पुरवठा करण्याचं दुसरंही एक तंत्र विकसित केलं जात आहे. मिथेन लिक्विफॅक्शन असं त्याचं नाव असून त्यात मिथेन गॅसचं रूपांतरण पेट्रोलसारख्या जलीय पदार्थात केलं जातं.  हे जल सामान्य तापमानात स्थिर राहू शकतं. त्याच्यात कोणत्याही रासायनिक प्रक्रिया घडत नाहीत. त्यामुळे त्याची व्यवस्थित ने-आण केली जाऊ शकते. कोणी सांगावं, पुढची पिढी पेट्रोलऐवजी मिथेन आपल्या गाडीत भरत असेल.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0