सर्जनशिवाय ऑपरेशन
यंत्रमानव भविष्यात डॉक्टरांचीच जागा घेणार आहेत. ते एकहाती मानवी देहाची चिरफाड करून त्याच्या शरीरातलं दुखणं अलगद निपटून काढतील, असे प्रयोग सुरू आहेत.
सुसज्ज अशा मोठय़ा इस्पितळात महत्त्वाची शस्त्रक्रिया सुरू आहे, पण ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरच हजर नाही. ही कल्पना कशी वाटते? अशक्य ना! पण, लवकरच ती सत्यात उतरणार आहे. अलिकडे काही विशिष्ट रचनेच्या यंत्रमानवाचा आधार घेऊन डॉक्टर मंडळी शस्त्रक्रिया करताना दिसतात. प्रमुख इस्पितळात हा प्रकार सर्रास आढळू लागलाय, पण हे यंत्रमानव भविष्यात डॉक्टरांचीच जागा घेणार आहेत. ते एकहाती मानवी देहाची चिरफाड करून त्याच्या शरीरातलं दुखणं अलगद निपटून काढतील.
ड्युक युनिव्हर्सिटीच्या जैव-अभियंत्यांनी शोधून काढल्याप्रमाणे, यंत्रमानव हे डॉक्टर्सच्या सहकार्याशिवाय मानवी शरीरातील दुखापतीच्या जागा हुडकून काढू शकतात व तिथला नमुना काढून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. हे तंत्रज्ञान पुढे प्रगत होत गेलं तर सर्जनविना शस्त्रक्रिया होण्याचे दिवस दूर नाहीत. या वर्षीच्या प्रारंभी, या युनिव्हर्सिटीतील कैचांग लियांग या अभियंत्याने तयार केलेल्या रोबो (यंत्रमानव)ने स्तनातील गाठ एकटय़ाने काढून दाखवली होती. त्यानंतर मूत्राशयाजवळ असलेल्या प्रोस्टेट ग्रंथीवर एक छोटी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. हे यंत्रमानव कृत्रिम बुीद्धमत्ता कार्यक्रम (आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्रॅम) या प्रणालीद्वारे नियंत्रित केले जातात. त्याचे हात यंत्राचे असतात. विशेष म्हणजे, हे यंत्रमानव तयार करण्यासाठी लागणारे हार्डवेअर्स बाजारात उपलब्ध आहेत आणि अल्ट्रासाऊंड तंत्राचा वापर करून यंत्रमानवांना अधिकाधिक मानवी शरीरावरील शस्त्रक्रिया करण्यास प्रवृत्त केलं जाणार आहे. त्यासाठी डय़ुक युनिव्हर्सिटीतल्या तंत्रज्ञांनी त्रिमितीपूर्ण अल्ट्रासाऊंड स्कॅनर तयार केला असून ते या यांत्रिक शल्यविशारदांना साहाय्यभूत ठरणार आहे. त्रिमितीपूर्ण अल्ट्रासाऊंड सिस्टीम वापरून यंत्रमानवाकरवी शस्त्रक्रिया घडवून आणण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.वास्तविक, हृदयासंबंधी शस्त्रक्रिया करताना, सध्या सर्जनमंडळी फ्लुरोस्कोपी हे तंत्रज्ञान वापरतात व त्यातून रुग्णांच्या शरीरात घातक प्रारणं घुसत असतात. त्रिमितीपूर्ण अल्ट्रासाऊंडधारी प्रणाली निगडित अवयवांची स्पष्ट प्रतिमा घेऊन डॉक्टरांना सर्जरीसाठी मदत करतात. रोबोचं सहकार्य घेऊन सर्जनमंडळीनी आतापावेतो, मान, डोकं, यातील टय़ुमर हुडकून बाहेर काढले आहेत. 199 पासून वापरात असलेल्या या मानव-यंत्रमानव संयुक्त शस्त्रक्रियेचा पसारा वाढला आहे व हृदयरोग, मूत्रसंस्थेचे विकार, स्त्रीरोगांवर उपाय म्हणून या शस्त्रक्रियेचा वापर झाला आहे. या प्रकारच्या शस्त्रक्रियेत कमी रक्तस्रव, कमी वेदना, कमी वेळ आणि इस्पितळातले कमी वास्तव्य हे फायदे या संयुक्त प्रणालीमुळे होत असल्याने ती लोकप्रिय झाली आहे.नव्या पिढीचे अत्याधुनिक यंत्रमानव मानवतेची वैद्यकीय सेवा करण्यास पुढे सरसावले आहेत. रणांगणासारख्या दूरस्थ आणि धोक्यांच्या स्थळी तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकणार आहे, ही एक आशादायक बाब आहे. डय़ुक युनिवर्सिटीतील ‘अल्ट्रासाऊंड ट्रान्सडय़ुसर ग्रुप’चे डायरेक्टर स्टीफन स्मिथ यांच्या मते, तर यंत्र मानवाने एकटय़ाने शस्त्रक्रिया पार पाडण्याचे दिवस आता दूर नाहीत. त्यांच्या विभागाचे या क्षेत्रात खूप मोठं योगदान असून 1991 पासून त्यांचा चमू या कामी संशोधनात व्यग्र आहे. त्यांनी द्विमिती अल्ट्रासाऊंड प्रणालीतून निर्माण केलेली त्रिमिती अल्ट्रासाऊंड पद्धती शस्त्रक्रिया करताना होणारी सुयांची हालचाल अचूक पद्धतीने नियंत्रित करते, हे त्याचं खास वैशिष्टय़ आहे. विशेषत: शरीरात घुसलेल्या धातूच्या तुकडय़ांना हेरून काढून अलगद टिपण्याचं कार्य ते लीलया पार पाडतात.
एका बाजूने यंत्रमानवांचा विध्वंसक शस्त्र म्हणून वापर करून त्यांना नरसंहार करण्यास प्रवृत्त केलं जात आहे, तर दुस-या बाजला ते मानवी जीविताला वाचवण्याच्या कामी राबवले जात आहेत. मानवी जीवनातला हा एक ठळक विरोधाभास आहे. या प्रकाराची विध्वंसक अस्त्रं युरोप, अमेरिका, कॅनडा, दक्षिण कोरिया, द. आफ्रिका, सिंगापूर आणि इस्रयल या देशात तयार आहेत. किंबहुना, ती रशिया, चीन, भारत या देशांतही आता तयार होऊ लागली आहेत. भारतात मानवरहित बाँबफेकी विमाने वापरात आहेत, परंतु अशा प्रकारच्या यंत्रमानवी अस्रत खूप मोठा धोका दडलेला आहे, असं मत अमेरिकेतील रॉयल युनायटेड सव्र्हिसेसचे संशोधक प्रा. नोएल शार्की यासारख्या तज्ज्ञांचं मत आहे.
माणसाचा सहाध्यायी नि सोबती म्हणून यंत्रमानव केव्हापासूनच कार्यरत आहे. आता, हर्टफोर्डशायर युनिव्हर्सिटीच्या कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्रा. कस्र्टीन डॉऊन्टेहन यांच्या चमूने केलेल्या अभ्यासानुसार, अंतर्मुख स्वभावाच्या माणसांना (introvert) खोक्यासारखी दिसणारी, यंत्रवत भासणारी रोबोमंडळी आपले सोबती म्हणून पसंत असतात, तर बर्हिमुख स्वभावाच्या (extrovert) लोकांना मानवी आकाराच्या यंत्रमानवाच्या सान्निध्यात राहणं आवडतं. जगातल्या विविध देशांत निरनिराळ्या प्रकारचे नि आकाराविकाराचे यंत्रमानव निर्माण होत आहेत. बिल गेट्स सांगतात, त्याप्रमाणे इ.स. 2025पर्यंत प्रत्येक घरात कुठल्या ना कुठल्या निमित्ताने यंत्रमानवाचा वावर असेल.नव्या पिढीचे शल्यविशारद यंत्रमानव वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणतील खरं, पण रुग्णांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचणं शक्य होईल का, हा प्रश्न आज तरी अनुत्तरीतच आहे.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा