पहिले पान | मध्यंतर | साय-फाय | हरितगृह वायू मोजमापाची ई-क्लृप्ती

हरितगृह वायू मोजमापाची ई-क्लृप्ती

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

ग्लोबल वॉर्मिगचा मुद्दा उपस्थित झाल्यापासून हवेत अदृश्यरूपात वावरणा-या हरितगृह वायूंची आर्थिक रूपात उलाढाल होऊ लागली. या व्यवहारात सुसूत्रता यावी म्हणून अमेरिकेतील संशोधकांनी आता हरितवायू उत्सर्जन मोजणा-या एका हिशेबनीसाची निर्मिती केली आहे. हा ई-कॅल्क्युलेटर पर्यावरणाशी निगडित आर्थिक हिशेबाची सांगड घालण्यास उपयुक्त ठरणार आहे.

ग्लोबल वॉर्मिगचा मुद्दा उपस्थित झाला आणि हवेत अदृश्यरूपात वावरणा-या हरितगृह वायूंची आर्थिक रूपात उलाढाल होऊ लागली. नांगरणीरहित शेती, कुरणांची वाढ, वृक्षलागवड, गुरंढोरं पालन व्यवसायात मिथेन वायूची जप्ती करणारी यंत्रणा यासारख्या कृतीतून शिकागोतील मेट एक्सचेंजसारख्या शेअरबाजाराच्या धर्तीवर चालणा-या अर्थयंत्रणेद्वारे शेतक-यांना पैसा मिळू लागला. या व्यवहारात सुसूत्रता यावी म्हणून अमेरिकेतील केलॉग बायोलॉजिकल स्टेशनवरील संशोधकांनी हरितवायू उत्सर्जन मोजणाऱ्या एका हिशेबनीसाची निर्मिती केली आहे. हा ई-कॅल्क्युलेटर पर्यावरणाशी निगडित आर्थिक हिशेबाची सांगड घालण्यास उपयुक्त ठरणार आहे.

 

हे गणनयंत्र म्हणजे एक प्रकारची वेबसाइट असून तिच्या पहिल्या पानावर अमेरिकेबाहेरील देशाचं नाव, पिकाचा प्रकार, उत्पादन, नांगरणी प्रणाली, नायट्रोजनयुक्त खताचा वापर ही माहिती भरायची असते. अर्थात, या कॅल्क्युलेटरमध्ये प्रमाणबद्ध स्थानिक माहिती तुलनेसाठी आधीच उपलब्ध करून ठेवलेली असते. त्यामुळे ती हिशेबयंत्रणा भराभर मोजमाप करून, एखाद्या विशिष्ट भूप्रदेशातून किती प्रमाणात कार्बन साठलेला आहे किंवा हवेत मुक्त होतो आहे याबरोबर खताच्या वापरामुळे जमिनीतून मुक्त होणा-या नायट्रस ऑक्साइडचं प्रमाण (हा वायू कार्बनडायोक्साइडपेक्षा तीनशे पटीने खतरनाक असतो.), ट्रॅक्टरच्या वापरातून (इंधन ज्वलनातून) मुक्त होणारा कार्बन वायू तसंच तिथे वापरलेली खतं, उत्पादन करण्याच्या निर्मिती प्रक्रियेत जाळलेल्या इंधनाद्वारे उत्सर्जित झालेला कार्बनवायू याचं मोजमाप घेतो.

 

प्रारंभी अमेरिकेतल्या शेतीतज्ज्ञांनी या गणकयंत्रणेद्वारे मका, सोयाबिन आणि गहू यांच्या उत्पादनासाठी नांगरणी केलेली व नांगरणी न केलेली जमीन वापरून, हरितवायूची तुलनात्मक मोजणी केली. तेव्हा त्यांना आढळलं की, नांगरलेलं शेत वापरलं काय किंवा न नांगरलेलं वापरलं काय, उसाच्या पिकाची लागवड करताना खताचा भरमसाठ वापर होत असल्यामुळे, त्याच्यातून जास्तीत जास्त हरितगृह वायू मुक्त होतात. त्यामानाने गव्हाच्या लागवडीसाठी कमी खत लागतं आणि सोयाबिनसाठी तर खताची गरजच नसते. न नांगरलेल्या शेतांमुळे हरितगृह वायूंचं उत्सर्जन 50 टक्के कमी होतं, कारण त्यामुळे वातावरणात होणारी कार्बनमुक्ती टळते. उत्पादनकपात न करता, खताचा माफक वापर केला तर नायट्रस ऑक्साइड या हरितवायूचं उत्सर्जन 12 टक्क्यांनी कमी होतं. शेतकरी व शेतीतज्ज्ञांसाठी ही नवी मोजमाप यंत्रणा खूप फायदेशीर ठरू शकते. कारण विविध शेती भूप्रदेशांचा त्याद्वारे तुलनात्मक अभ्यास करता येऊ शकतो. त्यामुळे कार्बन ट्रेडिंगच्या व्यवहारातील विश्वासार्हता वाढू शकेल.

 

ग्लोबल वॉर्मिगसाठी कारणीभूत ठरणा-या हरितवायूंच्या एकूण प्रमाणापैकी 20 टक्के वायू हे उष्ण कटिबंधातील वृक्षतोडीमुळे निर्माण होत आहेत. जगभरात वापरली जाणारी वाहनं, रेल्वेगाडय़ा, विमानं यांच्याद्वारे उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषक वायूपेक्षा हे प्रमाण मोठं आहे. आपणही आपल्या दैनंदिन वापरातल्या साधनांद्वारे, बेबंद प्रवासाद्वारे तसंच खाण्याच्या हावरटपणामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हरितगृह वायू वातावरणात सोडत असतो. आपण खात असलेलं मांस नि अन्न, आपण वापरत असलेले साबण, शॅम्पू किंबहुना गाडय़ासाठी वापरत असलेली जैविक इंधनं ही या उष्णकटीबंधातील जंगलतोडीतून आपल्यापर्यंत पोहोचतात, हे आपल्या गावीही नसतं. त्यासाठी संशोधकांनी या वैयक्तिक स्वरूपाच्या हरितगृह वायूंची मोजमापं काढण्यासाठी कार्बन कॅल्क्युलेटर तयार केला आहे. वेबसाइटच्या रूपातला कॅल्क्युलेटर प्रत्येकाच्या कार्बन पाऊलखुणा (कार्बन फूटप्रिंट्स) मोजतो व ग्लोबल वॉर्मिगमध्ये लागणा-या हातभारापासून सावध करतो.

 जंगलतोडीमुळे होणारं हरितवायूंचं उत्सर्जन थांबवणं हा ग्लोबल वॉर्मिग रोखण्याचा महत्त्वपूर्ण उपाय आहे. औद्योगिक क्षेत्रांतून हवेचं सर्वाधिक प्रदूषण अमेरिका व चीन या देशांतून होतं. ब्राझिल व इंडोनेशियाचा अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक लागतो आणि त्याला कारण तिथली बेसुमार जंगलतोड आहे. याच कारणास्तव संशोधक आणि पर्यावरणप्रेमी तज्ज्ञांनी ब्राझिल, चीन, युक्वेडोर, ग्वाटेमाला, इंडोनेशिया, लिब्रेरिया, मादागास्कर, मोक्सिको, पेरू आणि फिलिपाइन्समधली घनदाट जंगलं वाचवण्यासाठी मोहीम आखली असून, वेबसाइटद्वारा सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधून, त्यांच्या सहकार्यासाठी आणि या प्रकल्पांना लागणा-या खर्चासाठी देणगीरूपाने आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं आहे. याच हेतूने यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष म्हणून राष्ट्रकुलाने जाहीर केलं आहे. सर्वसामान्यांना जंगलमहात्म्य कळावं यासाठी ऑनलाइन संगणकीय जाळय़ाद्वारे प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून अमेरिकेतील सेंटर फॉर कॅलिफोर्निया रिसर्च या संस्थेतील शास्त्रज्ञांनी कॅलिफोर्निया शहरातील झाडं वातावरणातून किती प्रमाणात कार्बन वायू जप्त करतात, हे मोजण्याची संगणकीय शक्कल शोधून काढली आहे. शेवटी काय, चॅरिटी बिगिन्स अ‍ॅट होम या उक्तीप्रमाणे आपणच आपली कर्तव्यं पार पाडायला हवीत. थिंक ग्लोबली अँड अ‍ॅक्ट लोकली या न्यायाने आपण निसर्गरक्षणास हातभार लावू शकतो. प्रहारचे वाचकही www.conservation.org/carboncalculator  या संकेस्थळाला भेट देऊन आपल्या कार्बन-पाऊलखुणा मोजू शकतात.

     

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0