PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: टंचाई ही शोधांची जननी टंचाई ही शोधांची जननी ================================================================================ प्रवीण गवळी on 31 August, 2010 05:30:00 AM ‘गरज ही शोधांची जननी आहे’ ही म्हण आपण नेहमी ऐकतो व बोलतो, पण आता या म्हणीत बदल करण्याची वेळ आलेली आहे. ‘तुटवडा ही शोधाची जननी आहे’ ही नवी म्हण नजीकच्या काळात नक्कीच प्रचलित होईल. काही वर्षापूर्वी अमेरिकने अणुचाचणीसंदर्भात भारतावर कडक निर्बंध घातले होते त्यामुळे अणुऊर्जा उत्पन्न करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांना तांत्रिक ज्ञानाचा व उपकरणांची टंचाई भासू लागला होता. सा-या राष्ट्रात चिंतेचं वातावरण पसरलं होतं. शांततेसाठी व ऊर्जा गरज भागवण्यासाठी राबवण्यात येणारा अणुकार्यक्रम बंद करावा लागणार की काय, याची साधार भीती सर्वाना लागून राहिली होती, पण उपकरणांची टंचाई व राष्ट्रावर पसलरेलं चिंतेचं सावट कालांतराने उपकारकच ठरलं. आपल्या देशाच्या अणुकार्यक्रमासाठीच्या जबाबदार व्यक्ती अगदी कंबर कसून कामाला लागल्या व निर्बंधांची तमा न बाळगता आपण स्वत:चं तंत्रज्ञान विकसित केलं. नैसर्गिक तेल व वायूच्या बाबतीतही नेमकी हीच परिस्थिती आहे. तेल साठे संपत येत आहेत. जगाचं अर्थकारण व अर्थव्यवस्था या खनिजाशी अतूट जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळेच नवीन साठय़ाचा शोध लावण्यासाठी नवनवीन पद्धती व तंत्रज्ञान विकसित केलं जात आहे. त्याचबरोबर वाहनांची क्षमता वाढवण्याचं तंत्रही आत्मसात केलं जात आहे, पण हे फक्तआधुनिक काळातच घडत आहे, असं नाही तर इतिहासातही असे अनेक दाखले आहेत. एखाद्या खनिज संपत्तीचा तुटवडा जाणवल्यानंतर नावीन्याचा ध्यास जागा होऊन अनेक अकल्पित शोधांचा मार्ग सुकर झाला होता. या प्रयत्नांतूनच तंत्रज्ञान विकसित होत गेलं व जे अस्तित्वात आलं ते कल्पनेच्याही पलीकडचं होतं. इसवीसन बाराव्या शतकाच्या दरम्यान ब्राँझ युगाचा अंत होऊन लोह युगाचा जन्म झाला, या तथ्याचा सर्व जणांनी स्वीकार केलेला आहे. सैनिकी अवजारात ब्राँझला पर्याय म्हणून लोह विकसित झालं होतं. इसवीसनपूर्व दुस-या शतकात जर राजाला एखादी भेट द्यावयाची असेल तर लोहापासून बनवलेली तलवार दिली जायची. अशा तलवारीचं मोल हिरे-सोनं यापेक्षाही जास्त होतं. त्याकाळी लोकांची अशी धारणा होती की, लोह हे धूमकेतू किंवा उल्कावर्षावापासून पृथ्वीवर येतं. त्यामुळे ते दुर्मीळ व मौल्यवान ठरवलं जायचं. पण मग पूर्व मेडिटरेनियन प्रदेशात कथिलचे साठे संपत आले. त्यांचा तुटवडा भासू लागला. ब्राँझ या कथिलावर मात करण्यासाठी त्याकाळी एक नवीन तंत्रज्ञान विकसित झालं. त्यांनी प्रद्रावण (स्मेल्टिंग) ही नवी पद्धत शोधून काढली. धातुविज्ञानातील ही एक प्रक्रिया किंवा अनेक प्रक्रियांची साखळी आहे. धातुपाषाणात किंवा इतर पदार्थात, धातू किंवा संयुग रासायनिक संयुक्त रूपात अथवा मिश्रण स्वरूपात असतं. त्यामधून तो विवक्षित धातू किंवा ते संयुग वितळलेल्या स्थितीत सोडवून बाजूस काढणाऱ्या क्रियेला प्रद्रावण म्हणतात. त्यावेळचे कारागीर लोहसंपन्न धातूंना कोळसा जाळून गरम करून लोह बाजूला काढत असत. प्रद्रावण प्रक्रियेमुळे लोह धातू इतक्या विपुल प्रमाणात तयार होऊ लागला की, सुमारे एक हजार वर्षात त्याची किंमत ऐंशी हजार घटकांनी कमी झाली. लोह युगाचा जन्म व प्रसार असा झाला. सतराव्या शतकात आणखी एका घटकाच्या कमतरतेमुळे इंग्लंडमध्ये एका नवीन क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याकाळी इंग्लंडचं साम्राज्य अनेक देशांत व महाखंडात पसरत होतं. त्यामुळे या देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर प्रमाणाबाहेर ताण पडत होता. खासकरून तिथल्या जंगलांवर ब्रिटिश जनता आपलं घर उबवण्यासाठी, मोठमोठी जहाजं बनवण्यासाठी, लोहाच्या प्रद्रावणासाठी व इतर अनेक औद्योगिक प्रक्रियांसाठी लाकडांचा उपयोग करत असे. यासाठी मोठय़ा प्रमाणावर तिथे जंगलतोड होत होती. एक वेळ अशी आली होती की, तिथे लाकडांचा दुष्काळ घोषित करण्यात आला होता. लाकडांचा दुष्काळ निर्माण झाल्याने कोळशाचा वापर वाढू लागला, पण लोह प्रद्रावणाच्या प्रक्रियेत कोळशाचा वापर क्वचितच केला जायचा. कारण त्याच्यात सल्फर असतं. कारण सल्फर लोहाला ठिसूळ बनवतं. असं बोललं जातं की, ठिसूळ लोहापासून बनवलेल्या तोफगोळय़ाच्या फुटण्यामुळे स्कॉटलंडचा राजा जेम्स दुसरा मरण पावला. लोहभंगूर समस्येवर अब्राहम डार्बी या इंग्लंडच्या फौंड्री मालकाने 1709 मध्ये एक अफलातून तोडगा शोधून काढला. त्याने कोळशात अस्तित्वात असणा-या व नको असणा-या घटकांना काढून टाकण्यासाठी एका रासायनिक प्रक्रियेचा शोध लावला. त्याने कोळशापासून कोक बनवलं. कोक हा कोळशाच्या ऊध्र्वपातनानंतर पाठीमागे राहणारा भुरकट रंगाचा सच्छिद्र पदार्थ असतो. याचा इंधन म्हणून किंवा लोखंडाचे आणि पोलादाचे घटक बनवण्यासाठी वापर करतात. हा कोक त्याकाळातही इतका स्वस्त होता की, याचा वापर करून फौंड्रीत जी लोखंडाची भांडी व किटली बनवली जात होती ती सामान्य जनतेच्या बजेटमध्ये व खिशाला परवडण्यासारखी बनली. पण ही कहाणी इथेच संपत नाही. त्याकाळी भूमिगत खाणींतून कोळसा बाहेर काढण्यासाठी नवनवीन विहिरी खणल्या जात होत्या, या विहिरीत नेहमी पाणी घुसायचं. या विहिरींतून पाण्याचा बाहेर उपसा करण्यासाठी वाफेच्या इंजिनाचा विकास केला गेला. याच वाफेच्या इंजिनामुळे औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली. हे सारं घडून आलं, कारण इंग्लंडमध्ये लाकडाचा तुटवडा होता म्हणून. भारतातही अन्नधान्याच्या तुटवडय़ामुळे हरित क्रांतीचा उगम झाला. पाणी कमी पडतं म्हणून धरणं व कालवे बांधण्यात आले. म्हणूनच तुटवडा ही शोधांची जननी आहे, ही नवी म्हण सार्थ ठरते!ंं