आणीक उपाय दु:खमूळ

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

परमेश्वराचं स्वरूप आपल्या चित्तात ठसवणं, आपल्या हरेक कृतीला परमेश्वराची प्रेरणा आहे, साक्ष आहे अशी दृष्टी ठेवून वर्तन करणं म्हणजे परमेश्वरासंनिध जाणं होय. परमेश्वराचे चरण हेच सर्व धर्माचं सार आहे. बाकी सारं दु:खाचं मूलस्थान आहे.

जेणें घडे नारायणीं अंतराय।

 

होत बाप माय वर्जावीं तीं॥

 

येर प्रिया पुत्र धना कोण लेखा।

 

करिती तीं दु:खा पात्र शत्रु॥

 

प्रल्हादें जनक बिभीषणें बंधु।

 

राज्य माता निंदु भरतें केली॥

 

तुका म्हणे सर्व धर्म हरिचे पाय।

 

आणीक उपाय दु:खमूळ॥

 

दु:खाचं मूळ नेमकं कोणतं, हे सामान्य माणसाला एरव्ही लक्षात न येणाऱ्या बाबी स्पष्ट करून सांगणारा तुकोबारायांचा हा प्रस्तुत अभंग. परमेश्वर ही एक शक्ती आहे. ही शक्ती दिलासा देते, अनेक कठीण प्रसंगी आधार देते तसंच अनेक मारक प्रसंगांतून तारून नेते. या शक्तीवर आत्यंतिक श्रद्धा ठेवणं ही भक्ती ठरते. आत्यंतिक श्रद्धेच्या संघटनासाठी परमेश्वर त्याच्या रूपगुणांसह चित्तावर ठसायला हवा. महाराज अभंगाच्या पहिल्याच ओळीत सांगतात की, परमेश्वर आणि आपल्यात अंतर निर्माण होण्याला कारणीभूत ठरणा-या मायबाप म्हणजे आईवडिलांनादेखील त्यागावं. मातृदेवो भव, पितृदेवो भव असं त्यांचं स्थान निश्चित असतानाही त्यांचा त्याग करावा, असं महाराज सांगतात. परमेश्वरावरची आपली श्रद्धा दृढ व्हावी यासाठी लागणारे संस्कार ज्या मातापितरांकडून होतील ते देवस्वरूप होतील. एरव्ही मुलगा-मुलगी संपत्ती जर दु:ख निर्माण करणार असतील तर त्यांचाही अवश्य त्याग करावा. भक्त प्रल्हादाने आपल्या पित्याचा, बिभीषणाने आपल्या भावाचा, भरताने आपलं राज्य व आई यांचा त्याग केला. पित्याचा त्याग केला नसता तर प्रल्हादाला आपलं भक्तपण सिद्धच करता आलं नसतं. बिभीषणाला आपल्या भावाची म्हणजे रावणाची विविध क्षेत्रांतील गती ठाऊक असूनही धर्माचरणाबाबतची दृष्टी मंजूर नसल्यामुळे त्याग करणं भाग पडलं. भरताच्या आईने आपल्याच मुलाला राज्य करायला मिळावं म्हणून स्वार्थापोटी पतीकडून तसा वर मागून घेतला; पण भरताने राज्य व विषमतेचा भाव जोपासणारी आपली माता यांचा त्याग केला. अशी विविध उदाहरणं देऊन तुकाराम महाराज सांगतात, परमेश्वराचे चरण हेच सर्व धर्माचं सार आहे. बाकी सारं दु:खाचं मूलस्थान आहे.

 

 सुंदर ते ध्यान उभे विटेवरीअशा परब्रह्माच्या श्रीमुखाचं दर्शन हेच सर्वस्व असल्याचं तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख। पाहीन श्रीमुख आवडीनेअर्थात श्रीमुखाचं अवलोकन व दर्शन यांत सर्व सुख साठवलेलं आहे. यादृष्टीनं सकल संतमंडळाचे रूपाचे अभंग फारच चिंतनीय ठरतात. नवविधा भक्तीमध्ये पादसेवनम् अर्थात चरणांची सेवा करणं या भक्तीप्रकाराचा समावेश होतो. श्रीमुख ते श्रीचरण असं परमेश्वराचं राजस, सुकुमार स्वरूप आपल्या चित्ती ठसवणं, आपल्या हरेक कृतीला परमेश्वराची प्रेरणा आहे, साक्ष आहे अशी दृष्टी ठेवून वर्तन करणं म्हणजे परमेश्वरासंनिध जाणं होय. परमेश्वराचा उपवास होय. संतमंडळानी उपदेश करताना प्राधान्याने मनावर उपकारात्मक संस्कार केले आहेत. संसार हा मायेचा पसारा आहे. पण त्यात गुरफटून आप्तस्वकीयांच्या मतांमुळे व इच्छांमुळे जर परमेश्वराचा उपवास घडत असेल तर त्यासाठी डोळसणे विचार करणं, त्या मतांचा-इच्छांचा त्याग करणं श्रेयस्कर होय, हे महाराजांनी स्पष्ट केलं आहे. मायेचं हे पटल सत्यदर्शनाच्या आड येणारं असतं. ते दूर करायला हवं. त्यासाठी पौराणिक संदर्भातील प्रल्हाद, बिभीषण आणि भरत यांचे चरित्रात्मक संदर्भ ध्यानात घ्यायला हवेत. परमेश्वरावर आपली श्रद्धा दृढतेनं संघटित करणं, हाच उपाय सुखाचं मूळ ठरू शकतो. निखळ आनंदी जगण्यासाठी हा उपदेश चिंतनीय आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0