बामियानच्या बुद्धाचे पुनरुज्जीवन आशादायी
संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या बुद्धाची अफगाणिस्तानातील बामियान प्रांतात जवळपास पंधराशे वर्षापूर्वी निर्माण केलेली दोन शिल्पे 2001 साली तालिबानी राजवटीत उद्ध्वस्त करण्यात आली. बुद्धाच्या या 53 मीटर आणि 35 मीटर उंचीच्या दोन शिल्पांपैकी लहान शिल्पाचे पुनर्निर्माण करता येणे शक्य असल्याचे नुकतेच म्युनिच विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले.
वर्षानुवर्षे प्रचलित सांस्कृतिक मूल्यांचे प्रतिबिंब आपल्यामध्ये साठवून ठेवलेल्या इतिहासाला आपल्या सोयीनुसार रंग देण्याचा पायंडा गेल्या काही दशकांपासून अगदी गल्लीबोळातल्या समाजकारण, अर्थकारण आणि पर्यायाने राजकारणापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडताना दिसून येतो. आपल्या इतिहासातील राष्ट्रप्रेम, धर्मग्रंथांमधील अहिंसा, प्रेम सलोख्याची आणि विश्वबंधुत्वाची शिकवण या गोष्टींचा अभिमान बाळगून त्यांना जतन करणारा एक गट असतो. तसेच या ठेव्याचा दुराभिमान बाळगून अन्य संस्कृतींच्या पाउलखुणा पुसणारा दुसरा गटही तितक्याच वेगाने आपले हातपाय पसरत आहे.
संपूर्ण जगाला अहिंसेची शिकवण देणाऱ्या बुद्धाची अफगाणिस्तानातील बामियान प्रांतात जवळपास पंधराशे वर्षापूर्वी निर्माण केलेली दोन शिल्पे 2001 साली तालिबानी राजवटीत उद्ध्वस्त करण्यात आली. बुद्धाच्या या 53 मीटर आणि 35 मीटर उंचीच्या दोन शिल्पांपैकी लहान शिल्पाचे पुनर्निर्माण करता येणे शक्य असल्याचे नुकतेच म्युनिच विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले.
अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती भागात वसलेले बामियान शहर गेल्या जवळपास पाच शतकांपासून बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. नंतरच्या काळात या ठिकाणी इस्लामचा प्रसार झाला. या ठिकाणी जगभरातील सर्वात उंच बुद्धमूर्तीपैकी असलेल्या 53 मीटर आणि 35 मीटर उंचीची दोन शिल्पे दुस-या शतकात कनिष्क राजाच्या काळात निर्माण करण्यास सुरुवात झाल्याचे संदर्भ मिळाले आहेत. या शिल्पांमध्ये ग्रीक, पर्शियन आणि भारतीय कलाशैलीचा प्रभाव होता. हे शिल्प केवळ स्थापत्य कला किंवा एखाद्या पंथाच्या शिकवणुकीचा नमुना नव्हते तर बौद्ध भिक्खूंप्रमाणेच सामान्य माणसालाही मिळालेल्या दिव्यज्ञान अनुभूतीच्या अधिकाराचे आणि त्यानंतर वेळोवेळी बौद्ध शिकवणुकीच्या प्रवाहांमध्ये झालेल्या बदलांचे हे प्रतीक होते.
सहाव्या शतकापासून अनेक मुस्लिम सत्तांनी बौद्ध शिकवणुकीची मुळे नष्ट करण्यासाठी बौद्ध भिक्खूंसह या तत्त्वांचा प्रसार करणारी बुद्धाची शिल्पे, बौद्ध विहारांवरही हल्ले सुरू केले. अशा प्रकारचे अनेक हल्ले सहन करून बामियान खो-यातील ही दोन शिल्पे तग धरून उभी होती. चंगेज खानाच्या नेतृत्वाखाली मंगोलांनी केलेल्या आक्रमणातूनही ही शिल्पे बचावली. कारण त्या वेळी मजूर आणि काही साध्या हत्यारांच्या साहाय्याने या शिल्पांना पाडण्याचा प्रयत्न केला गेला.
तालिबानी राजवटीमध्ये 1998 साली दोन शिल्पांपैकी लहान शिल्पावर हातबाँब टाकून त्याचा वरील भाग उद्ध्वस्त करण्यात आला. बौद्ध परंपरेचे बामियानमधील हे स्मारक जपण्यासाठी थायलंड, श्रीलंका या बौद्ध तत्त्वांचा मोठा प्रसार झालेल्या देशांमधून तालिबानच्या या कृत्याला मोठा विरोध झाला. त्याचप्रमाणे युनेस्को आणि कैरोमधील इस्लामी संशोधकांकडूनही तालिबानच्या या कृत्याला थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ही शिल्पे म्हणजे काफिरांचे मूर्तिपूजेचे थोतांड असल्याचे सांगत तालिबानचा प्रमुख नेता मुल्ला मोहम्मद ओमर याने ओसामा बिन लादेनच्या अल काइदा या संघटनेच्या मदतीने 26 फेब्रुवारी 2001 रोजी सुरुंग लावून ही शिल्पे उद्ध्वस्त केली. संपूर्ण जगभरात तालिबानच्या या कृत्यामुळे कला आणि श्रद्धेच्या प्रांतात होत असलेल्या मूलतत्त्ववादाच्या शिरकावाचा निषेध करण्यात आला. अनेक इस्लामी राष्ट्रांमधील धर्मगुरूंनी मुल्ला ओमरच्या या कृत्यामागील स्पष्टीकरण अर्थहीन असल्याचे सांगत यामुळे इस्लामच्या सर्व धर्माप्रती सहनशीलता आणि प्रेम बाळगण्याच्या शिकवणुकीलाच तडा गेल्याचेही सांगितले. या दोन बौद्ध शिल्पांना येथील स्थानिकांकडून कधीही धर्माचे प्रतीक म्हणून बघितले गेले नाही. स्थानिक नागरिकांकडून या शिल्पांना नेहमी ऐतिहाासिक स्मारकाचा दर्जा देण्यात येत होता. त्यामुळे त्याला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न स्थानिकांकडून कधीही केला गेला नाही. बामियान बुद्ध मूर्तीच्या तोडफोडीमध्ये सामान्य इस्लामी जनतेने सहभाग घेतला नाही. गेल्या पाच वर्षापासून बामियानमध्ये या दोन शिल्पांच्या पुनर्निर्माणाबाबत म्युनिच विद्यापीठाच्या अर्विन एमर्लिग यांचे आपल्या सहका-यांसोबत संशोधन सुरू आहे. या दोन शिल्पांपैकी लहान शिल्पाला त्याच्या मूळ साहित्याचाच वापर करून पुन्हा निर्माण करता येऊ शकते, असा विश्वास एमर्लिग यांनी या व्यक्त केला आहे. या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी अफगाण सरकारला याचे महत्त्व पटवून देणे, हीच मोठी कसरत एमर्लिग यांना करावी लागणार आहे. यामध्ये ब-याच तांत्रिक अडचणीसुद्धा आहेत. हे काम करताना एक तर बामियान खो-यात एक छोटा कारखाना सुरू करावा लागेल किंवा प्रत्येकी दोन टन वजनाच्या 1400 दगडांची वाहतूक जर्मनीला करावी लागेल. या सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळ्यांवर मात करून बामियानमधील ही जगप्रसिद्ध शिल्पे पुन्हा उभी राहावीत, असाच आशावाद सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (2 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा