अ परफेक्ट किचन
जाहिरातींतून दिसणारे (आणि हल्ली मार्केटमध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळणारे) मॉडय़ुलर किचनचे अनेक पर्याय आपल्याला भुरळ पाडतात. पण मॉडय़ुलर किचन म्हणजेच सोयीस्कर आणि आकर्षक स्वयंपाकघर नव्हे. स्वयंपाकघरातील आवश्यक सुरक्षेचा विचार करून बजेटनुसार स्वयंपाकघराची सौंदर्यपूर्ण रचना करणं आपल्यालाही शक्य आहे.
घरातल्या कोणत्याही खोलीचं स्वरूप बदलायचं असेल तर भिंतींचे रंग बदलणं हा सर्वात चांगला आणि स्वस्त उपाय आहे. स्वयंपाकघर नव्याने बांधताना किंवा त्याचं नूतनीकरण करताना भिंतींना कोणता रंग असावा, हे प्रथम निश्चित करावं. रंगनिश्चिती झाली की त्यानुसार डिझाइन आणि फर्निचरची निवड करणं सोयीचं होतं. रंगाची निवड चुकल्यास घराच्या सौंदर्यासाठीही बाधक ठरू शकते. जुन्या स्वयंपाकघराचं नूतनीकरण करताना पूर्वीच्या रंगात बदल जरूर करावा. स्वयंपाकघरातील कॅबिनेट्स आतूनही रंगवावेत.
स्वयंपाकघरातील फ्लोरिंग खराब झालं असेल अथवा मार्बलची चमक कमी झाली असेल तर फ्लोरिंग बदलणं हाच उत्तम पर्याय ठरतो. खास स्वयंपाकघरासाठी विनायल टाइल्स, सिरॅमिक टाइल्स, लॅमिनेटेड टाइल्ससारखे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. पण स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून फ्लोरिंगचा विचार करणं जास्त महत्त्वाचं असतं. उदा. मार्बल चमकदार दिसावं यासाठी ती मशिनने जरूर घासून घ्यावी.
स्वयंपाकघर हवेशीर असणंही महत्त्वाचंच. सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही ते आवश्यक आहे. त्यासाठी मोकळ्या जागी उघडणा-या खिडकीची किचनमधील व्यवस्था फायदेशीर ठरते, जेणेकरून स्वयंपाकघरात हवा खेळती राहू शकेल. स्वयंपाकघरात एक्झॉस्ट फॅन किंवा चिमणीचा वापरही त्यादृष्टीने उपयुक्त ठरतो.
आवश्यक फर्निचर आणि उपकरणांची उपयुक्ततेनुसार केलेली योजना स्वयंपाकघराच्या सौंदर्यात भर घालते. स्वयंपाकघरात वापरात येणा-या टेबलक्लॉथ, कुशन्स आणि सेंटर पीस यांसारख्या वस्तूंची निवडही काटेकोरपणे करावी. अशा प्रकारे केलेली निवड स्वयंपाकघराच्या सौंदर्यात भर घालते. आकर्षक डायनिंग टेबल, खुर्च्याही किचनच्या सजावटीसाठी उपयोगी ठरतात. योग्य जागेत योग्य फर्निचरची योजना करतानाच, फर्निचर आणि स्वयंपाकघरातील इतर आवश्यक साधनं यांचा मेळ साधला जाईल याकडे लक्ष द्यावं. उत्तम प्रतीच्या स्टील सिंकची निवड करावी. किचन एरिया लक्षात घेऊन स्वयंपाकघरात वापरल्या जाणा-या वस्तू सहज सामावतील अशा स्पेशियस कॅबिनेट्सची निवड करावी. भांडी ठेवण्यासाठी रॅकही मोठे निवडावेत. वेळेची बचत करणा-या अत्याधुनिक आणि स्टायलिश उपकरणांची निवडही अतिशय उपयुक्त ठरते.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा