एव्हरेस्ट थरारक दृश्यानुभव
वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रातील सायन्स ओडिसीमध्ये नुकतीच ‘एव्हरेस्ट’ ही डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली. एव्हरेस्टवर प्रथमच चढाई करणारे सर एडमंड हिलरी आणि तेनझिंग नोर्गे यांची शौर्यगाथा असलेली ही डॉक्युमेंट्री पाहणं हाही एक चित्तथरारक अनुभव होतो. एव्हरेस्ट सर करणारी मराठीकन्या कृष्णा पाटील हिनेदेखील ही डॉक्युमेंट्री पाहिली.
स्वप्न आपण प्रत्येक जण बघत असतो, नव्हे तर स्वप्नाळूवृत्ती हा आपला स्वभावधर्मच आहे. लहानपणी पंख लावून उडण्याचं स्वप्न तर मोठेपणी विमानात बसण्याचं. आपापली स्वप्न आपापल्या स्वभावधर्मानुसार बदलत असतात, परंतु काही स्वप्नं झपाटून टाकतात. काही जीवनाचा ध्यास बनतात. असंच एक स्वप्न बऱ्याचशा वेडय़ांनी पाहिलं ‘एव्हरेस्ट’ सर करण्याचं. त्यात मोजकेच यशस्वी झाले, बरेचसे थंडीत गारठले, बर्फात गाडले गेले. या सगळय़ांचं, त्यांच्या वेडय़ा साहसाचं स्मरण करून ‘एव्हरेस्ट’ ही डॉक्युमेंट्री सुरू होते.. चाळीस मिनिटांची ही डॉक्युमेंट्री एका साहसाचं, विलक्षण रोमांचकारी चित्रण डोळय़ांसमोर उभं करते आणि वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रातील सायन्स ओडिसीमध्ये ही डॉक्युमेंट्री पाहण्याचा अनुभव तेवढाच चित्तथरारक होऊन जातो. तिथली अद्ययावत तंत्रप्रणाली, १८ मीटर व्यासाचा भव्य डोमशेप पडदा तसंच प्रोजेक्शन साधनांमधील ‘फिश आय लेन्स’ जोडणी, (जी खूप मोठय़ा प्रतिमा कोणत्याही अडथळय़ाशिवाय डोम स्क्रिनवरती जिवंत करते.) आणि एव्हरेस्ट सर करण्यातलं ते थ्रील हा एक स्वानुभव बनतो. या डॉक्युमेंट्रीमध्ये प्रथमच आयमॅक्स कॅमेऱ्याने ‘एव्हरेस्ट’चं छायाचित्रण करण्यात आलं आहे. जे प्रेक्षकांना एव्हरेस्टच्या भव्यतेची खरी झलक दाखवतं. कोसळणारे हिमकडे, हॅलिकॉप्टरची सफर आणि तिथली बोचरी थंडी आपण प्रत्यक्ष अनुभवतो. कोसळणारे हिमकडे आपल्याच रोखाने येताना पाहून नाही म्हटलं तरी क्षणभर दचकायला होतं.ही डॉक्युमेंट्री म्हणजेच जेमलिंग नोर्गे आणि त्यांच्या साथीदारांची विजयकहाणी आहे, मात्र तो प्रचंड अभ्यास, कठोर मेहनत, उच्च ध्येयशक्ती आणि अमर्याद उत्साह यांचा एक सजग वस्तुपाठही आहे. १९५३मध्ये सर एडमंड हिलरी यांच्यासोबत एव्हरेस्टवर प्रथमच चढाई करणारे तेनझिंग नोर्गे यांचा मुलगा जेमलिंग आपल्या पित्याच्या एव्हरेस्ट सर करण्याच्या कहाणीसोबत त्यांच्या आयुष्याची कहाणीदेखील निवेदित करतो. लहानपणापासूनच त्यांची एव्हरेस्टविषयीची ओढ आणि जोष, ऊर्मी हे अत्युच्च शिखर सर करण्याकडेच कशी ओढ घेत होती, हे सारं रक्तातच कसं होतं, हेच त्यांचं स्वप्न कसं होतं, हे सारं निवेदनातून येतं. याच स्वप्नासाठी कित्येक गिर्यारोहक तिथल्या अनेक समस्यांना हसत-हसत सामोरं जातात. हिमकडे कोसळणं, हाडं गोठवणारी थंडी, प्राणवायूची कमतरता आणि रक्तातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्याचा मेंदूवर होणारा परिणाम असा अडचणींचा डोंगर. इथे एखादी छोटीशी चूकदेखील प्राणघातक ठरू शकते. इतक्या प्रतिकूल परिस्थितही कोणती उमेद या गिर्यारोहकांना जगवत असते? कोणता आशावाद यांना ध्येयाप्रत पोहोचण्यास बळ देत असतो? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण करत आणि उत्तर देत ही डॉक्युमेंट्री एव्हरेस्टवरची जेमलिंग आणि त्यांच्या चमूची विजयी चढाई चित्रित करते.डॉक्युमेंट्री संपते तेव्हा आपण एका परिपूर्ण अनुभवापर्यंत आलेले असतो. एक जीवनपट जवळून बघितल्याचा, एक धाडस अनुभवल्याचा आनंद असतो. एव्हरेस्टवर जाणे, तो अनुभवणं आपल्यापैकी प्रत्येकाला शक्य होईलच हे ठाऊक नाही, मात्र जेमलिंग यांच्या या सफरीतून एव्हरेस्ट ‘सर करणे’ ही नसे थोडके.Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा