भारतरत्न पुरस्काराचे मानकरी कोण असावेत?
मिर्जा ग़ालिब व शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करावे, असे मी म्हटले आणि काहीजणांनी यावर टीका केली. म्हणजे टीकाकार म्हणाले की असे असेल तर भारतरत्नाची उपाधी राम आणि गौतम बुद्ध यांना का देऊ नये? आणि तात्या टोपे, त्यांना तर परमवीरचक्र द्यायला पाहिजे.
देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ हा पुरस्कार कोणाला द्यावा, याविषयी सध्या चर्चा सुरू आहे.
मिर्जा ग़ालिब व शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करावे, असे मी म्हटले आणि काहीजणांनी यावर टीका केली. म्हणजे टीकाकार म्हणाले की असे असेल तर भारतरत्नाची उपाधी राम आणि गौतम बुद्ध यांना का देऊ नये? आणि तात्या टोपे, त्यांना तर परमवीरचक्र द्यायला पाहिजे.
उत्तरादाखल मी एवढेच म्हणेन की, मरणोत्तर पारितोषिके देणे गैर नाही. पण अशी पारितोषिके सुयोग्य व्यक्तींनाच दिली पाहिजेत. उदाहरणार्थ, सरदार पटेल किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सन्मानित करण्यात आले, ते योग्यच आहे.
पण आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, गालिब हे श्रीरामासारखे आख्यानातील किंवा पुराणातील एक व्यक्ती नाहीत, किंवा ते गौतम बुद्धाप्रमाणे पुरातन विभूतीही नाहीत. गमलिब हे आधुनिक युगातील मान्यवर आहेत. त्यांचे अनेक विचार तत्कालिन विचारधारेच्या पुढे धाव घेताना दिसून येतात. सरंजामशाहीच्या पारंपरिक जोखडाला झुगारून त्यापल्याड काही स्थिरावणारा आणि आधुनिक युगाचे सुपरिणाम मानणारा हा निर्मितीक्षम विचारवंत होता. एका कवनात गालिब म्हणतो-ईमान मुझे रोके है, जो खींचे है मुझे कुफ्र
काबा मेरे पीछे है, कलिसा मेरे आगे
‘कालिसा’चा शब्दश: अर्थ गिरिजाघर (चर्च) असा होतो. पण या काव्यपंक्तीत त्याचा प्रतीकात्मक अर्थ ‘आधुनिक संस्कृती’ असा मानला पाहिजे. ‘काबा’ हे मक्केतील पवित्र स्थान आहे, पण येथे अभिप्रेत असलेला अर्थ आहे ‘सरंजामशाही’. तात्पर्य, या काव्यपंक्तीतील कवी म्हणतो, ‘धार्मिक श्रद्धा मला मागे ठेवते आहे, माझी पीछेहाट करते आहे. परंतु धर्माबाबतीत अविश्वास व जिज्ञासा मला पुढे जायला, प्रगती करायला प्रवृत्त करत आहे. सरंजामशाही राहिली माझ्या मागे कोठेतरी-आणि नवविचार-नवसंस्कृती साद घालीतसे मजला!’
हे सगळे गालिब लिहितो केव्हा? तर 1857च्या महान बंडाच्या काळात. तो काळ, जेव्हा भारतवर्ष संरजामशाहीत ओतप्रोत भिजला व थिजला होता.
उर्दू काव्य हे भारताच्या सांस्कृतिक खजिन्यातील देदीप्यमान व अमूल्य रत्न आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात उर्दू ही शिक्षित जनतेची सामायिक भाषा होती-हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई-सर्वाची ती भाषा होती. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र काही हितसंबंधियांनी उर्दू ही परकीय व केवळ मुसलमान समाजाची भाषा आहे असा तद्दन खोटा प्रचार सुरू केला.
मिर्जा गमलिब हे उर्दू वाङ्मयातील नव्हे तर भारताच्या संमिश्र गंगा-जमनी संस्कृतीचे तळपते प्रतीक व अग्रगण्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना जाऊन शतकाहून जास्त काळ लोटला असला तरी भारताची संस्कृती-अद्याप जीवित आहे हे विसरता कामा नये.
एप्रिल 2011मध्ये दिल्लीच्या ‘जश्न-ए-बहारा’ मुशाय-यामध्ये मी सर्वप्रथम मिर्जा गमलिबला भारतरत्न देऊन सन्मानित करावे अशी मागणी केली. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या अनेक सन्माननीय व्यक्तींनी मला दुजोरा दिला. (मीराकुमार, सलमान खुर्शीद, एस. वाय. कुरेशी आदी.) तथापि त्यानंतर एका वृत्तपत्राने मी ही सूचना केवळ भावनेच्या भरात केली आहे, अशी टीका केली. (मला अर्थातच ही वृत्तपत्रीय टीका मान्य नाही!)
शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांनाही ‘भारतरत्न’ द्यावे ही सूचना मी नुकतीच कोलकात्याच्या एका संमेलनात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात शरदबाबूंनी प्रस्थापित जातिव्यवस्थेवर प्रखर प्रहार केले. स्त्रियांवरील अत्याचारांविरुद्ध आणि अंधश्रद्धेविरुद्ध त्यांनी आघाडी उघडली. (त्यांच्या ‘श्रीकान्त’, ‘शेषप्रश्न’, ‘चरित्रहीन’, ‘ब्राह्मणाची मुलगी’, ‘देवदास’, ‘ग्रामीण समाज’ इ. साहित्यिक कृती पाहाव्यात.)
कोलकाता नगर सभागृहात 1933 साली शरदबाबूंची सत्कार सभा भरवण्यात आली. त्यावेळच्या त्यांच्या वक्तव्याचा काही भाग पाहा-
‘मी कोणाचे वाङ्मयीन ऋण मानतो? केवळ माझ्याआधी ज्यांनी साहित्यनिर्मिती केली त्यांचेच ऋण मानतो, असे नव्हे. मी कोणाचे ऋण मानत असेन तर ते सामान्य, पीडित जनतेचे, ज्यांनी त्यांचे सर्व काही जगाला अर्पण केले पण त्या बदल्यात त्यांना काहीही नाही मिळाले! मी उतराई आहे, तो समाजातील कमजोर व शोषित जनांचा, ज्यांच्या दु:खाश्रूंची कोणी दखलदेखील घेत नाही. त्यांच्यामुळे मला त्यांची बाजू जगापुढे मांडण्याची प्रेरणा मिळाली. अशा या आम जनतेवर सतत होत असणा-या बेसुमार, कठोर व अस्पृश्य अन्यायाचा मी साक्षीदार आहे. सौंदर्याने व समृद्धीने नटलेला वसंत ऋतू या जगात काही थोडय़ाच लोकांच्या वाटय़ास येतो. थोडेसेच लोक या ऋतूचे सौंदर्य व संपत्ती उपभोगतात. माझी वाङ्मयीन नजर मात्र या मूठभर सुखी लोकांवर खिळू शकत नाही.’
शरदबाबूंच्या भाषणाचा वरील मथितार्थ आजच्या परिस्थितीलाही लागू पडतो. आपली 80 टक्के जनता आजही भयानक गरिबीत जीवन कंठत आहे. गेली पंधरा वर्षे दररोज सुमारे 47 शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. समाजस्वास्थ्य, निवासव्यवस्था, शिक्षणक्षेत्र अशा बाबतीत सर्वच भीषण समस्या आहेत. शरदबाबूंचे विचार आजही महत्त्वाचे आहेत.
‘भारतरत्न’ या सन्मानासाठी महान तामीळ कवी सुब्रह्मण्यम भारती हेही सर्वथा पात्र आहेत. ते प्रखर राष्ट्रवादी व समाजसुधारक तर होतेच. शिवाय स्त्रियांवरील अत्याचारांविरुद्ध त्यांनी प्रभावी लिखाण केले. त्यांच्या काही काव्यपंक्तींचा विस्तृत उल्लेख सर्वोच्च न्यायालयाच्या मी लिहिलेल्या एका निकालपत्रातदेखील करण्यात आला आहे. (हिंसाविरोधक संघ वि. मिर्जापूर मोती कुरेश जमात व इतर, 14 मार्च 2008).
आपल्या देशातील कितीशा लोकांनी गमलिब, शरच्चंद्र व भारती यांचे साहित्य वाचले आहे? क्रिकेट खेळणा-यांना आणि फिल्लमवाल्यांना भारतरत्न देण्यात यावे असे काहीजण म्हणत आहेत. आपल्या सांस्कृतिक पातळीची अधोगती यावरून दिसून येते. ख-या मान्यवरांना (‘हिरों’ना) आपण दुर्लक्षित करत आहोत आणि दिखाऊ ‘हिरों’च्या मागे पळत सुटलो आहोत. मला खेदाने म्हणावेसे वाटते की, भारतीयांची सध्याची पिढी आपली संस्कृती मोठय़ा प्रमाणात हरपून बसली आहे. आणि केवळ पैसा, क्रिकेट-चित्रपट कलावंत आणि भंपकपणा यांनाच महत्त्व दिले जात आहे.
आज आपला देश महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आपल्याला अशा व्यक्तींची (आणि विचारांची) गरज आहे. ज्या व्यक्ती (आणि जे विचार) देशाला उचित दिशा दर्शवून पुढे नेतील, अशा व्यक्तींनाच (त्या हयात नसल्या तरीही) ‘भारतरत्न’ हा पुरस्कार द्यायला पाहिजे. सामाजिक संदर्भ (किंवा बांधिलकी) नसणा-या लोकांना-मग ते क्रिकेटवाले असोत, चित्रपट कलावंत असोत का आणखी कोणीही असोत-‘भारतरत्न’ देणे म्हणजे या सर्वोच्च उपाधीची कुचेष्टा करणेच होय!
मराठी अनुवाद : सुकुमार शिदोरे
परिवर्तनाचा वाटसरू, 16 ते 31 जानेवारी 2012, संपर्क : 020-25530950





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा