PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: वादळामुळे आंबा तीन महिने उशिरा वादळामुळे आंबा तीन महिने उशिरा ================================================================================ प्रहार वार्ताहर on 01 February, 2010 02:30:00 AM रत्नागिरी- ऑक्टोबर महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि नोव्हेंबरमध्ये अचानक उद्भवलेले वादळी संकट यामुळे तब्बल तीन महिन्यांनंतर आंबा बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. जानेवारी महिना फळ धरण्याचा कालावधी असतानाही बहुतांश आंबापिकांना आता मोहोर आल्याचे दिसून येत आहे. उपलब्ध झालेला आंबा रत्नागिरीच्या बाजारपेठेत दाखल न होता परजिल्ह्यात पाठवला जात असून पश्चिम महाराष्ट्रात चरा ते नऊ हजार रुपये या दराने चार डझन आंब्याची पेटी विकली जात आहे. रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सुमारे दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल फक्त आंबा उत्पादनातूनच होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरच्या सुरुवातीला आंबापिकांना मोहोर धरून तो डिसेंबरअखेरीस बाजारपेठेत येतो. गतवर्षी हवेतील बदलामुळे आंबापीक उशिरा आले होते. आताही अवेळी पाऊस आणि फियान वादळ या दोन्हींच्या तडाख्यामुळे रत्नागिरीतील आंबा नाहीसा झाला आहे. ज्या भागामध्ये पावसाचा आणि वादळाचा जास्त परिणाम झालेला नाही, अशा ठिकाणाहून मिळालेला आंबा परजिल्ह्यात जाऊ लागला. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतक-यांनी यावर्षी आंबापीक लवकर आणि अधिक उत्पादन देणारे येईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र वातावरणातील अनपेक्षित बदलांनी त्याला कलाटणी दिली आहे. आंब्यासाठी लागणारे हवामान रत्नागिरी जिल्ह्यात पोषक असते. दिवसा ३० अंश आणि रात्री १७ अंश इतके हवामान असणे आवश्यक होते. मात्र वातावरणातील सततच्या बदलामुळे शेतक-यांनी केलेली औषधांची फवारणीही फलदायी ठरलेली नाही. नोव्हेंबरमध्ये आलेल्या फियान वादळात जिल्ह्यातील सुमारे ४७ हजार आंब्याची झाडे उन्मळून पडली. हे अतोनात नुकसान सहन करण्यापूर्वीच अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतक-यांनी केलेली फवारणी साफ धुवून काढली. शेतक-यांचे खूप नुकसान झाले असून मेअखेरीस आंबा बाजारात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जानेवारीमध्ये आंबा काढणीचा हंगाम सुरू होतो. मात्र आता जिल्ह्यातील बहुतांश आंबा बागायतींमध्ये पिकांवर मोहोर धरल्याचे दिसून येत आहे. उपलब्ध होत असलेला आंबा पश्चिम महाराष्ट्रात चार ते नऊ हजार रुपये या दराने विक्री होत असून मुंबईसारख्या ठिकाणी एक हजार रुपये डझन अशा भावाने आंबा दिला जात आहे. उत्पादन कमी असल्यामुळे हे दर वाढलेले असून उत्पादन वाढल्यास दर कमी होतील, असे शेतक-यांचे म्हणणे आहे. तोपर्यंत खुद्द रत्नागिरीकरांना आंब्याच्या चवीपासून वंचित राहावे लागणार आहे.ं