अस्वस्थ करते तेच साहित्य
चार क्षण करमणूक करणारे ते साहित्य नव्हे, वाचकाला जे विचार करायला प्रवृत्त करते, अस्वस्थ करते त्याला साहित्य म्हटले पाहिजे, असे मत विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर पानतावणे यांनी सांगितले.
परभणी- चार क्षण करमणूक करणारे ते साहित्य नव्हे, वाचकाला जे विचार करायला प्रवृत्त करते, अस्वस्थ करते त्याला साहित्य म्हटले पाहिजे. चांगले आणि निकृष्ट हेच साहित्याचे दोन भाग असून समाज सापेक्षता, सांस्कृतिक सापेक्षता हेच उत्तम साहित्याचे लक्षण असल्याचे मत विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांनी व्यक्त केले. परभणी येथील ‘पहिल्या राज्यस्तरीय स्वाभिमान साहित्य संमेलना’च्या समारोप समारंभाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपले विचार मांडले.
समाज परिवर्तनाचा विचार साहित्यातून झाला पाहिजे. मराठी साहित्याला सातशे ते आठशे वर्षाचे इतिहास आहे. त्यात आत्मसन्मानाचे आयुष्य किती आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे. साहित्याचे पुनरावलोकन करण्याची गरज असून आम्ही कोणत्या साहित्याची पताका खांद्यावर घेऊन जातो, हे जाणून घेणे काळाची गरज आहे. याबाबत अशा संमेलनातून साहित्याच्या अंतर्बाह्य अंगाचा विचार झाला पाहिजे. साहित्याची चिकित्सा संमेलनातून झाली पाहिजे. सुमार दर्जाच्या साहित्याची खोटी स्तुती करू नये, असे परखड मत पानतावणे यांनी मांडले.
संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी, मराठी संमेलनाचा धागा हा स्वाभिमानाशी जोडल्याचा प्रयत्न म्हणजेच स्वाभिमान साहित्य संमेलन असून संमेलनातून समाज घडवण्याचे काम होत असल्याचे ते म्हणाले. ‘या जगाची त्या जगाला ओढ राहिली नाही, जिभेच्या द्वेषापोटी साखर गोड राहिली नाही’ या ओळी उद्धृत करून त्यांनी सध्याच्या समाजातील दुराव्याचे चित्रण केले. दोन दिवस चाललेल्या या साहित्य संमेलनाने परभणी मराठवाडय़ातील साहित्यप्रेमींना साहित्यिक मेजवानी दिली.
साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे, स्वागताध्यक्ष माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मोरे, कार्याध्यक्ष अशोक सोनी, स्वाभिमान संघटनेचे जगदीश बाबर, संमेलनाचे निमंत्रक अभय कुलकर्णी आदी उपस्थित होते.परिसंवादात ‘मराठी’चा सूर
मराठी माणसाचे सामर्थ्य हे त्याच्या इतिहासावर की येणा-या भविष्यकाळावर ठरणार आहे, यावर परस्पर विरोधी परखड विचार व्यक्त झाले. मराठी माणसाचे सामर्थ्य शोधत असताना महाराष्ट्राचे हृदय स्थान असणारी मुंबई तर आपण गमावणार नाही ना, असा सवाल या वेळी उपस्थित झाला. यावर आत्मपरीक्षण हीच खरी गरज असल्याचा सूर ‘मराठी माणसांचे सामर्थ्य आणि मर्यादा’ या विषयावरील परिसंवादात उमटला.
शरद कारखानीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, भास्कर ब्रह्मनाथकर, सुधाकर डोईफोडे आदी सहभागी झाले होते. मराठी सामर्थ्य म्हणजे माझं सामर्थ्य आहे, अशी व्याख्या राही भिडे यांनी केली. मराठी माणूस सामर्थ्यांच्या बाबतीत अनभिज्ञ तर नाही ना, असा सवाल करत या मर्यादेच्या बाबतीत विचारमंथन करण्याची गरज असल्याचे भिडे म्हणाल्या. सध्या बोकाळत असलेल्या खेकडा पद्धतीवर टीका करत मराठी माणसाचा पाय मराठी माणूसच ओढत असल्याचे त्या म्हणाल्या. आज मराठी माणसामध्ये सोशिकपणा हा गुण अडथळा बनू पाहत आहे की काय? आपसात झुंजवत ठेवण्याचे काम दिल्लीश्वराने आजवर केले आहे. महाराष्ट्राने देशाला लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, दादासाहेब फाळके यांच्यासारखी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे दिली आहेत. शिवसेना आणि मनसे हे भावनेवर आंदोलन करतात, त्यांनी दैनंदिन समस्यांना वाचा फोडल्यास सत्ता मिळेल. मराठी माणसाने आळशीपणा सोडून आपली पुढील वाटचाल करावी, असे त्या म्हणाल्या.
मराठी माणूस कोठे आहे, असा सवाल करत मराठी माणसाच्या विकासातील अडथळ्याचा पाढा शरद कारखानीस यांनी अध्यक्षीय समारोपाच्या वेळी वाचला.



del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा