शिक्षण मंडळाची हेल्पलाइन बुधवारपासून
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची मुंबई विभागाची ‘स्ट्रेस हेल्पलाइन’ येत्या बुधवारी, 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
मुंबई- दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची मुंबई विभागाची ‘स्ट्रेस हेल्पलाइन’ येत्या बुधवारी, 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मंडळाच्या राज्यातील सर्व आठही विभागांनी यंदा अशी हेल्पलाइन सुरू करावी, असे आदेशच राज्य मंडळाने काढले आहेत. मागील वर्षी मुंबई विभागीय मंडळाच्या संकल्पनेतून प्रथम अशा प्रकारची हेल्पलाइन सुरू झाली आणि त्याला विद्यार्थी-पालकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर या हेल्पलाइनला महत्त्व प्राप्त झाले असून समुपदेशनाचे प्रशिक्षण घेतलेल्या एमएडच्या शिक्षकांचे मार्गदर्शन या हेल्पलाइनसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
परीक्षेदरम्यान तणावाखाली असणा-या विद्यार्थ्यांना आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी मागील वर्षी मंडळाच्या मुंबई विभागीय सचिव बसंती रॉय यांच्या संकल्पनेतून हेल्पलाइनची संकल्पना पुढे आली. बुधवारपासून सुरू होणारी ही हेल्पलाइन दहावीच्या अखेरच्या पेपपर्यंत सुरू राहील. निकालांदरम्यानच्या दोन दिवसांतही ती पुन्हा सुरू होते.
राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षेला सुमारे 16 लाख विद्यार्थी बसतात. मुंबईत दोन्ही परीक्षांचे मिळून यंदा साडेसात लाख विद्यार्थी आहेत. प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे, समुपदेशक प्रा. विजय जामसंडेकर व अन्य समुपदेशक या हेल्पलाइनवरून विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. मागील वर्षीच्या एका अनुभवाविषयी सांगताना डॉ. बर्वे म्हणाले, ‘दहावीचा विद्यार्थी दुस-या दिवशीच्या पेपरसाठी जायचेच नाही, असे म्हणत होता. मला काहीही आठवत नाही. उद्या काय लिहू, असे तो सारखे विचारत होता. तो हुशार असल्याचे त्याच्या पालकांना सांगितले. मी त्याला सायकलचे उदाहरण दिले. खूप दिवसांनी सायकल चालवली की आपल्याला भीती वाटते, पण एकदा सुरू केली, की आपोआप येते. बरेच समजावल्यावर तो शांत झाला. त्याला ८२ टक्के गुण मिळाले.’ मुलांच्या ताणतणावाचा निचरा करण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असते, असे प्रा. विजय जामसंडेकर यांनी सांगितले.
यंदाही या हेल्पलाइनचा उद्देश यशस्वी होईल, अशी आशा मुंबई विभागीय सचिव व्ही. एस. म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.ं


del.icio.us
Digg
Facebook
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा