पहिले पान | महाराष्ट्र | शिवसेनेच्या फुग्यात पवारांची हवाभरणी

शिवसेनेच्या फुग्यात पवारांची हवाभरणी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

‘आयपीएल’मध्ये खेळण्यास ऑस्ट्रेलिन खेळाडूंना विरोध करू नये,अशी समजूत काढण्याच्या मिषाने शिवसेनेच्या फुसक्या फुग्यात हवा भरण्याचा प्रयत्न पवारांनी केला.

मुंबई- राहुल गांधी आणि शाहरूख खान या दोन्ही आघाड्यांवर सपशेल तोंडावर आपटल्याने पार फुस्स झालेल्या शिवसेनेला आधार देण्यासाठी अखेर त्यांचे जुने मित्रशरद पवार यांनी रविवारी थेट मातोश्रीवर धाव घेतली. आयपीएलक्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना शिवसेनेने विरोध करू नये, अशी समजूत काढण्याच्या मिषाने शिवसेनेच्या फुसक्या फुग्यात हवा भरण्याचा प्रयत्न शरदबाबूंनी यावेळी केला. मुंबईत आजही शिवसेनेचीच सत्ताचालते आणि बाळासाहेबांच्या अनुमतीशिवाय मुंबईत पान हलत नाही, हा भ्रम जिवंत राहावा आणि शिवसेनेला नामुष्कीतून बाहेर काढावे यासाठी पवार यांनी ही खेळी केल्याचेच यातून दिसून आले.

 

पवार आणि बाळासाहेब यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाली. त्यात त्यांनी, भारतात पाकिस्तानी आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना खेळू देण्याची विनंती करण्याचा कार्यक्रम पार पाडला. स्वत: पवार या चर्चेबाबत काहीही बोलले नसले तरी त्यांच्या समवेत असलेले शशांक मनोहर यांनी, आणखी दोन दिवस विचार करून शिवसेना निर्णय घेणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.

 

राहुल गांधींच्या दौ-यात काळे झेंडे दाखवा, या खुद्द बाळासाहेबांच्या आदेशाला शिवसैनिकांनीच नव्हे तर नेत्यांनीही केराची टोपली दाखवली होती. शाहरूख खान हाही त्याच्या भूमिकेवर ठाम. या दोन घडामोडींमुळे, आजवर मुंबईवर आपली दहशत चालत असल्याचा भ्रमाचा फुगा फुटून सत्य जगजाहीर झाल्याने शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हेही हवालदिल झाले होते. भाजपनेही हतबल शिवसेनेला एकटे पाडले असताना पवार यांनी मात्र शिवसेनेसाठी मदतीचा हात पुढे केला.

 

अर्थात त्यामागे पवार यांचाही स्वार्थ होताच. राहुल यांनी शिवसेनेला पार धोबीपछाड दिली असताना तिकडे महागाईच्या मुद्यावर काँग्रेसने पवारांना कोंडीत पकडले आहे. त्यामुळेच, वेळप्रसंगी आपल्या मदतीला धावणा-या शिवसेनेला जिवंतठेवण्यासाठी आणि त्याचवेळेस काँग्रेसवर दबाव वाढविता यावा, या दुहेरी हेतूने पवारांनी आज मातोश्रीकडे मोर्चा वळवला होता. पवारांच्या या खेळीमुळे नवी दिल्लीत १० जनपथला काहीच फरक पडत नाही, असे काँग्रेस नेत्यांचे मत आहे. पवार आपल्या राजकीय सोयीसाठी तरी मैत्रीदाखवतात, एवढेच या भेटीचे फलित ठरले आहे.

  ऑस्ट्रेलियन खेळाडूंबाबत लेखी भूमिका मांडा 

आयपीएल स्पर्धेत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या खेळण्याविषयी बीसीसीआयने लेखी स्वरूपात भूमिका मांडावी आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे उपाध्यक्ष शरद पवार आणि बीसीसीआय चे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी झालेल्या चर्चेत सांगितले. पवार-बाळासाहेब भेट तब्बल दोन तास चालली. या प्रसंगी शिवसेनेचे नेत उद्धव ठाकरे, प्रवक्ते खा. संजय राऊतही उपस्थित होते. या प्रदीर्घ भेटीत राजकीय चर्चा झाली असण्याची दाट शक्यता असली तरी दोन्ही बाजूंनी यास दुजोरा देण्याचे टाळले.

 

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आयपीएल स्पर्धेत खेळू देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व प्राप्त झाले होते. या भेटीनंतर पवारांनीच बोलावे म्हणून पत्रकारांनी प्रयत्न केल्यावर अखेर मनोहर यांनी संवाद साधून ठाकरे यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंबाबतची भूमिका लेखी स्वरूपात सादर करण्यास सुचविल्याचीमाहिती दिली. ‘‘पवार आणि बाळासाहेब हे दोघेही मोठे नेते आहेत. क्रिकेटपटूंबद्दलचा निर्णय बाळासाहेबच घेतील’’, अशी माहिती शिवसेनेच्या वतीने राऊत यांनी दिली. औरंगाबाद येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळव्यात पवार यांनी या भेटीचे संकेत दिले होते. त्यानंतर ते अचानक संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास मातोश्रीवर पोहोचले.

 

भारतात सध्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ खेळायला येत नसून आयपीएलच्या प्रत्येक संघात एक-दोन खेळाडू हे ऑस्ट्रेलियाचे असतील. त्याव्यतिरिक्त या चमूत बहुतांश भारतीय क्रिकेटपटू असतात. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना खेळू द्यावे, अशी भूमिका बीसीसीआयने बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे मांडली. हीच भूमिका लेखी स्वरूपात देण्याचे ठाकरे यांनी बीसीसीआयला सांगितले. येत्या एक-दोन दिवसांत बीसीसीआयची लेखी स्वरूपातील भूमिका ठाकरे यांना देण्यात येईल. या बैठकीविषयी उत्सुकता असलेल्या प्रसार माध्यमांशी पवार न बोलताच निघून जाण्याच्या तयारीत होते. बैठकीत काय झाले हे पवारांकडून ऐकण्यासाठी माध्यमांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. हा घेराव सुमारे दहा मिनिटे सुरू होता. शेवटी, शशांक मनोहर यांनी गाडीतून उतरून माध्यमांसमोर येऊन बैठकी बद्दलची माहिती दिली आणि त्यानंतरच पवारांची पत्रकारांच्या या घेरावातून सुटका झाली.

  

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0