राष्ट्रवादीत बंडखोरी, काँग्रेसही रिंगणात
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी, मंगळवारी पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
रत्नागिरी- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये शेवटच्या दिवशी, मंगळवारी पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीने अनिल तटकरे यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीच्याच माणिक जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरीचा झेंडा फडकावला आहे. पेणमधील काँग्रेसचे बडे नेते रविशेठ पाटील यांचे चिरंजीव वैकुंठ पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करत राष्ट्रवादीसमोर आणखी एक आव्हान निर्माण केले आहे.
रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव हे गुहागर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेसाठी 26 मार्चला पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेश शेटय़े यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रायगडचे शिवसेना जिल्हाप्रमुख बबन कमळू पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रवादीचे जगताप आणि शिवसेनेचे कमळू पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसचे माजी मंत्री रविशेठ पाटील यांचे चिरंजीव वैकुंठ पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीत रंगत आणली आहे. रायगडमध्ये काँग्रेस मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला बरेच कंगोरे आहेत. राष्ट्रवादीने आपली उमेदवारी रायगडलाच दिली असल्याने तेथील काँग्रेस उमेदवाराने अर्ज दाखल करणे ही बाब राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. अर्थात आपण काँग्रेसचे नाही, आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याचे पाटील यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटच्या दिवसापर्यंत माणिक जगताप व वैकुंठ पाटील यांची नाराजी दूर करण्यात राष्ट्रवादीला यश मिळते का, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. दोघांच्या अर्जामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सध्या तरी मोठी चुरस निर्माण झाली आहे.


प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा