PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: नारायण राणेंमुळेच मतदारसंघ आघाडीकडे नारायण राणेंमुळेच मतदारसंघ आघाडीकडे ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 11 March, 2010 01:15:00 AM रत्नागिरी- ‘गेली काही वर्षे विरोधकांकडे असलेला मतदारसंघ राज्याचे महसूलमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच काँग्रेस आघाडीकडे आला आहे. धर्मनिरपेक्ष विचारांनी जातीयवाद्यांना पराभूत केले. त्यामुळे विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत अनिल तटकरे प्रचंड बहुमतांनी विजयी होतील,’ असा विश्वास राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी येथे व्यक्त केला. अमरावती येथे झालेल्या बैठकीत नारायण राणे यांनी अनिल तटकरे यांना पाठिंबा दर्शवला होता. याबद्दल सुनील तटकरे यांनी स्वयंवर येथे झालेल्या कार्यक्रमात राणे यांचे आभार मानले. ‘काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे राजकीय विचार एकच असून सेनेला कोकणातून हद्दपार करणे हेच आमचे संयुक्त उद्दिष्ट आहे,’ असे तटकरे यावेळी म्हणाले. काँग्रेस विभाजनानंतर राष्ट्रवादी बळकट व्हावी यासाठी अनिल तटकरे यांचे सर्वाधिक योगदान असल्याने त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आल्याचे सुनील तटकरेंनी सांगितले. यावेळी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, दीपक केसरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये हेही उपस्थित होते. ‘काँग्रेस आघाडीचे यश निश्चित’ स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार अनिल तटकरे यांचा विजय निश्चित आहे. या निवडणुकीत विकासाचा मुद्दा महत्त्वाचा राहणार असल्याचे स्पष्ट प्रतिपादन सुनील तटकरे यांनी केले. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल तटकरे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा पाठिंबा आहे. राज्याचे महसूलमंत्री नारायण राणे यांनी स्वत: या निवडणुकीत लक्ष घातले आहे. त्यामुळे या निवडणुकीतील काँग्रेस आघाडीचे यश निश्चित असल्याचे तटकरे यांनी सांगितले.