भिवंडीच्या समस्यांचे आयुक्तांपुढे आव्हान
मूलभूत समस्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही ढिम्म पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने रहिवासी हतबल झाले आहेत. या समस्या सोडवण्याचे आव्हान भिवंडी महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अच्युत हांगे यांच्यापुढे असून ते यातून शहराचा कायापालट कसा करतात, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
भिवंडी- घाणीचे साम्राज्य, अपुरा पाणीपुरवठा, रस्त्यावरील खड्डे यांसारख्या विविध समस्यांमुळे भिवंडी शहराला ग्रासले आहे. या मूलभूत समस्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही ढिम्म पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने रहिवासी हतबल झाले आहेत. या समस्या सोडवण्याचे आव्हान भिवंडी महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त अच्युत हांगे यांच्यापुढे असून ते यातून शहराचा कायापालट कसा करतात, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
भिवंडी शहरातील कचरा उचलणा-या अॅन्थोनी या ठेकेदारावर महापालिका प्रशासनाचा कोणताही वचक नसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कच-यांचे ढीग साचले आहेत. या कच-यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात विविध साथीचे आजार बळावले आहेत. यामुळे शहरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने संताप व्यक्त होत आहे.
शहरातील इंदिरा गांधी रुग्णालयाचीही दुरवस्था झाली आहे. या रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता, सोयी-सुविधांचा अभाव यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांना पडलेल्या खड्डय़ांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडी होत असून वाहने ना-दुरुस्त होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. शहरातील आजपर्यंत न सुटलेल्या या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आयुक्त हांगे यांनी ठोस भू्मिका घेण्याची मागणी रहिवासी करत आहेत. आयुक्त हांगे यांनी यापूर्वी भिवंडी महापालिकेत विविध पदांवर काम केले असल्यामुळे त्यांना शहरातील समस्यांची जाण असून त्यांची भिवंडी शहराचा कायापालट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा