PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: करुळ घाटात कठडय़ांचे बांधकाम करुळ घाटात कठडय़ांचे बांधकाम ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 24 August, 2010 12:15:00 AM वैभववाडी- करुळ घाटात दरवर्षी घडणा-या अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन घाटात ठिकठिकाणी संरक्षक कठडे बांधले जात आहेत. मात्र ऐन पावसात केल्या जाणाऱ्या बांधकामांच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे. घाटातील काही धोकादायक वळणांवर पोलादी कठडे बसवले जात असल्याने वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. करुळ घाटमार्गाची गेल्या पाच वर्षांत दुरवस्था झाली होती. निकृष्ट दर्जाचे आणि ढासळू लागलेले संरक्षककठडे तसेच काही ठिकाणी खचलेल्या रस्त्यामुळे हा घाट धोकादायक बनला होता. या घाटातील रस्ते आणि कठडय़ांच्या डागडुजीचे काम आता सुरू झाले आहे. यापूर्वी ‘गॅबियन’ पध्दतीच्या संरक्षक भिंती बांधण्यात आल्या होत्या. घाटात अपघात घडू नये, यासाठी धोकादायक वळणांवर आता (क्रॅश बॅरिअर) पोलादी कठडे बसवण्यात आले आहेत. पाच ठिकाणी पोलादी तर तीन ठिकाणी सिमेंट काँक्रिटचे संरक्षक कठडे उभारण्याचे काम पूर्ण झाले आहेत. परंतु पाया न घालताच कठडे उभारण्यात आल्याने तसेच ऐन पावसात ही कामे झाल्याने ती किती दिवस टिकतील याबाबत शंका निर्माण झाली आहे. करुळ घाटातील द-या पाचशे ते सहाशे फूट खोल आहेत. रस्त्यावरील संरक्षक कठडे तोडून वाहने दरीत कोसळल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोटय़वधी रुपये खर्च करून संरक्षक कठडे उभारताना त्यांचा दर्जा उच्च राहील, याची दक्षता सार्वजनिक बांधकाम खात्याने घ्यावी, असे मत व्यक्त केले जात आहे.