विजयदुर्ग बंदरासाठी जागा निश्चित
नियोजित विजयदुर्ग बंदराची जागा निश्चित करण्यात आली असून ‘गिर्ये बे’जवळचा समुद्रकिनारा बंदर बांधण्यासाठी निवडला आहे.
देवगड- नियोजित विजयदुर्ग बंदराची जागा निश्चित करण्यात आली असून ‘गिर्ये बे’जवळचा समुद्रकिनारा बंदर बांधण्यासाठी निवडला आहे. एक हजार कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक असलेला हा प्रकल्प पूर्णत: निर्मनुष्य असलेल्या ठिकाणी होत असल्याने एकाही घराचे अथवा झाडाचे नुकसान होणार नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे स्थानिकांनी स्वागत केले आहे. प्रकल्पाची प्रत्यक्ष बांधणी २०१२मध्ये सुरू होणार आहे.ज्युपिटर ग्रुप या कंपनीने विजयदुर्ग पोर्ट प्रा. लि. ही कंपनी स्थापन करून बंदर प्रकल्प उभारण्याचे कार्य हाती घेतले आहे. विजयदुर्ग बंदरासाठी पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात खोल असलेल्या ‘गिर्ये बे’बंदराची जागा घेण्यात आली आहे. या ठिकाणी महाऊर्जाचा पवनचक्की प्रकल्प असल्याने रस्ते, वीज या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे हा प्रकल्प आता वेगाने कार्यान्वित होईल. विशेष म्हणजे या ठिकाणी पूर्वी औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी कोळसा उतरण्याचे बंदर व विजयदुर्ग शिपयार्ड कंपनी उभारण्यात येणार होती. याच जागी बंदर उभे राहणार असल्याने शिपयार्ड कंपनीचा प्रस्ताव नाकारण्यात आला.
निर्मनुष्य क्षेत्र व खोल पाणी असल्याने याच ठिकाणी बंदर उभे करावे, अशी मागणी विजयदुर्ग परिसरातील रहिवाशांनी यापूर्वीच केली होती. प्रकल्पाची कागदपत्रे, आराखडे तयार करणे, आवश्यक मंजुरी घेण्याची कामे आता सुरू आहेत. बंदराच्या प्रत्यक्ष बांधकामाला 2012 पासून सुरुवात होणार आहे. सरकारने जाहीर केलेल्या नवीन बंदर धोरणानुसार विजयदुर्ग-कोल्हापूर रेल्वेमार्ग अस्तित्वात येईल. या बंदरामुळे स्थानिकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. बंदर प्रकल्पाचा विकास, निगडित बांधकामे, रस्ते, रेल्वे, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, संपर्क यंत्रणा याबाबींवर होणाऱ्या उत्खननासाठी सरकार रॉयल्टी आकारणार नाही. वेळ पडल्यास बिगरशेती आकारही माफ केला जाईल. बंदर बांधताना जी वीज लागेल, त्यावर वीजकरातून 100 टक्के माफी दिली जाणार आहे. पाणीपुरवठा, संपर्क यंत्रणा व इतर सर्व पायाभूत सुविधांवरील नोंदणी शुल्क त्याचप्रमाणे मुद्रांक शुल्कही सरकारने माफ केले आहे. भूसंपादन केलेल्या प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला बंदर प्रकल्पात नोकरी देण्यात येईल. नोकरी देणे शक्य न झाल्यास, एका वेळचे आर्थिक साह्य म्हणून रोख रक्कम देण्याची अट ठेवण्यात आली आहे.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (1 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा