PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: सोलापूरमध्ये माळढोक पक्षिगणना सोलापूरमध्ये माळढोक पक्षिगणना ================================================================================ प्रहार वार्ताहर on 24 August, 2010 11:25:00 AM सोलापूर- दुर्मीळ पक्षी असलेल्या माळढोकची गणना येत्या 29 ऑगस्ट रोजी होणार असून त्यासाठी नान्नज येथील माळढोक अभयारण्यात 38 निरीक्षण केंद्रे उभारण्यात आली आहेत. बार्शी आणि तुळजापूर तालुक्यातही माळढोक पक्षी आढळल्याने या वर्षी शेळगाव व सावरगाव येथे नव्याने निरीक्षण केंद्रे उभारली जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील नान्नज परिसरातील माळढोक पक्षी अभायरण्य पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. दुर्मीळ असलेला माळढोक पक्षी या अभयारण्यात पाहायला मिळतो. मागील वर्षाच्या निरीक्षणात 14 माद्या आणि सात नर असे 21 माळढोक पक्षी येथे मोजले गेले होते. या वर्षी 29 ऑगस्ट रोजी करण्यात येणा-या माळढोक निरीक्षणासाठी विविध ठिकाणी निरीक्षण केंद्रे उभारली जात आहेत. नान्नज, मार्डी, नरोटेवाडी, कारंबा, शेळगाव, सावरगाव आदी परिसरांत ही निरीक्षण केंद्रे उभारली जाणार आहेत. यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्याने अभयारण्यात हिरवळ पसरली आहे. त्यामुळे हा मोसम पक्षी निरीक्षणासाठी उत्तम असल्याने पक्षीप्रेमींनी आणि निरीक्षकांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.