PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: विकासकार्याला हातभार लावा- नितेश राणे विकासकार्याला हातभार लावा- नितेश राणे ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 24 August, 2010 10:10:00 PM सावंतवाडी- महसूलमंत्री नारायण राणे आणि खासदार डॉ. निलेश राणे यांच्या माध्यमातून अनेक विकासप्रकल्प मार्गी लागले आहेत. रोजगार निर्मितीचे प्रकल्पही लवकरच जिल्ह्यात येत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांनी या कार्याला हातभार लावावा. काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून चांगले काम या जिल्ह्यात सुरू आहे. आवश्यकता भासल्यास स्वाभिमान संघटनाही मदतीचा हात पुढे करेल, अशी ग्वाही स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. येथील ग्राफिक हेल्थ सेंटर या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन नितेश राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर हॉटेल मँगो येथे त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. या वेळी रवींद्र फाटक, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मनोज नाईक, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजू परब उपस्थित होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान आपण संपूर्ण सावंतवाडी फिरलो आहोत. ना. राणे व खासदार डॉ. निलेश राणे यांनी सावंतवाडीतही विकासकामे केली असल्यामुळे आपल्यासाठी कोणतेही काम शिल्लक राहिलेले नाही, असे ते म्हणाले. मुंबईतील पाणीप्रश्न तसेच मलेरियाच्या प्रश्नावर स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून लढा दिला. शिवसेना-भाजप युतीने मुंबई महानगरपालिका पूर्णपणे भकास केली आहे. सत्ताधा-यांनी प्रश्न सोडवले नसल्यामुळेच स्वाभिमान संघटनेच्या आंदोलनांना वेळोवेळी यश लाभले. आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्यांना जनताच घरी बसवेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. ना. राणे यांनी केलेल्या विकासकामांपासून प्रेरणा घेऊनच आपण सामाजिक क्षेत्रात उतरलो आहोत. ना. राणेसाहेब राबवत असणाऱ्या रोजगाराभिमुख उपक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांनी सक्रिय हातभार लावावा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले. सावंतवाडीत वर्तमानपत्रीय पत्रकारिता आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचाही अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. फटाक्यांची आतषबाजी, ढोलपथकाच्या गजरात सावंतवाडी शहरात नितेश राणे यांची मिरवणूक काढण्यात आली.