PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: जागा मिळेल तेथे टर्मिनस! जागा मिळेल तेथे टर्मिनस! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 25 August, 2010 10:25:00 AM कणकवली- कोकण रेल्वेचे टर्मिनस कुठे होईल, याबाबत रेल्वे बोर्डाची मंजुरी अद्याप आलेली नाही. जागा मिळेल तेथे टर्मिनस उभारावे. मात्र ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातच व्हावे, अशी स्पष्टोक्ती महसूलमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी येथे केली. मडुरे येथे टर्मिनस उभारण्यासाठी शेतक-यांनी अनुकूलता दर्शवल्याने मी तेथे टर्मिनस करा, असे सांगितले. जर कोणी सावंतवाडीत जागा उपलब्ध करून देत असेल तर ती त्यांनी द्यावी. मात्र ते लवकर व्हावे आणि लोकांची गैरसोय दूर व्हावी, असे सांगतानाच वाद घालण्यापेक्षा विकासात सहकार्याची भूमिका ठेवा, असा टोलाही राणे यांनी टर्मिनसच्या विरोधकांना लगावला. कोकण रेल्वेचे टर्मिनस सावंतवाडीला होणार, अशा आशयाचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. त्याबद्दल विचारणा केली असता राणे यांनी जागा मिळेल तेथे टर्मिनस होईल, असे स्पष्ट केले. ओरोस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले,‘टर्मिनससाठी जमीन मागणीचा केंद्रीय रेल्वे बोर्डाचा प्रस्ताव अद्याप महसूल विभागाकडे आलेला नाही. तो आल्यानंतरच याबाबत चाचपणी सुरू होईल. मुख्यमंत्री कार्यालयाला कोकण रेल्वेने काय कळवले, याची मला माहिती नाही. मात्र जी माहिती उपलब्ध झाली आहे, त्यात जागेच्या मंजुरीचा कोठेही उल्लेख नाही.’त्यामुळे वृत्तपत्रांनी काढलेले अनुमान वास्तवाला धरून नाही, असेही राणे म्हणाले. टर्मिनससाठी मडुरे येथे जमीन देण्याची परवानगी तेथील शेतक-यांनी दाखविली आहे. रेल्वे बोर्डाचे चेअरमन विवेक सहाय, रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी भेटून आम्ही चर्चा केली व पत्रव्यवहार झाला आहे. कुठेही टर्मिनस झाले तरी लोकहित व्हावे, हेच अपेक्षित आहे. मुंबई-सावंतवाडी रेल्वे सुरू व्हावी, हा मुख्य मुद्दा आहे. जनमत आणि जमिनीची उपलब्धता या मुद्दय़ांचा विचार करून टर्मिनस योग्य जागी होईल, असे राणे म्हणाले.