PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: भातसातून वीजनिर्मिती सुरू भातसातून वीजनिर्मिती सुरू ================================================================================ प्रहार वार्ताहर on 02 September, 2010 01:50:00 AM शहापूर- भातसा धरण पूर्णपणे भरल्याने पाण्यावर चालणारे महानिर्माणचे विद्युत जनित्र सोमवारी सायंकाळपासून सुरू झाले आहे. या विद्युत जनित्राची क्षमता 15 मेगावॉट असून त्यापासून निर्माण होणारी वीज भारनियमन कालावधीत वापरली जाते. त्यामुळे हे जनित्र सुरू झाल्याने शहपूरकरांची भारनियमनातून सुटका होण्याची चिन्हे दिसत आहेत. भातसा धरणातील पाण्याची पातळी 24 मे रोजी 106.43 मीटरपेक्षा खाली गेल्याने हे विद्युत जनित्र बंद पडले होते. मात्र धरण 30 ऑगस्टला भरल्याने जनित्र 24 तास सुरू करण्यात आले. त्यामुळे वीजनिर्मितीत भर पडणार आहे. भातसा धरणातून मुंबई, उपनगरे व ठाणे औद्योगिक वसाहतीला दररोज दोन हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. 142.0 मीटर उंची असलेल्या या धरणातून मुंबईला मागणीप्रमाणे पाणी सोडण्यात येते. या पाण्यावर 15 मेगावॉट क्षमतेचे विद्युत जनित्र असून त्याद्वारे निर्माण झालेली वीज भारनियमनाच्या काळात नियोजनाप्रमाणे कळवा येथून गरजेप्रमाणे वापरण्यात येते. धरणाची पातळी 106.43 मीटर असते, तोपर्यंत जनित्रातून वीजनिर्मिती होत असते. मात्र त्याखाली पातळी गेल्यावर ही वीजनिर्मिती बंद होते. 24 मे 2010 रोजी पाण्याची पातळी खालावल्याने वीजनिर्मिती बंद पडली होती, मात्र यंदा पावसाचा जोर चांगला असल्याने भातसा धरण भरले आहे. यामुळे जनित्रातून सोमवारपासून वीजनिर्मिती सुरू करण्यात आली. गेल्या वर्षी जनित्रातून सुमारे 82.261 मिलियन युनिट्सची वीजनिर्मिती करण्यात आली होती.