PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: जिंदालच्या वीजनिर्मितीला प्रारंभ जिंदालच्या वीजनिर्मितीला प्रारंभ ================================================================================ सुनील चव्हाण on 02 September, 2010 11:10:00 AM रत्नागिरी- जयगड येथील जिंदाल कंपनीच्या पहिल्या टप्प्यातील वीज निर्मितीला बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात 300 मेगावॉट विजेची उपलब्धता झाल्याने भारनियमनात अडकलेल्या राज्याला दिलासा मिळणार आहे. गेले काही दिवस जयगड येथील जिंदाल कंपनीच्या वीज निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. परंतु कंपनीकडून बुधवारी वीज निर्मितीला सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. कंपनीच्या 1200 मेगावॉट वीज प्रकल्पाच्या कामाने गती घेतली आहे. याआधीच जिंदालने जेटी उभारणीचे काम पूर्ण केले. त्यामुळे वीज निर्मितीसाठी कोळशाच्या वाहतुकीसाठी या जेटीचा वापर केला जात आहे. गेल्या काही दिवसांच्या यशस्वी चाचणीनंतर कंपनीने प्रत्यक्षात 300 मेगावॉट वीज निर्मितीला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात 300 मेगावॉट विजेची उपलब्धता जिंदालच्या वीज प्रकल्पातून राज्याला झाली आहे. त्यामुळे राज्यातील विजेची टंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. दुस-या टप्प्यात आणखी 300 मेगावॉट वीजनिर्मितीसाठी कंपनीने तयारी सुरू केली आहे. मार्च 2011 मध्ये दुस-या टप्प्यातील वीज निर्मितीला सुरुवात होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. जिल्ह्याच्या जयगड येथील वीज प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या परिसरातील लोकांनी विकासाच्या दृष्टीने या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवल्याने नियोजित वेळेत वीज निर्मितीला सुरुवात करणे कंपनीला शक्य झाले आहे.