PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: कापसाला 4 हजार 500 हमीभाव द्यावा कापसाला 4 हजार 500 हमीभाव द्यावा ================================================================================ प्रहार वार्ताहर on 03 September, 2010 11:45:00 AM वर्धा- अतिवृष्टीमुळे देशभरातील 110 लाख हेक्टरमधील कापसाचे पीक धोक्यात आल्याने त्याचा शेतक-यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतक-यांना दिलासा देण्यासाठी कापसाला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास 2 ऑक्टोबरपासून राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. यंदा बीटी बियाणांची विक्रमी 110 हेक्टरवर पेरणी करण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. राज्यात कापसाचे क्षेत्र 42 लाख हेक्टर असून त्यातील तब्बल 28 लाख क्षेत्र विदर्भात आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतक-यांची चिंता वाढली आहे. कापसावर प्रत्येक शेतक-याला हेक्टरमागे 25 हजार रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे हे पीक धोक्यात आल्यास शेतक-यांना 27 हजार 500 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. कापसाचे पीक लावण्यातही शेतक-यांचा मोठय़ा प्रमाणात खर्च झाला आहे. विदर्भातील शेतक-यांनी केवळ पेरणीसाठी सात हजार कोटी रुपये खर्च केले. मात्र मजुरी व खताच्या कमतरतेमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दुसरीकडे बँकांनी अर्थपुरवठा करण्यास हात आखडता घेतल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पश्चिम विदर्भातील हे कृषिसंकट आता संपूर्ण विदर्भासह मराठवाडा, खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातही पसरले आहे. त्यामुळे 30 लाख शेतक-यांना दिलासा देण्यासाठी कापसाचा हमीभाव साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल करणे आवश्यक आहे, असे समितीच्या किशोर तिवारी यांनी सांगितले. पेरणीच्या एकूण खर्चाचा तपशील केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. कापसाचा हमीभाव न वाढल्यास गिरणी मालक व व्यापा-यांकडून शेतक-यांची आणखी पिळवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हमीभावाची मागणी मान्य करावी, अन्यथा आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नसेल, असे तिवारी म्हणाले. *कपाशीवर ‘पांढरी माशी’चा प्रादुर्भाव विदर्भातील कपाशीच्या पिकांवर मावा, तुडतुडे, फुलकिडे यांसह पांढरी माशी या किडीचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. सध्या पोषक हवामान असल्याने या किडीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या किडीचे निरीक्षण करून आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यात येणार असल्याचे उपविभागीय कृषी अधिका-यांनी सांगितले. या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्याचे मार्गदर्शन शेतक-यांना केले जाईल, असे कृषी अधिका-यांनी सांगितले.