PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: श्रीरामपूरमध्ये 175 गोण्या दूधपावडर जप्त श्रीरामपूरमध्ये 175 गोण्या दूधपावडर जप्त ================================================================================ प्रहार वार्ताहर on 03 September, 2010 11:00:00 AM अहमदनगर- जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे दुधात भेसळ करणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली. दुधाची भुकटी वापरून दोघे जण दुधात भेसळ करत असल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत साडेसहा लाख रुपये किंमत असलेल्या बनावट दूधपावडरच्या 175 गोण्या जप्त करण्यात आल्या. जिल्ह्यात दुधात भेसळ करणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना असून त्यांनी शोधसत्र सुरू केले आहे. राहुरी शहरातून जाणा-या एका ट्रकमधून दुधात भेसळीसाठी वापरली जाणारी पावडर आणली जात असल्याची माहिती श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक सुनील कडासणे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी राहुरीजवळील तांदुळवाडी शिवारात बंद पडलेल्या एका ट्रकची तपासणी केली. या ट्रकमध्ये पोलिसांना दूधभेसळीसाठी वापरल्या जाणा-या पावडरच्या 175 गोण्या आढळून आल्या. पोलिसांनी ट्रकमालक सरूनाथ म्हसे व चालक शंकर पंढरीनाथ पेरणे या दोघांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता श्रीरामपूर तालुक्यातील वाकडी अस्तगाव रस्त्याच्या कडेला दूधपावडरच्या 40 गोण्या फेकून दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या गोण्याही ताब्यात घेतल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात दुधात भेसळ करणा-यांवर पोलिसांनी काही दिवसांपासून कारवाई केल्याने पुरावे नष्ट करण्यासाठी भेसळीचा माल नष्ट करण्यात येत आहे.